भुजबळ माघारी, गोडसेंना उभारी !

शिंदे गट, भाजप की, राष्ट्रवादी अजित पवार गट अशा अनिश्चिततेच्या हिंदोळ्यावर झुलणारी नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक शुक्रवारी माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या उमेदवारी स्पर्धेतील माघारीने वेगळ्या वळणावर येऊन ठेपली. आपल्या माघारीची घोषणा स्वत: भुजबळ यांनी माध्यम संवादात केल्याने महायुतीचा नाशिकचा उमेदवार शिंदे गटाचा आणि तोदेखील हेमंत गोडसेच असतील, यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. या घडामोडीनंतर …

भुजबळ माघारी, गोडसेंना उभारी !

नाशिक । मिलिंद सजगुरे

शिंदे गट, भाजप की, राष्ट्रवादी अजित पवार गट अशा अनिश्चिततेच्या हिंदोळ्यावर झुलणारी नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक शुक्रवारी माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या उमेदवारी स्पर्धेतील माघारीने वेगळ्या वळणावर येऊन ठेपली. आपल्या माघारीची घोषणा स्वत: भुजबळ यांनी माध्यम संवादात केल्याने महायुतीचा नाशिकचा उमेदवार शिंदे गटाचा आणि तोदेखील हेमंत गोडसेच असतील, यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. या घडामोडीनंतर गोडसे यांच्या उमेदवारीला विरोध करणाऱ्या भाजपची भूमिका काय, याकडे लक्ष लागून राहणार आहे. (Nashik Lok Sabha Elections)
आताची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यापासून सलग दोनदा विजयश्री प्राप्त केलेल्या हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत होती. त्यासाठी भाजपने केलेल्या सर्वेक्षणासह ॲन्टी इन्कम्बन्सी मुद्द्याची ढाल पुढे करण्यात येत होती. भाजपने थेट विरोधाची भूमिका घेतल्यामुळे गोडसे यांच्या तिसऱ्यांदा मैदानात उतरण्याची शक्यता अंधुक झाली होती. मुख्यमंत्रिपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमधील पक्ष मेळाव्यात गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणा करून भाजपेयींचा रोष ओढवून घेतला होता. हा मुद्दा थेट मुंबई दरबारी गेल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी स्थानिकांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिल्यानंतर भाजप गोटात शांतता निर्माण झाली होती. तथापि, तद‌्नंतरच्या घडामोडींत अचानक राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दिग्गज मंत्री छगन भुजबळ यांचे नाव पुढे आले. दस्तुरखुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीच भुजबळ यांना प्रोजेक्ट केल्याचे सांगण्यात आल्याने शिंदे गटाच्या अपेक्षा जवळपास संपुष्टात आल्या होत्या. (Nashik Lok Sabha Elections)
भाजपकडून भुजबळ यांना योग्य तो मेसेज गेल्यानंतर त्यांनी त्यादृष्टीने तयारीही सुरू केली होती. विशेषत: सार्वजनिक समारंभांतील त्यांची ऊठबस चर्चेचा विषय झाल्याने नाशिकमध्ये भुजबळ विरुद्ध महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांच्यात हाय व्होल्टेज लढत होण्याची शक्यता बळावली होती. सलग दोन निवडणुका हरलेल्या भुजबळ परिवाराला नाशिककर तिसऱ्यांदा तरी स्वीकारतील काय, असे प्रश्नार्थक मुद्देही डोके वर काढण्यास प्रारंभ झाला होता. तथापि, शुक्रवारी दुपारी अचानक भुजबळ यांनी मुंबईत पत्रपरिषदेत उपरोक्त अनपेक्षित निर्णयाची घोषणा करून एकप्रकारे नाशिकचे मैदान शिंदे गटाला मोकळे करून दिले. अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपलेल्या निवडणुकीत महायुतीची वज्रमूठ आवळण्यातील अडथळे राज्यस्तरावरील नेते कसे दूर करतात, हे पाहणेदेखील औत्सुक्याचे ठरणार आहे.
भाजप चाणक्याचे ‘ते’ प्रमेय बासनात.. (Nashik Lok Sabha Elections)
महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून सत्ताधाऱ्यांविरोधात मनोज जरांगे-पाटील यांनी निर्माण केलेल्या वावटळाची व्याप्ती लक्षात घेता, भाजपच्या ४५ प्लस मिशनला धक्का पोहोचण्याची शक्यता गडद झाली होती. त्यामुळे सावध झालेल्या केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे चाणक्य अमित शाह यांनी महाराष्ट्रात माधवं (माळी-धनगर-वंजारी) प्रयोग करण्याचा विचार पुढे आणला. त्यानुसार, राज्याच्या पक्षीय राजकारणात अडगळीत पडलेल्या पंकजा मुंडे (बीड) आणि महादेव जानकर (परभणी) या अनुक्रमे वंजारी व धनगर समाजातील नेत्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवून तसेच ‘माधवं’चा त्रिकोण माळी समाजाच्या भुजबळ यांना नाशिकमध्ये उमेदवारी देऊन पूर्ण करण्याची शाह यांची रणनीती होती. मात्र, नाशिक सोडणे आम्हाला अशक्य असल्याचा मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उचलून धरल्याने शाह-फडणवीस यांना अखेर माघार घ्यावी लागल्याची चर्चा झडत आहे. शिवाय, भुजबळ यांना महायुती उमेदवार म्हणून प्रोजेक्ट केले, तर त्याचा परिणाम मराठा समाज दूर जाण्याची भीती भाजप नेतृत्वाच्या गळी उतरवण्यात शिंदे यशस्वी झाल्यानेच तूर्तास भुजबळांच्या नावावर पडदा टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा –

त्र्यंबकेश्वरमध्ये भेसळयुक्त पेढ्यांची विक्री; अन्न, औषध प्रशासनाची विक्रेत्यांवर कारवाई
Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | शनिवार, २० एप्रिल २०२४