नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा- महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेच्या निषेधार्थ गंगापूर रोडवरील आकाशवाणी टॉवर परिसरातील भाजीविक्रेत्यांनी शुक्रवारी (दि.१९) महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनसमोर ‘भाजीफेक’ आंदोलन करत संताप व्यक्त केला. अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप करत हॉकर्स झोन जोपर्यंत जाहीर केले जात नाही तोपर्यंत विक्रेत्यांना आहे त्याच जागेवर व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही यावेळी भाजीविक्रेत्यांकडून करण्यात आली.
शहरातील पथविक्रेत्यांना हक्काची जागा उपलब्ध करून देण्यासाठी फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याचे केंद्र व राज्य शासनाने निर्देश असले तरी नाशिक महापालिकेकडून या शासन निर्देशांची अद्यापही पुरेपूर अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. प्रशासकीय विलंबामुळे पथविक्रेत्यांची समितीही गठीत होऊ शकली नसून आता तर आचारसंहितेमुळे या समितीची निवडणूक प्रक्रियादेखील रखडली आहे. त्याउपरही महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून शहरातील फेरीवाले, पथविक्रेत्यांविरोधात कारवाई मात्र सुरूच आहे. शुक्रवारी गंगापूर रोडवरील आकाशवाणी टॉवरजवळील भाजीविक्रेत्यांवर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने कारवाई करत भाजीपाला जप्त केल्याने विक्रेत्यांचा संताप अनावर झाला. या कारवाईविरोधात भाजीविक्रेत्यांनी थेट महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवन गाठत मुख्यालयासमोर भाजीपाला फेकत घोषणाबाजी केली. त्यानंतर आयुक्तांना निवेदन देण्यात आले. आकाशवाणी टॉवर तसेच शिवाजीनगर, सातपूर, पंचवटी, नाशिकरोड व नवीन नाशिक या भागात भाजीविक्रेत्यांना व्यवसायासाठी हक्काची जागा उपलब्ध करून द्यावी. तोपर्यंत भाजीविक्रेत्यांवर कारवाई केली जाऊ नये, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या आंदोलनात भाजीविक्रेत्यांच्या नवसंघर्ष संघटनेचे कार्याध्यक्ष नितीन मुर्तडक, शहराध्यक्ष समाधान अहिरे, सुरेश टर्ले, राजू घोरपडे, प्रणव बनसोडे, सविता सांगळे, मारुती वराडे आदी सहभागी झाले होते.
अतिक्रमण कर्मचाऱ्यांवर हप्तेखोरीचा आरोप
अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई अन्यायकारक असल्याचा दावा करताना अतिक्रमण निर्मूलन विभागातील कर्मचारी भाजीविक्रेत्यांकडून हप्ते मागत असल्याचा गंभीर आरोप संघटनेने आयुक्तांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. अतिक्रमण विभागातील ही हप्तेखोरी बंद करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
हेही वाचा –
जळगावात ५ वाळू माफियांसह हातभट्टीची दारु विकणाऱ्या महिलेवर एमपीडीएची कारवाई
Dindori Lok Sabha J.P. Gavit | ‘माकप’च्या गावितांचा बंडाचा झेंडा, दिंडोरीतून उमेदवारी जाहीर
Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | शनिवार, २० एप्रिल २०२४