परिणय फुके यांच्या वाहनाला भीषण अपघात; घातपाताचा संशय?

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : माजी मंत्री आणि भंडारा- गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या वाहनाला मंगळवारी (दि.१६) मध्यरात्री राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातातून डॉ. फुके बचावले असून हा अपघात की घातपात, असा संशय व्यक्त केला जात आहे.
डॉ. परिणय फुके हे मंगळवारी रात्री भंडारा लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोळदे करडगाव येथे गेले होते. सभा आणि गावकऱ्यांशी चर्चा आटोपून रात्री उशिरा ते लाखनी येथे परत येत असताना रात्री २ वाजताच्या सुमारास साकोली जवळ एक अज्ञात वाहन डॉ. फुके यांच्या वाहनासमोर आले, पण त्यांच्या चालकाने समयसूचकता दाखवली. त्यामुळे ही धडक टळली. मात्र त्यामागे असलेले त्यांच्या ताफ्यातील एक वाहन महामार्गावरील दुभाजकावर आदळले. यात या गाडीचे प्रचंड नुकसान झाले. वाहनातील सुरक्षा रक्षक आणि इतर सहकाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली. सबंधित अज्ञात वाहन नंतर पळून गेले. चालकाने प्रसंगावधान राखल्याने डॉ. फुके या भीषण अपघातातून बचावले. दरम्यान, हा अपघात आहे की घातपात अशी शंका व्यक्त केली जात आहे.
काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि रामटेकचे आमदार आशीष जैस्वाल यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला होता. एका महिला वकीलासह दोघे जखमी झाले. पटोले यांनीही अपघातानंतर घातपाताचा आरोप केला होता. सत्ताधारी पक्षातर्फे तो फेटाळत पुराव्याची मागणी केली होती. एकंदरीत आता भंडारा मतदारसंघात घातपाताच्या संशयातून राजकारण अधिक तापण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
काँग्रेस लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहे: नितीन गडकरी
महामार्ग मंत्रालयात मोठा भ्रष्टाचार: पवन खेरा यांचा गडकरी यांच्यावर निशाणा
विजय वडेट्टीवार भाजपमध्ये जाणार नाहीत: बाळासाहेब थोरात
Latest Marathi News परिणय फुके यांच्या वाहनाला भीषण अपघात; घातपाताचा संशय? Brought to You By : Bharat Live News Media.
