लोकसभेच्या निवडणुकीत विधानसभेची सेटिंग्ज
संजय पाठक (निवडणुक विशेष)
सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात कधी नव्हे इतकी मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. नेत्यांचे पक्षबदल, कोलांट्याउड्या अन् बदलत्या निष्ठांनी सगळेच संभ्रमात आहेत. नव्याने आकाराला आलेली राजकीय समीकरणे, गट-तट आणि पक्षीय राजकारण पाहता सगळेच नेते लोकसभेच्या कमी अन् विधानसभेच्या निवडणुकीची सेटिंग्ज आतापासून लावण्यातच मश्गूल असल्याचे दिसते. कालपरवापर्यंत भाजपवर टीका करणार्यांनी आता भाजपच्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी घेतली आहे, तर ज्यांना विरोध करण्यावर आपल्या राजकीय अस्तित्वाचा पाया आहे, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्यात काही नेते धन्यता मानू लागले आहेत.
मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या भाषेत बोलायचे झाल्यास यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यातील राजकीय कॅरम विचित्र फुटला आहे. अगदी परस्पर विरुद्ध नेते एकमेकांची साथ करू लागले आहेत, तर पक्के मित्र असलेले नेते आता पक्के वैरी झाले आहेत. म्हणूनच राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो, हे वाक्य किमान सोलापूरच्या सध्याच्या परिस्थितीकडे पाहून तरी शंभर टक्के खरे वाटते.
खरेतर लोकसभा निवडणूक ही देशापुढील प्रश्न आणि खासदाराच्या, उमेदवाराच्या कामाचे मूल्यमापन यावर व्हायला हवी. परंतु, महायुती असो की महाआघाडी किंवा अन्य छोटे मोठे राजकीय पक्ष या सर्वांनी त्या उमेदवारापेक्षा त्याला मदत करणारे पाठीमागे कोणकोणते नेते आहेत, त्या लोकसभा मतदार संघात किती विधानसभा मतदार संघावर आपले वर्चस्व आहे, यावर तिकीट दिले आहे. उमेदवार उभे केले आहेत. बरं इथंवर ठीक होते.
पण, यापुढे जात महायुती व महाआघाडीने जणू एकप्रकारे मूक संदेशच दुसर्या तिसर्या फळीतील नेत्यांमध्ये पेरला आहे तो म्हणजे, ‘…बघा बाबा, तुमच्या मतदार संघातून किंवा तुमच्या प्रभावक्षेत्रातून जर लोकसभेच्या उमेदवाराला मताधिक्य कमी मिळाले, तर विधानसभा निवडणुकीत आम्हाला तुमचा विचार करावा लागेल.’ यामुळे ही निवडणूक लोकसभा उमेदवाराची कमी अन् विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांचीच जास्त झाली आहे. याशिवाय जे खरोखरच प्रभावी नेते आहेत, त्यांना महायुती व महाआघाडीकडून मानाचे पान देत म्हणजे प्रसंगी स्पेशल हेलिकॉप्टर पाठवून मांडवली करण्यासाठी बोलावले जात आहे. त्यांना भविष्यात मंत्रिपदासह, एखाद्या महामंडळाचे स्वप्न दाखवले जात आहे.
माढा लोकसभा मतदार संघात विद्यामान खासदार व महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना गत निवडणुकीत प्रखर विरोध केलेले माढ्याचे आ. बबनदादा शिंदे, करमाळ्याचे आ. संजय शिंदे यांनी यंदाच्या निवडणुकीत महायुतीच्या निंबाळकरांना निवडून आणण्याचा विडा उचलला आहे. कट्टर विरोधक एकत्र झाल्याचे एक हे उदाहरण आहे. यापुढे जात ज्या मोहिते-पाटलांना विरोध करण्यावर आपले राजकीय करिअर भक्कम आहे, त्या मोहिते-पाटलांच्या बाजूने त्यांचे कट्टर विरोधक उत्तम जानकर सध्या विचार करू लागले आहेत. अर्थात, या दोघांच्या या यू टर्नच्या मागे विधानसभा निवडणुकीचे सेटिंग्ज आहेत, हे उघड गुपित आहे. अशीच परिस्थिती सोलापूर लोकसभा मतदार संघातही आहे.
केंद्रीय माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या आ. प्रणिती शिंदे यांच्याविरोधात असलेले महेश कोठे, माकपचे माजी आ. नरसय्या आडम यांच्यासह अनेक छोटेमोठे नेते यंदा मात्र शिंदेंच्या बाजूने प्रचाराच्या रणांगणात आहेत. एरव्ही एकमेकांना पाण्यात पाहणारे नेते या निवडणुकीच्या निमित्ताने एकाच मंचावर दिसत आहेत. ही सोयीच्या राजकारणासाठी केलेली तडजोड असली तरी आपण जनतेला फसवत आहोत, हे या नेत्यांच्या गावीही नाही.
…तर राजकीय वैरत्व येऊ शकते
एक मात्र खरे की लोकसभा निवडणुकीत नेत्यांनी सोईस्करपणे केलेल्या आघाड्या, मैत्री तेव्हाच टिकणार आहे जेव्हा ठरल्याप्रमाणे विधानसभा मतदारसंघातून संबंधित उमेदवारास मताधिक्क्य मिळेल. ते न मिळाल्यास लोकसभा निवडणुकीतील मैत्री विधानसभा निवडणुकीत राजकीय वैरत्वाकडे झुकण्याची शक्यता नाकारता येत नाही.