किल्ले रायगडावर आता चार ट्रॉलींमधून होणार शिवभक्तांचा प्रवास
इलियास ढोकले
नाते: किल्ले रायगडावर आबाल वृद्धांसाठी सुरू असलेल्या रोपवे प्राधिकरणाने येत्या श्री हनुमान जयंती पासून आपल्या नियमित ट्रॉलीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला असून आता तीन ऐवजी चार ट्रॉली मधून प्रत्येकी सहा नुसार 24 शिवभक्तांचा प्रवास होणार आहे, ही सेवा श्री हनुमान जयंती पासून लोकार्पित होईल अशी माहिती रोपवे प्राधिकरणाच्या व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.
यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, रायगडावर जाण्यासाठी लहान मुले व अबाल वृद्धांना होणारा शारीरिक त्रास लक्षात घेऊन या हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर अबाल वृद्धांना जाण्यासाठी केंद्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाच्या परवानगीने 3 एप्रिल 1996 रोजी तत्कालीन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक राजेंद्रसिंहजी यांच्या हस्ते सदरचा रोपवे लोकार्पित करण्यात आला होता.
या रोपवे अर्थात रज्जूरथ कार्यामध्ये आता एका ट्रॉलीची वाढ करण्यात आली असून आता एका वेळेला दोन्ही दिशेने चार ट्रॉली मधून प्रत्येकी 24 शिवभक्तांचा प्रवास सुकर होणार आहे.
या संदर्भात रायगड रोपवे प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार या चौथ्या ट्रॉलीच्या आवश्यक असलेल्या सर्व तांत्रिक चाचण्या शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गेल्या काही दिवसांमध्ये घेण्यात आले असून त्यांनी या सर्व चाचण्यांच्या तपासणी यांची चौथ्या ट्रॉलीला परवानगी दिल्याची माहिती व्यवस्थापनाकडून प्राप्त झाली आहे.
सद्यस्थितीमध्ये पाचाड येथील हिरकणी वाडी येथून अप्पर स्टेशन येथे जाण्यासाठी साडेचार ते पाच मिनिटांचा कालावधी लागतो या रोपवे मार्फत जाण्यासाठी शिवभक्तांना 310 रिटर्न तिकीट उपलब्ध आहे.
लहान मुलांसाठी तीन फुटापर्यंत उंचीच्या बालकांना मोफत सेवा देण्यात येत असून तीन ते चार फूट उंचीच्या बालकांना अर्ध्या तिकिटात तर शालेय विद्यार्थ्यांना 190 रिटर्न तर सिंगल 130 सातवी पर्यंत तर आठवी पुढे 225 रिटर्न व 190 सिंगल अशा पद्धतीने आकारणी केली जात असल्याचे सांगण्यात आले ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सवलत दोनशे रुपयापर्यंत कमी करण्यात आली असून अपंगांसाठी ही सेवा मोफत दिली जात आहे.
रोपवे सुरू झाल्यापासून आज पावतो शिवभक्तांच्या सुरक्षिततेचा भाग म्हणून रोपवे प्रशासनाने विमा कवच शिवभक्तांना देत आहे.
या ठिकाणी तिकीट विक्रीच्या वळच येणार्या शिवभक्तांना दहा मिनिटांची किल्ले रायगड कसा व का पाहावा या संदर्भातील फिल्म व म्युझियम ची माहिती दिली जाते.
तमाम देशातील शिवभक्त नागरिकांना किल्ले रायगडावर येण्यासाठी आता ऑनलाइन सुविधा उपलब्ध असून याकरिता “रायगड रोपवे डॉट कॉम” वर जाऊन आपण आपली तिकिटे निश्चित करू शकता अशी माहिती व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.
मागील काही वर्षापासून किल्ले रायगडावर जाणाऱ्या शिवभक्तांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली असून प्रतिवर्षी 500 ते 700 प्रति दिनी शिवभक्त गडावर जात असल्याचे व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले.
किल्ले रायगडावर तसेच पायथ्याशी रोपवे प्रशासनामार्फत न्याहारी व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या निर्देशानुसार आता किल्ले रायगडावर रात्रीचा मुक्काम करण्यास प्रतिबंध करण्यात आल्याने सायंकाळी उशिरापर्यंत ही रोपवे सेवा सुरू असते, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान शिवभक्तांच्या सोयीसाठी रोपवे प्रशासनाने चौथी ट्रॉली सुरू करून अधिक संख्येने एका वेळेला शिवभक्तांना उपलब्ध केलेल्या या व्यवस्थेसंदर्भात शिवभक्तांकडून रोपवे प्रशासन स्थानिक प्रशासन तसेच केंद्रीय पुरातत्त्व विभागाला धन्यवाद देण्यात येत आहेत.
Latest Marathi News किल्ले रायगडावर आता चार ट्रॉलींमधून होणार शिवभक्तांचा प्रवास Brought to You By : Bharat Live News Media.