बसस्थानक की तळे? स्वारगेट बसस्थानकाचे चित्र : ठोस उपाययोजना कधी करणार
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : पुण्यात बुधवारी (दि. 17) झालेल्या अवकाळी पावसामुळे स्वारगेट स्थानकाला तळ्याचे स्वरूप आले होते. पाऊस पडला की, येथे तळ्याचे स्वरूप येते, येथील हे चित्र दरवर्षी ठरलेले असते. मात्र, यावर ठोस उपाययोजना एसटी प्रशासन कधी करणार, आमची होणारी फरफट कधी थांबवणार, असा सवाल एसटी प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
एसटीच्या पुणे विभागातील महत्त्वाचे स्थानक म्हणून स्वारगेट स्थानकाची ओळख आहे. मात्र, येथेच प्रवाशांना सुविधा मिळत नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. पाऊस पडला की, येथील स्थानकाची इमारत गळते, स्थानक परिसरात मोठमोठे खड्डे पडतात आणि त्यात महत्त्वाचे म्हणजे येथे भले मोठे पाण्याचे तळेच साचते. यातून ये-जा करताना प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते. याकडे एसटीच्या स्वारगेट आगाराच्या व्यवस्थापकांपासून ते वरिष्ठ अधिकार्यांपर्यंत सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. आता नव्याने पदभार घेतलेले पुणे विभागाचे विभाग नियंत्रक प्रमोद नेहुल यावर ठोस उपाययोजना काय करणार, हे पाहावे लागणार आहे.
परिसरात खड्डेच खड्डे
स्वारगेट एसटी स्थानकात बुधवारी झालेल्या पावसामुळे येथे भले मोठे पाण्याचे तळे साचले होते. त्यासोबतच येथील परिसरातील निकृष्ट दर्जाच्या कामाचीदेखील या पावसाने पोलखोल केल्याचे पाहायला मिळाले आहे. येथे भले मोठे खड्डे पडले आहेत. गुरुवारी पाऊस उघडल्यावर प्रवाशांना ते पाहायला मिळाले, याच खड्ड्यांमधून बॅगांचे ओझे घेऊन प्रवाशांना जावे लागत आहे.
दरवर्षी पाऊस पडला की, एसटी स्थानकात अशीच स्थिती पाहायला मिळते, आमच्यासारख्या ज्येष्ठ प्रवाशांनी प्रवास कसा करायचा? तळे साचलेले असते, खड्डे पडलेले असतात. अशी स्थिती अनेक एसटी स्थानकांची आहे. यावर एसटी अधिकार्यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात.
– राजाराम वाघ, प्रवासी, स्वारगेट आगार
स्वारगेट स्थानकातील कामासाठी आवश्यक असलेल्या निधीला मंजुरी मिळाली आहे. तब्बल वीस लाख रुपयांपर्यंतचे काम येथे केले जाणार आहे. येथील खड्डे बुजवून, ड्रेनेज लाइन दुरुस्तीसह संपूर्ण स्वारगेट परिसराचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना यापुढे येथे कोणताही त्रास होणार नाही.
– प्रमोद नेहुल, विभाग नियंत्रक, एसटी, पुणे
हेही वाचा
चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात अकरा वाजेपर्यंत १८.९४ टक्के मतदान
Mumbai Lok Sabha Election : मुंबईत चार जागी तिढा; चित्र अस्पष्ट
नाशिकमध्ये चार दिवसांत दुसऱ्यांदा उच्चांकी पारा