कोल्हापूरच्या लढतीत नेत्यांची कसोटी; बंडखोरी नसली तरी…
चंद्रशेखर माताडे
कोल्हापूर लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे शाहू महाराज विरुद्ध शिंदे शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्यात सरळ लढत होत आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीच्या सामन्यात आपापल्या उमेदवारांच्या विजयासाठी आता नेत्यांची कसोटी आहे. कोल्हापुरात सरळ लढत असली, तरी मतदारांना आणण्यातच नेत्यांची खरी कसोटी लागणार आहे. मतदार संघाचे राजकीय चित्र बदलणारी निवडणूक असल्याने सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ( Kolhapur Lok Sabha Election )
2019 पेक्षा यंदाची निवडणूक वेगळी आहे. तेव्हा पक्षांतर्गत संघर्ष होता. आता प्रत्येक पक्षाला व प्रत्येक नेत्याला आपली ताकद पणाला लावावी लागणार आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेचे संजय मंडलिक यांनी राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांच्यावर एकतर्फी विजय मिळविला होता. कारण तेव्हा सतेज पाटील हे काँग्रेस नेते वैयक्तिक भूमिकेमुळे राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांच्या विरोधात होते. ‘आमचं ठरलंय’ ही त्यांची टॅगलाईन राज्यभर पोहोचली होती. तसेच पक्षांतर्गत विरोधातून राष्ट्रवादीतील नाराजीचाही फटका महाडिक यांना बसला होता.
त्यावेळी पक्षांतर्गत नाराजीचा फटका महाडिक यांना बसला, तर ही नाराजी मंडलिक यांना खासदार करून गेली. यंदा ना नाराजी ना लाट, त्यामुळे उमेदवार व त्यांचे पाठीराखे नेते यांचीच कसोटी आहे. आपली भूमिका मतदारांना पटविणे व मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यातच त्यांचा कस लागणार आहे.
उत्तरमध्ये महापालिकेची जोडणी
कोल्हापूर उत्तरमध्ये विद्यमान आमदार काँग्रेसचे आहेत. या मतदार संघाने आजवर चार निवडणुकीत (एक पोटनिवडणूक) काँग्रेसला कौल दिला आहे. लालासाहेब यादव, मालोजीराजे, चंद्रकांत जाधव व त्यांच्या अकाली निधनानंतर पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी जयश्री जाधव या काँग्रेस आमदारांना मतदारांनी कौल दिला. त्यापूर्वी पाच निवडणुकीत शिवसेनला कौल दिला आहे. सुरेश साळोखे, राजेश क्षीरसागर हे दोन-दोन वेळा आमदार झाले. या मतदार संघात शिवसेनेचीही ताकद आहे. शिवसेनेत फूट पडली तरी संघटना पातळीवर त्याची झळ फारशी बसलेली नाही. राजेश क्षीरसागर शिंदे शिवसेनेत आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचे समर्थक आहेत. भाजपची ताकद म्हणजे केवळ महाडिकच. राष्ट्रवादी शरद पवार गट म्हणजे व्ही. बी. पाटील, तर अजित पवार गट मंडलिक यांच्याबरोबर आहे. ‘उत्तर’मध्ये सतेज पाटील बारकाईने लक्ष ठेवून आहेत, तर मालोजीराजे भागाभागात संपर्क ठेवून आहेत.
कोल्हापूर दक्षिण रणभूमी
कोल्हापूर दक्षिणमध्ये सतेज पाटील व धनंजय महाडिक हे दोनच पक्ष. तेथे तीन निवडणुकीत दोनवेळा काँग्रेस व एकवेळा भाजपला मतदारांनी संधी दिली आहे. येथे कायमच निवडणुकीचे वातावरण असते व वातावरणात तणावही असतो. आता काँग्रेसचे ऋतुराज पाटील हे आमदार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांचा सामना हा माजी आमदार अमल महाडिक यांच्याशी किंवा महाडिक कुटुंबातील सदस्याशी होणार आहे. त्यामुळे निवडणूक लोकसभेची असली, तरी विधानसभेसाठी तेथे ताकद आजमावली जात आहे. येथे विधानसभेची सेमीफायनल अशीच चुरस असून, दोन्ही बाजूंनी ताकद पणाला लावली जात आहे. सतेज पाटील व धनंजय महाडिक येथे आपल्या कार्यकर्त्यांना ताकद देत आहेत.
मनपा निवडणुकीची तयारी
कोल्हापूर महापालिकेची निवडणुकीच्या दृष्टीने कोल्हापूर उत्तर व कोल्हापूर दक्षिण या दोन मतदार संघांकडे नेत्यांचे बारीक लक्ष आहे. त्यासाठी आतापासूनच पेरणी केली जात आहे. माजी नगरसेवकांबरोबरच इच्छुक युवा पिढीला सक्रिय केले जात आहे. ( Kolhapur Lok Sabha Election )
करवीरला पी. एन. व नरके यांची विधानसभेची सेमीफायनल
करवीर हा काँग्रेसचा बालेकिल्ला. पी. एन. पाटील यांनी सगळी ताकद येथे पणाला लावली आहे. महाविकास आघाडी असल्याने शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी शरद पवार व ठाकरे शिवसेना आहे. तर विरोधात माजी आमदार चंद्रदीप नरके लढत आहेत. शिंदे शिवसेना, भाजप, अजित पवार यांची राष्ट्रवादी सोबत आहे. करवीरने शाहू महाराज यांचा अर्ज दाखल करतेवेळी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. पी. एन. पाटील यांनी तर कागलमध्येही शाहू महाराज यांना मोठे मताधिक्य मिळेल, असे सांगून हसन मुश्रीफ व संजय मंडलिक यांना आव्हान दिले आहे.
कागलला तीन गट मंडलिकांकडे केवळ संजय घाटगे काँग्रेसकडे
कागलमध्ये संजय मंडलिक यांच्यामागे तीन गट आहेत. केवळ संजय घाटगे यांचा गट शाहू महाराज यांच्या प्रचारात आहे. संजय मंडलिक, हसन मुश्रीफ व समरजित घाटगे गटाची पूर्ण ताकद ही मंडलिक यांच्यामागे आहे. कागलमध्ये निवडणूक लोेकसभेची असली, तरी तयारी विधानसभा निवडणुकीची सुरू आहे. हसन मुश्रीफ यांनीच तसे जाहीर केले. मंडलिक यांना मदत करताना विधानसभेवेळी तुमची भूमिका काय, असे विचारून त्यांची अडचण करू नका, असे मुश्रीफ यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले. एवढेच नव्हे तर आपली व समरजित घाटगे यांची कुस्ती ठरल्याची कबुलीही दिली. त्यामुळे कागलला मंडलिक यांना मते मिळताना आपल्या गटाची मते किती, याच्या बुथवार आकडेवारीकडे मुश्रीफ व घाटगे यांचे लक्ष असेल.
कारखान्यात विरोध, लोकसभेसाठी एकत्र
राधानगरी भुदरगडला शिंदे शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर व बिद्री कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांचे हाडवैर जिल्ह्याला माहीत आहे. मात्र, ते आता मंडलिक यांच्या प्रचारात आहेत. तर काही महिन्यापूर्वी झालेल्या बिद्रीच्या निवडणुकीत आपल्या मेहुण्याविरुद्ध आबिटकर यांच्या हातात हात घालून पॅनेल केलेले ए. वाय. पाटील यांनी आबिटकर यांची साथ सोडली आहे. तर के. पी. पाटील नाईलाजाने हसन मुश्रीफ यांच्याबरोबर आहेत. माजी आमदार दिनकरराव जाधव गटाने शाहू महाराज यांचा अर्ज भरताना शक्तिप्रदर्शन केले.
आजरा, चंदगड, गडहिंग्लजला नेत्यांचीच भाऊगर्दी
चंदगड, गडहिंग्लजमध्ये जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांनी मोठ्या जोेडण्या केल्या आहेत. माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या कन्या स्वाती कोरी, अप्पी पाटील यांना काँग्रेसबरोबर आणून त्यांनी ताकद दाखविली आहे. तसेच बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या नंदिनी बाभूळकर यांनाही या निवडणुकीच्या निमित्ताने सक्रिय केले आहे. चंदगडला संजय मंडलिक यांचे मेहुणे राजेश पाटील आमदार आहेत. तर आजरा कारखाना मुश्रीफ गटाच्या ताब्यात आहे. आजरा, चंदगड व गडहिंग्लजला स्थानिक नेत्यांमध्येच चुरस आहे.