गोव्याच्या पल्लवी धेंपेयांची पतीसह मालमत्ता 1,400 कोटींपर्यंत!
पणजी : Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने प्रसिद्ध उद्योजक श्रीनिवास धेेंपे यांची पत्नी पल्लवी धेंपे यांना दक्षिण गोव्यातून उमेदवारी दिली आहे. त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची वैयक्तिक मालमत्ता 255 कोटी रुपये जाहीर केली आहे. यात बँक ऑफ सिंगापूरमधील 3 कोटी 32 लाख 85,702 रुपयांच्या बाँडस्चा समावेश आहे. पती श्रीनिवास धेंपे यांच्या मालमत्तेसह पल्लवी धेंपे यांची मालमत्ता सुमारे 1,400 कोटी रुपयांपर्यंत आहे. पल्लवी यांचे दागिने 5.70 कोटींचे आहेत, तर पती श्रीनिवास यांच्याकडे 994.83 कोटींची संपत्ती आहे. ( South Goa Lok Sabha )
निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात धेंपे यांच्या बँक खात्यांत सुमारे 9.91 कोटी रुपये आहेत. 217.11 कोटींचे एकूण बाँडस्, 12.92 कोटींची बचत, 2.54 कोटी रुपयांची वाहने, सुमारे 5.70 कोटींचे दागिने, तर 9.75 कोटी रुपये मिळून त्यांच्याकडे सुमारे 255.44 कोटींची मालमत्ता आहे. पल्लवी या उद्योजिका असून, त्यांनी एमआयटी पुणेमधून बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे.
पल्लवी आणि श्रीनिवास धेंपे यांची एकूण स्थावर मालमत्ता 101.40 कोटींची असून, पल्लवी यांच्या नावावर 28.20 कोटींची, तर श्रीनिवास यांच्या नावावर 83.20 कोटींची मालमत्ता आहे.
गोव्यातील विविध ठिकाणी व्यावसायिक मालमत्ता त्यांच्या नावावर असण्याबरोबरच मुंबई, लंडन व दुबई येथेही त्यांचे अपार्टमेंटस् आहेत. श्रीनिवास धेंपे यांची गोव्यासह तामिळनाडू आणि चेन्नई येथे शेतजमीन असून, त्यांनी गुंतवणूक, पोस्टल बचत आणि विमा यासाठीही कोट्यवधी रुपये ठेवले आहेत. पल्लवी या पूर्वाश्रमीचे प्रसिद्ध खाण उद्योजक तिंबले यांच्या कन्या आहेत.
विरोधकांकडून टीका
पल्लवी धेंपे यांना भाजपने उमेदवारी जाहीर करताच धेंपे उद्योग समूहाने भाजपला निवडणूक रोख्यांमधून 2.4 कोटी दिले होते. त्यात धेंपे समूहाचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे यांनी 1.25 कोटी व उर्वरित रक्कम ही इतर समूहामधील इतर कंपन्यांमार्फत गुंतवली होती. त्यामुळेच पल्लवी धेंपे यांना उमेदवारी दिल्याची चर्चा लोकांमध्ये होती. विरोधकांनीही याच मुद्द्याचा वापर करून भाजपवर टीका केली आहे.
पती श्रीनिवास धेंपे यांची मालमत्ता
एकूण मालमत्ता : 994.83 कोटी बँक ठेवी : 24 कोटी 5 लाख 53 हजार 659 रुपये पोस्टातील बचत, विमा पॉलिसी : 67 कोटी 45 लाख 85 हजार 940 रुपये इतर मालमत्ता : 9 कोटी 44 लाख 64 हजार 595 रुपये ( South Goa Lok Sabha )