रायगडमध्ये पारंपरिक दुरंगी लढत
शशिकांत सावंत (रायगड)
रायगड लोकसभा मतदार संघात दुरंगी चुरस होत असून, महायुतीचे सुनील तटकरे विरुद्ध महविकास आघाडीचे अनंत गीते ही पारंपरिक लढत या मतदार संघात पाहायला मिळणार आहे. 2014 साली गीते विरुद्ध तटकरे अशी लढत रायगड लोकसभा मतदार संघात झाली होती. त्यावेळी 2500 च्या मताधिक्याने गीते विजयी झाले होते. त्यानंतर 2019 मध्ये मोदी लाट असूनही महाविकास आघाडीच्या तिकिटावर सुनील तटकरे 25,000 इतके मताधिक्य घेऊन विजयी झाले. त्यानंतर आता तिसर्यांदा तटकरे विरुद्ध गीते अशी लढत 2024 ला होत आहे. यावेळी महायुतीचे उमेदवार हे महाविकास आघाडीचे झाले आहेत आणि महाविकास आघाडीचे उमेदवार महायुतीचे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. याचे कारण राज्यातील बदललेली राजकीय समीकरणे, हे आहे.
रायगड लोकसभा मतदार संघाचा दबदबा हा बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्यापासून पाहायला मिळतो. अंतुले या मतदार संघात तीन वेळा खासदार होते. केंद्रात आरोग्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेले अंतुले केंद्रातही काँग्रेस राजवटीत आपली स्वतःची ओळख टिकवून होते. त्यानंतर मात्र 2009 मध्ये अनंत गीते यांनी अंतुलेंचा पराभव केला आणि गीतेंची रायगडमधील कारकीर्द सुरू झाली. त्यापूर्वी रत्नागिरी लोकसभा मतदार संघात गीते तीन वेळा खासदार होते. मात्र, बदललेल्या मतदारसंघ रचनेत कोकणातील एक मतदार संघ कमी झाला आणि गीते रायगडमधून 2009 साली पहिल्यांदा खासदार झाले. त्यांनीही रायगड मतदार संघात दोन वेळा विजय मिळवून केंद्रात मंत्रिपद भूषवले. आता पुन्हा एकदा गीते-तटकरे अशी प्रतिष्ठेची लढत होत आहे.
रायगड लोकसभा मतदार संघात एकूण 16 लाख एवढे मतदार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि दापोली हे दोन विधानसभा मतदारसंघ आणि रायगड जिल्ह्यातील महाड आणि श्रीवर्धन, अलिबाग आणि पेण हे चार विधानसभा मतदारसंघ या मतदार संघात येत आहेत. शेतकरी कामगार पक्ष सध्या महाविकास आघाडीबरोबर आहे. जो मागच्या निवडणुकीत तटकरेंसोबत होता. त्यामुळे संपूर्ण राजकीय समीकरणे बदलली आहेत. एका बाजूला अजित पवारांबरोबर गेलेले सुनील तटकरे महायुतीचे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. तर उद्धव ठाकरेंसोबत राहिलेले अनंत गीते महविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत.
रेल्वेचा प्रश्न
बॅरिस्टर अंतुले यांच्यानंतर सुनील तटकरेंनी रायगडच्या राजकारणावर आपली छाप टाकली आहे. राज्यात अनेक मंत्रिपदे तटकरेंनी भूषवलेली आहेत. रायगडचे पालकमंत्री म्हणूनही प्रदीर्घ काळ त्यांनी काम केले आहे. राज्यात अर्थमंत्री, पाटबंधारे मंत्री, नगरविकास मंत्री अशा पदावर काम केले आहे. तर अनंत गीते यांनी केंद्रात अवजड उद्योग मंत्री, ऊर्जा मंत्री अशा पदावर काम केले आहे. अलिबागला रेल्वे यावी म्हणून गीतेंनी आपल्या मंत्रिपदाच्या काळात प्रयत्न सुरू केले होते. मात्र, आजही उरणला रेल्वे पोहोचली, तर अलिबागला पोहोचलेली नाही. अलिबाग हे रायगडचे जिल्हा मुख्यालय आहे. त्यामुळे या भागात रेल्वे यावी, यासाठी भविष्यात निवडून येणार्या खासदारांकडून लोकांच्या अपेक्षा असणार आहेत.
या लोकसभा मतदार संघात शिंदे गटाचे तीन आमदार आहेत. तर भाजपचे एक, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे एक आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे एक असे राजकीय समीकरण आहे. उद्धव ठाकरे गटाचे भास्कर जाधव या फर्डे वक्ते असलेल्या आमदारांचा मतदारसंघही रायगड मतदार संघात येत आहे. या मतदार संघात ठाकरेंनी दापोलीमध्ये माजी आमदार संजय कदम यांना आपल्या पक्षात घेऊन त्यांना विधानसभेची तयारी करण्यास सांगितले आहे.
शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या विरोधात रिंगणात उतरणार असल्याने त्यांनी ठाकरे गटाच्या बाजूने दापोलीत प्रयत्न सुरू केले आहेत. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम आहेत. त्यामुळे त्यांनीही महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. महाड विधानसभा हा शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांचा मतदारसंघ आहे. मात्र, या मतदार संघातही उद्धव ठाकरे गटाला माजी आमदार कै. माणिक जगताप यांची कन्या स्नेहल जगताप यांना आपल्या पक्षात घेऊन महाडमध्येही आपल्या पक्षाचे आव्हान उभे केले आहे.
श्रीवर्धन हा सुनील तटकरे यांचा स्वतःचा विधानसभा मतदारसंघ आहे. येथे त्यांची कन्या राज्यात महिला बालकल्याण मंत्री असलेल्या आदिती तटकरे या आमदार आहेत. श्रीवर्धन हा तटकरेंसाठी अधिक मताधिक्य देणारा मतदारसंघ आहे. ठाकरे गटाची मदार ही काँग्रेस आणि सुनील तटकरेंचे बंधू अनिल तटकरे यांच्यावर असणार आहे. माजी आमदार अनिल तटकरे शरद पवार गटात असून, गीतेंचा अर्ज दाखल करण्यासाठी ते आघाडीवर होते. अलिबाग हा शेकापचा बालेकिल्ला मानला जातो. मागच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या महेंद्र दळवींनी शेकापचा पराभव केला होता. मात्र, यावेळी शेकापने अस्तित्वाची लढाई म्हणून संघर्ष सुरू केला आहे. पेण विधानसभा मतदार संघात भाजपचे रवींद्र पाटील हे आमदार आहेत.
शेकापचे माजी आमदार धैर्यशील पाटील रायगडमध्ये महायुतीकडून उमेदवारी मिळेल म्हणून भाजपत गेले होते. मात्र, सुनील तटकरे भाजपसोबत आल्यामुळे त्यांचा पत्ता कट झाला आहे. तरीही ते तटकरेंच्या प्रचारात सक्रिय आहेत. शिवसेनेचे ठाकरे गटाचे किशोर जैन हे महविकास आघाडीत कार्यरत आहेत. त्यांनी मागील विधानसभा निवडणुकीत 40,000 मते घेतली होती. त्यामुळे ठाकरे गटाचाही येथे बर्यापैकी मतदार आहे. तरीही धैर्यशील पाटलांमुळे या विधानसभा मतदार संघात महायुतीचे पारडे अधिक भक्कम आहे.
तर भास्कर जाधवांमुळे गुहागर विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे पारडे अधिक भक्कम आहे. एकूण दोन्ही उमेदवार तेवढेच सक्षम आणि परिचित असल्याने चुरस अपेक्षित आहे. वंचित आघाडीने मराठा समाजाच्या चळवळीतील नेत्या कुमुदिनी सावंत यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, त्यांचा संपूर्ण लोकसभा मतदार संघात किती प्रभाव पडेल, हे सांगता येणे अवघड आहे. कुमुदिनी सावंत या कुणाची मते घेणार, यावर महाड विधानसभेतील मताधिक्य अवलंबून राहणार आहे. एकूण रायगड लोकसभा मतदारसंघ हा वंचितच्या उमेदवारानंतरही दुरंगी चुरशीच्या लढतीकडे वाटचाल करत आहे. महायुतीने येथे मोठी ताकद लावली आहे. तर महाविकास आघाडीमध्ये असलेले घटक पक्ष काँग्रेस, शेकाप आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांनीही कंबर कसली आहे. त्यामुळे सामना रंगतदार स्थितीत आहे.