खासदारांसाठी भाजपची आमदारांवर नजर, मताधिक्य घटल्यास आमदारकी विसरा
मुंबई, Bharat Live News Media वृत्तसेवा: देशभरात लोकसभेसाठी ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपने महाराष्ट्रात ‘मिशन ४५’ आखले; मात्र अनेक जागांवर स्थानिक पातळीवरील नाराजी, आमदार आणि खासदारांमधील नाराजीनाट्य दिसून आले. त्यामुळे आता भाजपने आपल्या आमदारांना लोकसभा निवडणुकांसाठी कामाला लावले आहे. खासदारकीच्या उमेदवारांना आपापल्या विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळवून देण्यासाठी आमदारांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्या विधानसभा क्षेत्रातून उमेदवारांना अपेक्षित मताधिक्य मिळणार नाही तिथला हिशेब विधानसभा निवडणुकांच्या वेळी केला जाणार आहे. त्यामुळे उमेदवारासोबत मतभेद असले तरी स्वतःच्या मतदारसंघातील मताधिक्य घटणार नाही, याची काळजी भाजप आमदारांना घ्यावी लागणार आहे. (Lok Sabha Election 2024)
शुक्रवारी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पाच जागांवर मतदान आहे. त्यानंतर उर्वरित चार टप्प्यांत राज्यभरातील इतर जागांसाठी मतदान होईल. त्यासाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारांचे अर्ज भरताना मिरवणुका, त्यानंतरच्या प्रचार सभांचा धडाका सुरू
झाला आहे. महाराष्ट्रात ४५ हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी पक्षाची यंत्रणा कामाला लागली आहे. मात्र काही मतदारसंघांमध्ये खासदारांसोबतच्या मतभेदांमुळे स्थानिक आमदारांसह इतर पदाधिकारी निष्क्रिय राहण्याचा धोका लक्षात घेत भाजपने खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. ज्या आमदाराच्या विधानसभा क्षेत्रात भाजप किंवा महायुतीच्या उमेदवाराला दगाफटका होईल तिथे सहा महिन्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीवेळी वेगळा विचार केला जाईल, असा इशारा आमदारांना देण्यात आला आहे. (Lok Sabha Election 2024)
Lok Sabha Election 2024: आमदारांचे रिपोर्ट कार्ड
भाजपने आपल्या आमदारांना मतदारसंघातून खासदारांसाठी मताधिक्य देणे बंधनकारक केले आहे. विशेष म्हणजे भाजपने आमदारांचे रिपोर्ट कार्ड तयार करण्याचे नक्की केले आहे. आमदारांनी मताधिक्यासाठी काम केले का, त्यांच्या कामाचा उमेदवाराला कसा फायदा झाला, याचे मूल्यमापनही केले जाणार आहे. विधानसभेचे आमदार आणि इच्छुक उमेदवारांना याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आमदारांना आतापासूनच कामाला लागावे लागणार आहे. ज्याची कामगिरी चांगली त्याला विधानसभेला संधी, असे भाजपचे धोरण आहे. त्यामुळे पक्षाने दिलेल्या लोकसभा उमेदवारासोबत कितीही मतभेद असेल तरी स्वतःच्या विधानसभेच्या उमेदवारीसाठी तरी आमदारांना काम करावे लागणार, अशी भाजपच्या आमदार आणि स्थानिक इच्छुकांची स्थिती आहे.