धक्कादायक! कडुस येथे ८० विद्यार्थ्याना विषबाधा..

राजगुरुनगर: Bharat Live News Media वृत्तसेवा : कडुस, (ता. खेड) येथील दक्षिणा फाऊंडेशन या खासगी प्रशिक्षण संस्थेत आयआयटी आणि नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या संस्थेतील ६० विद्यार्थ्याना जेवणातून विषबाधा झाली आहे. पैकी २० विद्यार्थ्याना चांडोली (राजगुरुनगर) ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दोन विद्यार्थी अत्यवस्थ असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी यशवंतराव चव्हाण रूग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याचे वैद्यकिय अधीक्षक डॉ पुनम चिखलीकर यांनी सांगितले.
कडुस येथे दक्षिणा फाऊंडेशन संस्थेमार्फत आयआयटी आणि नीट परीक्षेची तयारी करून घेतली जाते. देशभरातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्याना शिक्षण तथा मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थ्यांसाठी निवास व भोजनाची मोफत व्यवस्था संस्थेकडून करण्यात येते.येथे १८ ते २० वयोगटातील जवळपास ६०० विद्यार्थी, विद्यार्थीनी आहेत.शुक्रवारी (दि १९) दुपारी राजमा आणि रात्री कांद्याची पात व बटाट्याची भाजी खाल्या नंतर शनिवारी पहाटे २ नंतर मुलांना मळमळ, उलट्या होऊ लागल्या असे येथील व्यवस्थापक अनु मलिक यांनी सांगितले.
मुलांना त्रास होऊ लागल्यानंतर कडुस प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क साधण्यात आला. संस्थेच्या निवासी हॉस्टेल मध्ये जाऊन डॉक्टरांनी काही विद्यार्थ्याना प्राथमिक उपचार सुरू केले. मात्र वीस विद्यार्थ्याना जास्त त्रास होऊ लागल्याने त्यांना चांडोली ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील, निरिक्षक राजकुमार केंद्रे, उप निरिक्षक ज्ञानेश्वर राऊत,पोलिस संतोष घोलप , चांडोलीचे उपसरपंच सतीश सावंत, माजी उपसरपंच चिकाशेठ वाघमारे आदींनी रुग्णालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या प्रकृती बाबत माहिती घेतली.
हेही वाचा
Loksabha election 2024 | वसंत मोरेंनी भरला गुपचूप उमेदवारी अर्ज
गोव्यात अवकाळी पाऊस कोसळला
त्र्यंबकेश्वरमध्ये भेसळयुक्त पेढ्यांची विक्री; अन्न, औषध प्रशासनाची विक्रेत्यांवर कारवाई
