उद्योग विश्वातले वादळ

सहारा इंडियाचे संस्थापक सुब्रत रॉय यांनी अनेक क्षेत्रांत पंख पसरले. अक्षरशः शून्यातून त्यांनी विश्व साकारले. मात्र झटपट यशस्वी होण्याच्या आकांक्षेतून केलेल्या करामतींमुळे ते नेहमीच वादग्रस्त राहिले. समाजाकडून आम्हाला जे मिळते, त्यापेक्षा कितीतरी अधिक पटींनी आम्ही समाजाला परत करतो, असे जेआरडी टाटा म्हणत असत. त्यांच्या टाटा ट्रस्टतर्फे असंख्य समाजोपयोगी कामांना मदत केली जाते. शंतनुराव किर्लोस्कर यांनी … The post उद्योग विश्वातले वादळ appeared first on पुढारी.
#image_title

उद्योग विश्वातले वादळ

हेमंत देसाई

सहारा इंडियाचे संस्थापक सुब्रत रॉय यांनी अनेक क्षेत्रांत पंख पसरले. अक्षरशः शून्यातून त्यांनी विश्व साकारले. मात्र झटपट यशस्वी होण्याच्या आकांक्षेतून केलेल्या करामतींमुळे ते नेहमीच वादग्रस्त राहिले.
समाजाकडून आम्हाला जे मिळते, त्यापेक्षा कितीतरी अधिक पटींनी आम्ही समाजाला परत करतो, असे जेआरडी टाटा म्हणत असत. त्यांच्या टाटा ट्रस्टतर्फे असंख्य समाजोपयोगी कामांना मदत केली जाते. शंतनुराव किर्लोस्कर यांनी अत्यंत प्रामाणिकपणे व्यवसाय करून आणि प्रचंड कर्तृत्व गाजवून, महाराष्ट्राचे नाव जगभर नेले. ज्ञानप्रबोधिनी, राजा केळकर वस्तुसंग्रहालय, बाळासाहेब पंतप्रतिनिधी स्मारक अशा संस्थांच्या उभारणीस त्यांनी मदत केली. पानशेतच्या पुरामध्ये पुणे बुडाले, तेव्हाही त्यांनी निरपेक्षतेने मदत केली. अदी गोदरेज यांनी गोदरेज समूहाचा चौफेर विकास अत्यंत सत्शीलपणे केला आणि पारदर्शकतेने व्यवसाय साधला.
देशात काही औद्योगिक घराणे अशी आहेत की, ज्यांच्याबद्दल समाजात आदर आहे आणि त्यांच्याबद्दल लोकांना आत्मीयतादेखील वाटते. काही उद्योगपती हे धीम्या गतीने प्रगती करतात आणि देशाच्या संपत्तीत मौलिक भर टाकतात; तर काही उद्योगपती असे आहेत की, ज्यांनी अत्यंत वेगाने विकास साधला. ज्यांना स्थानिकरीत्या देखील ओळख नव्हती, त्यांनी देश-विदेशात आपले नाव दुमदुमत ठेवले. यापैकी धीरूभाई अंबानींसारखे उद्योगपती सुरुवातीला वेगवेगळ्या वादाच्या भोवर्‍यात सापडले. परंतु नंतर त्यांनी प्रचंड औद्योगिक साम्राज्य निर्माण केले.
काही उद्योगपती हे राजकीय कनेक्शन बांधून मोठे होतात, तर काही सेलिब्रिटींना हाताशी धरून आपल्या भोवती ग्लॅमर निर्माण करतात. नुकतेच दिवंगत झालेले सहाराश्री सुब्रत रॉय हे अशा वर्गात मोडणारे होते. जेव्हा महानायक अमिताभ बच्चन दिवाळखोर झाले होते, त्यांना चित्रपटसृष्टीतही अपयशाचा सामना करावा लागत होता, तेव्हा सुब्रत यांनी त्यांना मदतीचा हात दिला होता. त्यावेळी खासदार अमरसिंग बिग बींना घेऊन सुब्रत यांच्याकडे आले. सुब्रत यांनी त्यांना आर्थिक मदत देऊन, पुन्हा एकदा उभे राहण्यास साह्य केले. सुब्रत यांची भाची शिवांका हिच्या विवाहास बच्चन दाम्पत्य हजर होते. त्याचबरोबर ‘सहारा’च्या अनेक कार्यक्रमांना अमिताभ यांची उपस्थिती असे. मुलायमसिंग यादव, अनिल अंबानी प्रभृतींशी सुब्रत यांची दोस्ती होती.
एकेकाळी भारतात एकेका क्षेत्रातच कार्यरत असणारे उद्योजक किंवा उद्योगपती होते. मात्र विशिष्ट क्षेत्रात मंदी आल्यास अथवा अडचणी आल्यास अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे डायव्हर्सिफिकेशन किंवा विविध क्षेत्रात प्रवेश करून, वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प सुरू करण्याची पद्धत सुरू झाली. सहारा इंडियाचे संस्थापक सुब्रत रॉय यांनीदेखील अनेक क्षेत्रांत पंख पसरले. अक्षरशः शून्यातून त्यांनी विश्व साकारले. मात्र झटपट यशस्वी होण्याच्या आकांक्षेतून केलेल्या करामतींमुळे ते नेहमीच वादग्रस्त राहिले.
बिहारच्या अरिया जिल्ह्यात रॉय यांचा जन्म झाला. गोरखपूरच्या शासकीय तांत्रिक संस्थेतून त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आणि तेथूनच व्यवसायाला सुरुवात केली. बिहारसारख्या मागासलेल्या राज्यात लहानपण गेले असूनही, रॉय यांच्यामध्ये व्यापारी मनोवृत्ती जन्मजातच होती. त्यामुळे गोरखपूर येथेच हजार – दीड हजार रुपये भांडवलावर व्यापारास सुरुवात करून, रॉय यांनी अवघ्या 36 वर्षांमध्ये दीड लाख कोटी रुपयांचा व्यवसाय उभा केला. त्यांनी सहारा समूहाची स्थापना केली आणि वित्त, रियल इस्टेट, प्रसारमाध्यमे, आरोग्य, मनोरंजन, पर्यटन अशा विविध क्षेत्रांत गुंतवणूक केली. त्यांचे साम्राज्य अखिल विश्वात पसरले. रॉय यांनी प्रथम बँकिंगपासून व्यवसाय उभारणी केली आणि असंख्य गुंतवणूकदारांना आपल्याकडे खेचून घेतले.
या गुंतवणुकीसाठी आकर्षक व्याज देऊ केले. चिटफंडच्या माध्यमातून अनेक योजना आणल्या आणि हा निधी जमिनी व गृहबांधणी क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी वापरला. लखनौखेरीज कानपूर, गोरखपूर, हैदराबाद, भोपाळ, कोची, गुरुग्राम आणि पुण्यात सहाराने गृहबांधणी प्रकल्प सुरू केले. त्यासाठी त्यांनी एका अमेरिकन कंपनीला सोबत घेतले. केवळ मुंबई व इतरत्रच नव्हे, तर परदेशांतही हॉटेल्स सुरू केली. झारखंड आणि छत्तीसगडमध्ये ऊर्जा प्रकल्पात गुंतवणूक केली. देशातील उदारीकरणाच्या वार्‍याचा फायदा घेऊन नागरी हवाई वाहतूक क्षेत्रात प्रवेश केला. शिक्षण क्षेत्रात पाऊल ठेवत, त्यांनी सहारा कॉलेज ऑफ नर्सिंग अँड पॅरामेडिकल सायन्स सुरू केले. मात्र रॉय यांनी सर्व माया गोळा केली, ती चिटफंडच्या बळावर आणि त्यामध्ये अनेक गैरव्यवहार झाले होते. त्यामुळे हजारो गुंतवणूकदारांना मन:स्ताप झाला, हे नाकारता येणार नाही.
1991 साली रॉय यांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते लखनौमध्ये ‘राष्ट्रीय सहारा’ या आपल्या वृत्तपत्राचा शुभारंभ केला. यथावकाश भारताच्या कॉर्पोरेट आणि फिल्मी जगतात महागड्या सुटाबुटात रॉय वावरू लागले. त्यांच्या वृत्तपत्रात पत्रकारांना मोफत प्रवास उत्तमोत्तम आणि स्वस्तात भोजन, भरपूर पगार, बोनस आदी सुविधा देण्यात येत होत्या. ते आपल्या कंपनीच्या कोणत्याही कार्यालयात आले की, सर्वांनी उभे राहून बड्या साहेबांचे आणि त्यांचे बंधू जॉय रॉय यांचे छातीवर हात ठेवून स्वागत करण्याची ही प्रथा होती. ते कार्यालयात येत असले की लाल गालिचा अंथरला जाई आणि दोन्ही बाजूंनी पुष्पवृष्टी केली जात असे.
आपले वृत्तपत्र खपवणार्‍या विक्रेत्यांना सायकल व मोटारसायकल देण्याची पद्धत त्यांनी सुरू केली. रॉय यांनी लखनौमध्ये गोमतीनगर ही एक ग्लॅमरस टाऊनशिप उभारली. वर्तमानपत्रे आणि चॅनेल सोडून त्यांनी एका वलयांकित अशा जगतात प्रवेश केला. रॉय यांनी आपल्या मुलांच्या लग्नात पाचशे कोटी रुपये इतका खर्च केला, असे बोलले जात होते. या शाही विवाहास दिल्ली, उत्तर प्रदेश वगैरे राज्यांतील बडे बडे मंत्री, नट-नट्या आणि क्रिकेटपटू यांनी हजेरी लावली होती. न्यूयॉर्क आणि लंडनमध्ये टीव्ही चॅनेल व हॉटेल्स असणारे ते एकमेव उद्योगपती होते. भारताने जेव्हा वर्ल्ड कप जिंकला, तेव्हा टीममधील प्रत्येक खेळाडूस त्यांनी भरघोस बक्षिसे दिली. भारतीय रेल्वेनंतर सर्वाधिक कर्मचारी असणारा उद्योग समूह म्हणजे ‘सहारा’, अशी या समूहाची कीर्ती पसरली होती.
रॉय यांचे हे सर्व साम्राज्य म्हणजे फुगवलेला फुगाच होता. 2011 नंतर सेबीने चिटफंड योजनेतील गडबडी बाहेर काढण्यास सुरुवात केली, तेव्हा सहारा समूह अडचणीत आला. जवळपास 25 हजार कोटी रुपयांचे सहाराचे निधी गोठवण्यात आले. समूहाविरुद्ध अनेक खटले दाखल करण्यात आले. त्यानंतर रॉय यांना दोन वर्षे तुरुंगवास घडला. महाराष्ट्रात लोणावळ्याजवळील प्रकल्पास मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-भाजप युतीचा आशीर्वाद लाभला होता.
लोकांना आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून भांडवल जमवायचे आणि त्या आधारे रिअल इस्टेटसारख्या क्षेत्रात अपारदर्शी व्यवहार करायचे, त्यामधून मिळणार्‍या नफ्याच्या आधारे राजकारणी आणि सेलिब्रिटीच्या मदतीने वेगवेगळ्या क्षेत्रात हातपाय पसरायचे… अडचणी आल्या की, नेत्यांची मदत घ्यायची, हे उद्योग करणारी एक जमात आपल्याकडे आहे. सुब्रत रॉय हे त्यापैकीच एक. जेट एअरवेजचे नरेश गोयल, येस बँकेचे राणा कपूर, युनायटेड ग्रुपचे विजय मल्ल्या अशा अनेक उद्योगपतींनी गेल्या दोन-तीन दशकांत अर्थव्यवस्थेला हादरे दिले. गुंतवणूकदारांना ठकवणार्‍या आणि सरकारचे कर बुडवणार्‍या व्यापारी व उद्योगपतींना व्यवस्थेचा धाक राहिलेला नाही. रॉय यांच्यासारख्या उद्योगपतींनी व्यवस्थेतील कमतरतांचा फायदा घेतला. अल्पावधीत प्रचंड आर्थिक साम्राज्य उभे केले. परंतु पाहता पाहता हे साम्राज्य कोसळून पडले. एक मात्र आहे. सुब्रत रॉय यांनी, ललित मोदी, विजय मल्ल्या आणि नीरव मोदींप्रमाणे भारतातून पलायन करण्याचे पाऊल उचलले नाही.
सुब्रत रॉय एकेकाळी गोरखपूरच्या गल्लीबोळात लॅम्ब्रेटा स्कूटरवरून नमकीन विकायचे. पाच-सहा लोकांना बरोबर घेऊन त्यांनी चिटफंड वगैरेचा कारभार सुरू केला. त्याचे दैनंदिन, मासिक, त्रैमासिक आणि सहामाही प्लॅन ते चालवत असत. अन्य कंपन्यांच्या तुलनेत सहारा ग्रुपमध्ये तीन ते चार टक्के जास्त व्याज दिले जात असे. त्यामुळे हळूहळू लोकांचे सहारावरचे प्रेम वाढत गेले. 1978 मध्ये चिटफंडापासून सुरुवात करून सुब्रत यांनी 1991 साली ‘सहारा एअर लाइन्स’ काढण्यापर्यंत मजल मारली. 2003 साली या समूहाने आपले न्यूज चॅनेल लाँच केले. त्यानंतर प्रादेशिक भाषांतील चॅनेल्स, तसेच मूव्ही चॅनेल सुरू केले. ‘सहारा वन मोशन पिक्चर्स’तर्फे अनेक चित्रपट वितरित केले. 2001 ते 2013 पर्यंत सहारा ग्रुप हा टीम इंडियाचा स्पॉन्सर होता.
2011 मध्ये सहारा टीम आयपीएलमध्ये सामील झाली. मात्र सहारा ग्रुपच्या ‘प्राईम सिटी’ या कंपनीच्या आयपीओपासून सुब्रत यांची पीछेहाट सुरू झाली. नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. एक काळ असा होता की, भारतातल्या सर्वांत बड्या उद्योगपतींमध्ये सुब्रत यांची गणना होत असे. मुख्यतः वित्त आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील अनेक कंपन्यांचा डोलारा पटकन कोसळतो, असा जगातील अनुभव आहे. लोकांचा विश्वास गमावला की, लोक कंपनीतले पैसे पटापट काढून घेतात आणि भांडवल उभारणी करणे कठीण होऊन जाते. आज स्टार्टअपच्या जमान्यातही विश्वासार्हतेस महत्त्व आहे. विश्वासार्हता धुळीस मिळाली की, सर्वच संपले. सहाश्रींच्या जीवनापासून हाच बोध घेतला पाहिजे.
The post उद्योग विश्वातले वादळ appeared first on पुढारी.

सहारा इंडियाचे संस्थापक सुब्रत रॉय यांनी अनेक क्षेत्रांत पंख पसरले. अक्षरशः शून्यातून त्यांनी विश्व साकारले. मात्र झटपट यशस्वी होण्याच्या आकांक्षेतून केलेल्या करामतींमुळे ते नेहमीच वादग्रस्त राहिले. समाजाकडून आम्हाला जे मिळते, त्यापेक्षा कितीतरी अधिक पटींनी आम्ही समाजाला परत करतो, असे जेआरडी टाटा म्हणत असत. त्यांच्या टाटा ट्रस्टतर्फे असंख्य समाजोपयोगी कामांना मदत केली जाते. शंतनुराव किर्लोस्कर यांनी …

The post उद्योग विश्वातले वादळ appeared first on पुढारी.

Go to Source