दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

लोकसभा निवडणुकीत आता रंग भरत चालला आहे. प्रचाराचा धुमधडाका सुरू आहे. पहिल्या, दुसर्‍या टप्प्यातील काही प्रमुख लढतींचा मागोवा घेण्यात आला आहे. किरण रिजीजू विरुद्ध नबाम तुकी लढत अरुणाचल प्रदेशातील पश्चिम अरुणाचल मतदार संघात केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांची लढत माजी मुख्यमंत्री व अरुणाचल प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नबाम तुकी यांच्याशी होत आहे. संजीव बलियान यांची तिहेरी …

दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

लोकसभा निवडणुकीत आता रंग भरत चालला आहे. प्रचाराचा धुमधडाका सुरू आहे. पहिल्या, दुसर्‍या टप्प्यातील काही प्रमुख लढतींचा मागोवा घेण्यात आला आहे.
किरण रिजीजू विरुद्ध नबाम तुकी लढत
अरुणाचल प्रदेशातील पश्चिम अरुणाचल मतदार संघात केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांची लढत माजी मुख्यमंत्री व अरुणाचल प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नबाम तुकी यांच्याशी होत आहे.
संजीव बलियान यांची तिहेरी लढत
उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर लोकसभा मतदार संघात केंद्रीय मंत्री संजीव बलियान यांचा सामना समाजवादी पक्षाचे हरेंद्र मलिक आणि बसपाचे उमेदवार दारासिंह प्रजापती यांच्याशी होत आहे.
जितेंद्रसिंह विरुद्ध चौधरी लालसिंह लढत
जम्मू काश्मीरच्या उधमपूर मतदार संघात दोन वेळा खासदार राहिलेले केंद्रीय राज्य मंत्री जितेंद्रसिंह तिसर्‍यांदा नशीब आजमावत आहेत. जितेंद्रसिंह यांची लढत काँग्रेसचे उमेदवार चौधरीलाल सिंह यांच्याशी आहे.
राजस्थानात दोन केंद्रीय मंत्री रिंगणात
राजस्थानच्या अलवर मतदार संघातून केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव निवडणूक लढवत आहेत. बिकानेर मतदार संघात केंद्रीय कायदामंत्री अर्जुनराम मेघावाल यांची लढत काँग्रेसचे माजी मंत्री गोविंदराम मेघावाल यांच्याशी होत आहे.
निलगिरीत ए. राजा यांचा मुरुगन यांच्याशी सामना
तामिळनाडूच्या निलगिरी लोकसभा मतदार संघात द्रमुकचे खासदार व माजी केंद्रीय दूरसंचार मंत्री ए. राजा यांची भाजपचे उमेदवार केंद्रीय मत्स्य राज्यमंत्री के. एल. मुरुगन यांच्याशी लढत होत आहे. मुरुगन हे सध्या मध्य प्रदेशातून राज्यसभेचे खासदार आहेत. भाजपने त्यांना प्रथमच उमेदवारी दिली आहे.
कार्ती चिदम्बरम दुसर्‍यांदा रिंगणात
तामिळनाडूतील शिवगंगा लोकसभा मतदार संघात माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांचे सुपुत्र कार्ती चिदम्बरम पुन्हा रिंगणात उतरले आहेत. भाजपने त्यांच्याविरोधात के. टी. देवनाथन यादव यांना उमेदवारी दिली आहे. अण्णाद्रमुकचे नेते झेवियर दास हे सुद्धा रिंगणात आहेत. पी. चिदम्बरम या मतदार संघातून तब्बल सात वेळा खासदार राहिले आहेत.
कोईमतूरमध्ये अन्नामलाई विरुद्ध गणपती पी. राजकुमार
भाजपचे तामिळनाडू प्रदेश अध्यक्ष के. अन्नामलाई कोईमतूर मतदार संघातून नशीब आजमावत आहेत. त्यांची लढत द्रमुकचे नेते गणपती पी. राजकुमार आणि अण्णाद्रमुक पक्षाचे उमेदवार के. सिंगाई रामचंद्रन यांच्याशी आहे.
सौंदरराजन चेन्नई – दक्षिणमधून रिंगणात
तेलंगणाच्या राज्यपाल आणि पुद्दुचेरीच्या उपराज्यपाल पदाचा नुकताच राजीनामा देऊन सक्रिय राजकारणात प्रवेश करणार्‍या तमिलीसाई सौंदरराजन चेन्नई दक्षिण मतदार संघातून नशीब आजमावत आहेत. सौंदरराजन या 2019 मध्ये तुतूकोडी मतदार संघातून उमेदवार होत्या. द्रमुक नेत्या कनिमोझी यांच्याविरुद्ध त्यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता.
नकुलनाथ छिंदवाडातून
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे सुपुत्र नकुलनाथ हे छिंदवाडा लोकसभा मतदार संघातून नशीब आजमावत आहेत. कमलनाथ यांनी या जागेवर 1980 पासून तब्बल नऊ वेळा विजय मिळविला होता. 2019 मध्ये भाजपने 29 पैकी 28 जागा जिंकल्या होत्या. मात्र, छिंदवाडामध्ये भाजपला विजय मिळवता आला नाही. 2019 मध्ये नकुलनाथ विजयी झाले होते.
झाझरियांविरुद्ध राहुल कस्वा
भाजपचा गड मानला जाणार्‍या राजस्थानच्या चुरू लोकसभा मतदार संघात पॅराऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते भालाफेक खेळाडू भाजपचे देवेंद्र झाझरिया यांची लढत काँग्रेसचे राहुल कस्वा यांच्याशी आहे. भाजपने कस्वा यांचे तिकीट कापल्यामुळे त्यांनी काँग्रेस प्रवेश केला होता.