‘माझ्या पत्नीला तुरुंगात काही झालं तर…’ : इम्रान खान यांची लष्कर प्रमुखांना धमकी
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : माझी पत्नी बुशरा बीबी हिच्या तुरुंगवासासाठी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर जबाबदार आहेत. तुरुंगात पत्नीला काहीही झाले तरी मी असीम मुनीरला सोडणार नाही, अशी थेट धमकीच पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे संस्थापक आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली आहे. भ्रष्टाचार प्रकरणी शिक्षा झालेले इम्रान खान हे सध्या कारागृहात आहेत.
इम्रान खान यांच्याबरोबर बेकायदेशीर विवाह केल्याप्रकरणी बुशरा बीबी यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. सध्या त्यांना इस्लामाबादमधील बनी गाला येथील त्यांच्या निवासस्थानी नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी बुधवारी पाकिस्तानी लष्करावर गंभीर आरोप केले. यावेळी ते म्हणाले की, त्यांची पत्नी बुशरा बीबी यांच्या तुरुंगवासासाठी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर थेट जबाबदार असल्याचे त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
माझ्या पत्नीला झालेल्या शिक्षेत जनरल असीम मुनीरचा थेट सहभाग आहे. न्यायाधीशांना बुशरा यांच्याबाबत निर्णय घेण्यास भाग पाडले, असा आरोप करत माझ्या पत्नीला तुरुंगात काही झाले तरी मी असीम मुनीरला सोडणार नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत असीम मुनीर यांचे असंवैधानिक आणि बेकायदेशीर कृती उघड करीन , असे आव्हानही त्यांनी दिले आहे.
पाकिस्तानमध्ये जंगल राज
पाकिस्तानमध्ये जंगल राज सुरु आहे. सर्व काही जंगलाचा राजा ( लष्कर प्रमुख) करत आहे. जंगलाच्या राजाला हवे तेव्हा ते नवाझ शरीफ यांचे सर्व खटले माफ करतात. हवे तेव्हा पाच दिवसांत तीन प्रकरणांत शिक्षा देतात, असा आरोपही इम्रान खान यांनी केला आहे. जंगल कायद्यामुळे देशात गुंतवणूक येणार नाही. देशात कायद्याचे राज्य असेल तेव्हाच गुंतवणूक येईल.पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या कर्जाने देवून नव्हे तर गुंतवणुकीद्वारे पाकिस्तानची अर्थव्यवस्था स्थिर होईल, असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, खान यांनी केलेल्या गंभीर आरोपांवर लष्कराने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.