काळजी घ्या! राज्यात उष्माघाताचा कहर; 82 जणांना त्रास
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : मार्च महिन्यापासून तापमान सतत वाढत असल्याने राज्यात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रात बुलडाणा, सिंधुदुर्ग, वर्धा, धुळे, नाशिक, पुणे, कोल्हापूरसह विविध भागांत तापमानात तीव्र वाढ झाल्याने उष्माघाताच्या 82 घटना घडल्या आहेत. हवामान बदलामुळे, उष्णतेच्या लाटा प्रदीर्घ आणि अधिक तीव्र होत असून, त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.
योग्य खबरदारी न घेतल्यास उष्माघाताने गंभीर परिस्थिती उद्भवू शकते. विशेषत: अर्भके, लहान मुले, गरोदर स्त्रिया आणि वृद्धांना उष्माघाताचा धोका अधिक असतो. उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी, शरीरातले पाणी कमी होऊ न देण्याची प्राधान्याने काळजी घेतली पाहिजे. दुपारच्या वेळी बाहेर जाणे टाळावे, बाहेर जाण्याची वेळ आलीच तर बाहेर जाताना आपत्कालीन उपचारांचा संच ठेवावा, सैल सुती कपडे वापरावे, अशा सूचना डॉक्टरांनी दिल्या आहेत.
डॉ. रोहिणी नगरकर म्हणाल्या, ‘उष्माघाताची थोडी लक्षणे दिसली तरी तत्काळ उपचार करणे आवश्यक आहे. रुग्णाला थंडावा असलेल्या ठिकाणी हलवून, भरपूर पाणी द्यावे. ओलसर कपडा वापरून शरीराचे तापमान कमी करण्याचा प्रयत्न करावा. खेळाडू किंवा अन्य कामासाठी दीर्घकाळ ऑफिस किंवा घराबाहेर असणार्या लोकांना शरीरातील पाणी कमी होणार नाही, याची अधिक काळजी घेण्याची गरज आहे. उष्माघात टाळण्यासाठी ठरावीक वेळेच्या अंतराने नियमितपणे पाणी पित राहिले पाहिजे. शरीरातील द्रवपदार्थाची पातळी आणि इलेक्ट्रोलाइट्स पुनर्संचयित करण्यासाठी सलाइनची आवश्यकता असू शकते.’
हेही वाचा
Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | शुक्रवार १९ एप्रिल २०२४
नाशिकमध्ये चार दिवसांत पाऱ्याची दुसऱ्यांदा उच्चांकी पातळी, पारा ४०.७ अंशांवर
T20 World Cup : विराट कोहली टी-20 वर्ल्डकपमध्ये देणार ‘सलामी’?