अजित पवारांवर गुन्हा दाखल करा; अंबादास दानवे यांची मागणी
छत्रपती संभाजीनगर, Bharat Live News Media वृत्तसेवा : मतदानयंत्राची बटणे कचा कचा दाबा नाहीतर निधी देताना माझा हात आखडता घेऊ, असे वक्तव्य करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गुरुवारी केली. निवडणूक आयोग झोपला आहे का? असा सवालही दानवे यांनी केला.
अंबादास दानवे यांनी गुरुवारी छत्रपती संभाजीनगरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी दानवे म्हणाले, निवडणूक आयोगाचे लक्ष केवळ विरोधी पक्षांवरच आहे. बटन दाबा आणि निधी घ्या, हा काय धंदा आहे का? अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा, त्याबाबत आम्हीही तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाविकास आघाडीचे जवळपास सर्व उमेदवार जाहीर झाले आहेत. प्रचारही सुरू झाला आहे. पण महायुतीला अजूनही उमेदवार सापडत नाहीत. त्यामुळे आता त्यांच्यातही उद्गविता दिसून येत आहे. छगन भुजबळ यांचे कालचे वक्तव्य हे त्याचेच उदाहरण आहे. भाजपला सतत मोदी आणि शाह यांना प्रचारासाठी महाराष्ट्रात आणावे लागत आहे, हे आमचे यश आहे, असेही दानवे म्हणाले.
एमआयएमने अकोल्यात वंचितला पाठिंबा दिला आहे. याबद्दल ते म्हणाले, ओवेसी यांचे प्रकाश आंबेडकरांविषयीचे प्रेम पुतणा मावशीसारखे आहे. मागीलवेळी त्यांनी वंचितचा पाठिंबा घेतला पण सोलापूरात प्रकाश आंबेडकरांना मते दिली नाहीत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यावेळी प्रलोभनाला बळी ठरणार नाहीत, असे दानवे म्हणाले.
भाजप हा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे पक्ष संपविण्याचे काम करत आहे. दोन्ही पक्षांचे उमेदवार ठरविणे आणि उमेदवार बदलण्याचा निर्णयही भाजपच घेत आहे. सर्व पक्ष संपवून राज्यात केवळ भाजपचं ठेवण्याचे भाजपचे स्वप्न आहे, अशी टीका दानवे यांनी केली.