राणे विरुद्ध राऊत… हायव्होल्टेज सामना

[author title=”गणेश जेठे” image=”http://”][/author]
ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेवर नेहमी तुटून पडणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि ठाकरे यांचे कट्टर शिलेदार खासदार विनायक राऊत यांच्यात हायव्होल्टेज लढाई आता सुरू झाली आहे. राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघाच्या रणांगणाचा ताबा तसा यापूर्वीच घेतला होता. गुरुवारी त्यांची उमेदवारी जाहीर झाल्याने लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. 7 मे रोजी मतदान असून पुढच्या अठरा दिवसांत कोकणात नुकत्याच पार पडलेल्या पारंपरिक शिमग्यानंतर आता राजकीय शिमगा अख्ख्या महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे. जसजसे तापमान वाढते आहे, तसतसे ठाकरेंची शिवसेना विरुद्ध राणे या लढतीमुळे राजकीय वातावरणही तप्त होत जाईल, यात शंका नाही.
महायुतीकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले किरण सामंत हे माघार घेत असल्याचे त्यांचे बंधू उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत जाहीर केले आहे. त्याचवेळी आपण राणे यांचा प्रचार करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे ही लढत आता महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी होणार आहे. तळकोकण तसा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आजवर झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये सहा वेळा इथे शिवसेनेचा उमेदवार निवडून आला आहे. गेल्या 2014 आणि 2019 या दोन निवडणुकांमध्ये शिवसेनेचे विनायक राऊत या मतदार संघात विजयी झाले होते. या दोन्हीवेळी मोदी लाट होती आणि भाजपचे नेते, पदाधिकारी शिवसेनेसोबत होते. राणे विरुद्ध शिवसेना अधिक भाजप असे या दोन निवडणुकांमधील लढतीचे स्वरूप होते. दोन्ही लढतीत राणे यांचे सुपुत्र नीलेश राणे पराभूत झाले होते. 2014 मध्ये ते काँग्रेसमधून, तर 2019 मध्ये ते स्वतःच्या स्वाभिमान पक्षातून लढले होते.
यावेळी स्वतः नारायण राणे मैदानात उतरले आहेत. भाजप पक्षाकडून म्हणजेच महायुतीकडून राणे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे निश्चित मानले जात होते. परंतु, सामंत यांच्या प्रबळ दावेदारीमुळे त्यांची उमेदवारी घोषित होणे रखडले होते. तोवर राणे यांनी पूर्ण मतदार संघाच्या मैदानाचा ताबा घेतलाच होता. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये राणे यांचे मेळावे, बैठका घेऊन झाल्या आहेत. महाविकास आघाडीची उमेदवारी ठाकरे शिवसेनेच्या विनायक राऊत यांना 10-12 दिवसांपूर्वीच जाहीर झाली आहे. त्याअगोदर राऊत यांनाच उमेदवारी मिळणार, हे स्पष्ट असल्याने राऊत यांनी तेव्हाच गावोगावी खळा बैठका घेऊन प्रचार सुरू केला आहे. 16 तारखेला त्यांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. राणे यांच्या पराभवाची हॅट्ट्रिक आणि आपल्या विजयाची हॅट्ट्रिक करण्याची संधी आपणाला मिळाली आहे, असे सांगत राऊत यांनी मैदानातला संघर्ष सुरू केला आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, रत्नागिरी, राजापूर या तीन, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ-मालवण आणि सावंतवाडी या तीन मतदार संघांचा समावेश आहे. त्यातील चिपळूण हा राष्ट्रवादी अजित पवार गट, रत्नागिरी आणि सावंतवाडी शिंदे शिवसेना, कणकवली भाजप आणि राजापूर व कुडाळ विधानसभा मतदार संघांमध्ये ठाकरे शिवसेनेचे आमदार आहेत. मागील 2019 च्या निवडणुकीत विनायक राऊत 1 लाख 78 हजार 322 एवढे मताधिक्य घेऊन विजयी झाले होते. केवळ कणकवली विधानसभा मतदार संघात राणे यांना मताधिक्य होते. इतर पाचही मतदार संघात राऊत यांनी मताधिक्य मिळविले होते.
2019 सालच्या लोकसभा निवडणुकीनंतर राणे यांनी आपला स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन केला आणि ते भाजपमध्ये प्रवेशले. मूळ भाजप आणि राणे समर्थक एकत्र आल्यानंतर भाजपची तळकोकणातील ताकद पूर्वीपेक्षा वाढली आहे. या जोरावरच ही जागा भाजपला मिळावी आणि त्यात पुन्हा राणे यांना उमेदवारी मिळावी, यासाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे तगादा लावला होता. त्याला यश आले आहे. भाजपला आता शिवसेनेचा असलेला बालेकिल्ला आपल्या ताब्यात घेण्याची संधी चालून आली आहे.
त्यासाठी त्यांना सामंत बंधूंची मदत लागणारच आहे. शिंदे शिवसेनेचे एक नेटवर्क सामंत यांनी रत्नागिरीत तयार केले आहे. उदय सामंत पत्रकार परिषदेत माघार घेताना एक वाक्य उद्गारले ते असे की, ‘मिठाचा खडा पडू नये म्हणून आम्ही ही भूमिका घेतली आहे. आता तिकडूनही मिठाचा खडा पडू नये, याची खबरदारी घ्यावी.’ हे निर्देश भाजपच्या दिशेने होते. उमेदवारीवरून गेल्या दोन महिन्यात राणे आणि सामंत यांच्यात अनेक वादाच्या ठिणग्या उडाल्या. सलोख्याचे प्रयत्नही दोघांकडून झाले. आता प्रत्यक्ष लढाईच्या वेळी भाजप आणि शिंदे शिवसेनेत रत्नागिरी जिल्ह्यातील सलोखा कसा राहतो, हे महायुतीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. सिंधुदुर्गात शिंदे शिवसेनेचे नेते मंत्री दीपक केसरकर यांनी यापूर्वीच राणे यांना साथ देण्याचे जाहीर केले आहे. त्याचा फायदा राणे यांना होईलच.
विनायक राऊत यांनी मात्र बर्यापैकी काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्याशी समन्वय ठेवला आहे. चिपळूणला जाऊन त्यांनी राष्ट्रवादीचा मेळावा घेतला, तर सिंधुदुर्गात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात एकजूट वाढविण्याचा प्रयत्न केला. राऊत यांचे संघटन रत्नागिरी जिल्ह्यात जास्त आहे. सिंधुदुर्गात कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांचेही नेटवर्क मजबूत आहे. याचा फायदा राऊत यांना होईलच. राणे आणि राऊत यांच्यातील लढत म्हणजे कट्टर राजकीय विरोधकांमधील कडवी झुंज असणार आहे. एका बाजूने राणे पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार आहेत, तर ‘असाच सामना आम्हाला हवा आहे,’ असे म्हणणारी ठाकरे यांची शिवसेना पूर्ण तयारीनिशी रणांगणात उतरणार असल्याने ही हायव्होल्टेज लढत अख्ख्या महाराष्ट्रात प्रतिष्ठेची बनली आहे.
भाजप प्रथमच लढणार
पूर्वी ज्या ज्या निवडणुका झाल्या, त्यात भाजपने नेहमी शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देत शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार केला. यावेळी प्रथमच भाजपला स्वतःचा उमेदवार उभा करण्याची संधी मिळाली आहे. यावेळी भाजपसोबत शिंदे यांची शिवसेना व राष्ट्रवादी आहे. परंतु, ठाकरे यांची शिवसेना विरोधात आहे. ठाकरेंच्या सोबतीला भाजपऐवजी यावेळी काँग्रेस आणि आणि शरद पवारांची राष्ट्रवादीही आहे.
