दहा बड्या नेत्यांचा निवडणुकीवर प्रभाव

लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या दहा प्रमुख नेत्यांनी सत्तेच्या सारिपाटात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे. काहींनी आपल्या वक्तृत्व शैलीच्या जोरावर, तर काहींनी पडद्याआड राहून आखलेल्या व्यूहरचनेच्या आधारावर निवडणूक प्रचारात स्वतःच्या पक्षाला मोठे महत्त्व प्राप्त करून दिल्याचे दिसून आले आहे. राजकारणातील चाणक्य अशी ओळख असलेले भाजपचे ज्येष्ठ …

दहा बड्या नेत्यांचा निवडणुकीवर प्रभाव

लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या दहा प्रमुख नेत्यांनी सत्तेच्या सारिपाटात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे. काहींनी आपल्या वक्तृत्व शैलीच्या जोरावर, तर काहींनी पडद्याआड राहून आखलेल्या व्यूहरचनेच्या आधारावर निवडणूक प्रचारात स्वतःच्या पक्षाला मोठे महत्त्व प्राप्त करून दिल्याचे दिसून आले आहे. राजकारणातील चाणक्य अशी ओळख असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, तृणमूल काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) ज्येष्ठ नेते शरद पवार, द्रमुक पक्षाचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव आणि समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव या प्रमुख दहा शक्तिशाली नेत्यांचा यामध्ये समावेश आहे. या नेत्यांनी आपल्या पक्षाचा जाहीरनामा जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अक्षरशः जीवाचे रान केले आहे. पक्षांच्या बैठकी, प्रचार दौरे, जाहीर सभा, रोड शो, उमेदवार निश्चिती आणि निवडणुकीच्या इतर कामांसाठी पायाला भिंगरी बांधून संपूर्ण देश ढवळून काढला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधानपदाचा कार्यभार सांभाळतानाच पक्ष कार्यासाठी स्वतःला झोकून देत काम करणार्‍यांमध्ये नरेंद्र मोदी यांचे नाव अग्रस्थानी आहे. ‘अब की बार 400 पार’ हे भाजपचे मिशन पूर्ण करण्यासाठी मोदी यांनी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मित्र पक्षांच्या एनडीए युतीला दणदणीत यश मिळवून देऊन तिसर्‍यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्याचा मोदी यांचा संकल्प आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची बरोबरी करून इतिहास रचण्याची संधी मोदी यांना मिळणार आहे. ‘मोदी की गॅरंटी’ आणि ‘विकसित भारत’ या मुद्द्यांवर मोदी यांनी जबरदस्त प्रचार मोहीम राबवली आहे.
अमित शहा
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्यासह नागरिकत्व कायदा (सीएए) लागू करण्याचा धडाकेबाज निर्णय घेतला. या निर्णयाचा लोकसभा निवडणुकीत भाजपला चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे. राजकारणातील चाणक्य अशी अल्पावधीतच ओळख निर्माण करणारे अमित शहा यांची भाजपची रणनीती आखण्यामध्ये प्रमुख योगदान आहे. त्यांच्या व्यूहरचनेमुळेच भाजपला आतापर्यंत मोठे यश लाभल्याचे दिसून आले आहे.
राहुल गांधी
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा काढून देशातील सामाजिक व राजकीय वातावरण बदलविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. या यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसच्या अध्यक्षपदावर असताना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला आलेल्या अपयशाचा डाग पुसून काढण्यासाठी राहुल गांधी यांनी शेकडो किलोमीटर पायपीट केली. काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला फायदा झाला नसला तरीही राहुल गांधी अपयश विसरून मोठ्या उत्साहाने प्रचारकार्य करीत आहेत. त्यांच्या परिश्रमाचे काय फळ मिळेल, हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
मल्लिकार्जुन खर्गे
गांधी परिवाराकडून काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेणारे मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासाठी ही लोकसभा निवडणूक म्हणजे कठीण परीक्षाच असणार आहे. गेल्या दोन दशकांपासून सत्तेवर असलेल्या भाजपला रोखण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे आहे. काँग्रेस पक्ष सध्या अस्तित्वाची लढाई लढत असताना पक्ष सोडून जाणार्‍या नेत्यांना थांबवून लोकसभा निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळवून देण्यासाठी खर्गे प्रयत्न करीत आहेत.
ममता बॅनर्जी
तृणमूल काँग्रेसच्या नेत्या व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपचा मुकाबला करण्यासाठी विरोधी पक्षांनी स्थापन केलेल्या इंडिया आघाडीपासून स्वतःला आधीपासूनच वेगळे ठेवले आहे. ‘एकला चलो रे’ अशी भूमिका घेऊन ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या नाकी नऊ आणले आहे. संदेशखाली येथे तृणमूल काँग्रेसचा स्थानिक नेता शाहजहा शेखने महिलांचे लैंगिक शोषण करून त्यांच्या जमिनी हडपल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या घटनेमुळे ममता बॅनर्जी बॅकफूटवर आल्या आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
नितीशकुमार
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी लोकसभा निवडणुकीआधीच राजदसोबतची महाआघाडी तोडून पुन्हा एनडीएशी घरोबा करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला जोरदार झटका बसला आहे. राजकीय हवा बघून सत्ताबदल करण्याचे कौशल्य नितीशकुमार यांच्यात आहे. एनडीएत सामील होण्याच्या निर्णयाचा संयुक्त जनता दलाला फायदा होतो की भाजपला, हे निवडणूक निकालातूनच स्पष्ट होणार आहे.
शरद पवार
देशाच्या राजकारणात मराठा स्ट्राँग मॅन म्हणून परिचित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आयुष्याच्या उतारवयात सर्वात मोठ्या संघर्षाला तोंड द्यावे लागत आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा ताबा घेऊन त्यांचे पुतणे अजित पवार यांनी महायुती सरकारला पाठिंबा दिला. लोकसभा निवडणुकीत पवार घराण्याच्या पारंपरिक बारामती मतदार संघात सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना उमदेवार दिली आहे. या सर्व वादळातही शरद पवार यांनी भाजप आणि महायुतीपुढे जोरदार आव्हान उभे केले आहे.
एम. के. स्टॅलिन
भाजप आणि एनडीएच्या विजयी रथाला दक्षिणेत घुसण्यापासून रोखण्याचे मोठे काम द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) पक्षाचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी केले आहे. स्टॅलिन यांनी भाजपच्या विरोधातील काँग्रेस आणि डाव्या पक्षांना सोबत घेऊन विरोधी पक्षांची एकजूट बांधली आहे. स्टॅलिन यांची गांधी कुटुंबीयांशी जवळीक आहे. स्टॅलिन यांच्यामुळे लोकसभा निवडणुकीत तामिळनाडूमध्ये विरोधी पक्षांना चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. द्रमुकच्या नेत्यांनी सनातन धर्माविषयी केलेल्या अवमानजनक विधानामुळे उत्तरेकडील राज्यात विरोधी पक्षांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
तेजस्वी यादव
राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये मोठ्या हुशारीने विरोधी पक्षांचे नेतृत्व सांभाळले आहे. बिहारमधील सत्ता गमावली असली, तरीही राष्ट्रीय राजकारणात त्यांचे महत्त्व वाढले आहे. भाजप आणि एनडीएचा मुकाबला करण्यासाठी तेजस्वी यादव यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे. बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांचे उत्तराधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
अखिलेश यादव
उत्तर प्रदेशात भाजपची विजयी घोडदौड रोखण्यासाठी काँग्रेसचा हात सोबत घेऊन समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी राजकीय परिपक्वता दाखवली आहे. काँग्रेससोबतच्या आघाडीत आपल्या पक्षाकडे 63 आणि काँग्रेसला 17 जागा देण्याच्या निर्णयाचा फायदा समाजवादी पक्षाला मिळण्याचा अखिलेश यादव यांचा अंदाज आहे. आपले वडील मुलायमसिंह यादव यांचा राजकीय वारसा समर्थपणे पुढे नेऊन अखिलेश यादव यांनी देशाच्या राजकारणात आपली वेगळीच छाप सोडली आहे.

Go to Source