उत्तरेचे दक्षिणायन!

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात शुक्रवारी 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 102 मतदारसंघांमधील मतदान पार पडले. पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा-गोंदिया या पाच मतदारसंघांतील मतदान उन्हाच्या काहिलीत पूर्ण झाले. सर्वात चुरस होती, ती तामिळनाडूत. तेथील 39 मतदारसंघांसाठीची निवडणूक प्रक्रिया एकाच टप्प्यात पार पडली असली, तरी ‘अब की बार चारसौ पार’ करण्याच्या द़ृष्टिकोनातून तामिळनाडू …

उत्तरेचे दक्षिणायन!

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात शुक्रवारी 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 102 मतदारसंघांमधील मतदान पार पडले. पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा-गोंदिया या पाच मतदारसंघांतील मतदान उन्हाच्या काहिलीत पूर्ण झाले. सर्वात चुरस होती, ती तामिळनाडूत. तेथील 39 मतदारसंघांसाठीची निवडणूक प्रक्रिया एकाच टप्प्यात पार पडली असली, तरी ‘अब की बार चारसौ पार’ करण्याच्या द़ृष्टिकोनातून तामिळनाडू हे महत्त्वाचे राज्य ठरेल. असे भाजपाला वाटते.
दक्षिणेत कर्नाटक आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. आंध्रमध्ये वायएसआर काँग्रेसचे राज्य असून, केरळमध्ये डावी आघाडी आणि काँग्रेस यांची सत्ता आलटून पालटून येत असते, तर तामिळनाडूत द्रमुक व अण्णाद्रमुक या दोन पक्षांपलीकडे काँग्रेस वा भाजप या राष्ट्रीय पक्षांना यश मिळालेले नाही. 2019 मध्ये द्रमुक आघाडीने 38 जागा जिंकल्या. यावेळीही द्रमुकला सर्वाधिक जागा जिंकण्याचा आत्मविश्वास आहे; परंतु गेल्या सप्टेंबरात अण्णाद्रमुकने भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. काही जागांवर अण्णाद्रमुकने दुबळे उमेदवार उभे केले असले, तरी तेथे भाजपप्रणीत आघाडीने मजबूत उमेदवार दिले आहेत.
कोईम्बतूरमधून तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी अण्णाद्रमुकसमोर तगडे आव्हान निर्माण केले आहे. अन्नामलाई हे आक्रमक नेते असून, त्यांनी द्रमुकला थेट अंगावर घेतले आहे. गत लोकसभा निवडणुकीत भाजपने 3.6 टक्के मते मिळवली होती; परंतु यावेळी 10 ते 15 टक्के मते मिळतील, अशी आशा भाजपला आहे. याचे कारण, अण्णाद्रमुककडे जयललितांसारखे करिश्मा असलेले नेतृत्व नाही आणि उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तामिळनाडूतील लोकप्रियता यावेळी अधिक वाढल्याचे दिसते. खासकरून 2019 नंतर भाजपने तामिळनाडूवर लक्ष अधिक केंद्रित केले. ‘तामिळ-काशी संगमन’ आयोजित करून, उत्तर-दक्षिण सांस्कृतिक मनोमीलन घडवण्याचा प्रयत्न केला.
नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या वेळी तामिळ राजाचा सेंगोल, म्हणजेच राजदंड वास्तूत स्थापित केला गेला. तामिळ ही अभिजात भाषा असून, तिच्या प्रचारासाठी आणि ती जगभर पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले, हा या धोरणाचाच भाग. भाजप हा उत्तर भारतातील आणि हिंदी भाषेचा पुरस्कर्ता असलेला पक्ष आहे, ही प्रतिमा बदलण्यासाठी पावले टाकली जात आहेत. पंतप्रधान मोदी यांनी तमिळनाडूत अनेक प्रचार सभा घेतल्या. सनातन धर्माच्या प्रश्नावरून द्रमुकचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, त्यांचे चिरंजीव उदयनिधी यांनी वादग्रस्त विधाने करून, द्रमुकच्या मतांचे ध्रुवीकरण करण्याचा उद्योग आरंभला आहे. अण्णाद्रमुक हाही तामिळ अस्मिता जागवणारा पक्ष असला, तरी हिंदुधर्मीयांच्या भावना दुखावल्या जातील, अशी भूमिका त्या पक्षातर्फे मांडली जात नाही.
जयललिता यांच्या समर्थकांमध्ये लक्षणीय प्रमाणात सनातन धर्म मानणारे हिंदूही होते. त्यामुळेच तामिळनाडूमध्ये प्राचीन हिंदू धर्माबद्दल ज्यांना आदर वाटतो, अशा लोकांची संख्याही बरीच आहे. हे लक्षात घेऊनच भाजपने या वादात द्रमुकवर प्रतिहल्ला चढवल्याचे दिसते. 1999 च्या लोकसभा निवडणुकांत भाजपला अवघ्या 4 जागांवर आणि विधानसभा निवडणुकांत 4 जागांवर विजय मिळाला. पक्षाची ही तामिळनाडूतील सर्वोत्तम कामगिरी होती; परंतु यावेळी दहापेक्षा अधिक जागा मिळतील, असा विश्वास पक्षाचे नेते व्यक्त करत आहेत. राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश यासारख्या उत्तर भारतातील राज्यांत मागच्या वेळी भाजपने बहुसंख्य जागा जिंकल्या. यावेळी तितक्या जागा जिंकता न आल्यास, पश्चिम बंगाल व तामिळनाडूसारख्या राज्यांतून भरपाई करता येईल, अशी भाजपची व्यूहरचना असावी.
1967 मध्ये सी. एन. अण्णादुराई सरकार मद्रास प्रांतात सत्तेवर आले. त्यावेळपासून तामिळनाडूत काँग्रेसची सत्ता कधीही आली नाही. एकदा द्रमुक आणि एकदा अण्णाद्रमुक यांचीच सत्ता येत राहिली. दिल्लीतून देशावर राज्य करणारे पक्ष हे तामिळी अस्मितेच्या विरोधात आहेत, अशी भावना या दोन्ही प्रादेशिक पक्षांनी पद्धतशीरपणे रुजवली. हे सर्व लक्षात घेऊन मोदी यांनी यावेळी कच्छथिवू बेटाचा प्रश्न उपस्थित करून काँग्रेस व द्रमुकला लक्ष्य केले.
दुसरीकडे अन्नामलाई हे केवळ द्रमुकवरच टीका करत नाहीत, तर त्यांनी अण्णाद्रमुकलाही सोडलेले नाही. विशेष म्हणजे, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने अन्नामलाईंना जाणीवपूर्वक खूप स्वातंत्र्य दिले आहे. आम्ही दिल्लीतून राज्य करतो, असे कृपा करून समजू नका, हे अधोरेखित करण्यासाठीच तामिळनाडूबाबत भाजपने हे धोरण स्वीकारले, हे स्पष्ट आहे. द्रविड संस्कृती, तामिळांची स्वतंत्र ओळख याबद्दलची संवेदनशीलताही केंद्र सरकार वेळोवेळी दाखवत आहे.
भारतातील लोकशाहीचा उगम 1 हजार वर्षांपूर्वी तमिळनाडूत कसा झाला, याचे दाखलेही पंतप्रधानांनी सभांतून दिले आहेत. मनमोहन सिंग सरकार असताना, टू-जी घोटाळ्यावरून द्रमुकचे नेते आणि तत्कालीन दूरसंचारमंत्री ए. राजा तसेच खासदार आणि एम. के. करुणानिधी यांच्या कन्या कनिमोळी यांना अटक झाली होती. टू-जीवरून द्रमुक आणि मनमोहन सरकारला भाजपनेच चक्रव्यूहात अडकवले होते. द्रमुकचे काही जहाल नेते स्वतंत्र तामिळनाडू राष्ट्र असावे, अशी मागणी बेछूटपणे करत असत. अशा मुद्द्यांवरून भाजपने वेळोवेळी टोकदार भूमिका घेतली.
भाजपचा सांस्कृतिक राष्ट्रवाद विरुद्ध द्रविड अस्मितावाद, सनातन धर्मवाद विरुद्ध तर्कवादी चळवळ, असा हा संघर्ष आहे. ई. व्ही. रामस्वामी पेरियार यांनी सुरू केलेल्या ‘आत्मसन्मान’ चळवळीत द्रमुकचे मूळ आहे. विसाव्या शतकाच्या प्रारंभास सुरू झालेल्या या चळवळीने जात व धर्माचा विरोध केला आणि सामाजिक दुष्प्रवृत्तींविरुद्ध ठाम पुरोगामी भूमिका घेतली. म्हणूनच तामिळनाडूतील या लढाईस वेगळे संदर्भ प्राप्त झाले आहेत; मात्र दक्षिणेत पाय रोवण्यात भाजपाला, अस्तित्व राखण्यात काँग्रेसला कितपत यश येते, प्रादेशिक पक्षांचा प्रभाव या डावपेचात कायम राहतो काय, त्यावर सामान्य मतदारांचा द़ृष्टिकोन काय आहे, ते निकालानंतरच स्पष्ट होईल.