शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी; भाजपचे सातपुते, निंबाळकर; धैर्यशील मोहिते-पाटील यांचे अर्ज दाखल

कोल्हापूर; Bharat Live News Media डेस्क : राज्यात मंगळवारी ठिकठिकाणच्या उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महायुतीकडून भाजपने जोरदार रॅलीद्वारे शक्तिप्रदर्शन करत सोलापूर लोकसभेसाठी आमदार राम सातपुते, तर माढा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
माढा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी समर्थकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. इतर आठ अपक्ष उमेदवारांनीही अर्ज दाखल केले. भाजपकडून दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस सोलापूर दौर्यावर आले होते. त्यांच्यासह दोन्ही उमेदवारांची रथातून रॅली काढण्यात आली. फडणवीस यांनी रॅलीत सहभाग घेतला. त्यानंतर सोलापूर लोकसभेसाठी आमदार राम सातपुते यांनी उमेदवारी अर्ज भरला. आमदार सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी पूरक म्हणून जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्याकडे अर्ज दाखल केला.
भाजपचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी आमदार बबनदादा शिंदे, आमदार जयंत गोरे, आमदार संजय शिंदे, आमदार शहाजीबापू पाटील या पाच जणांसोबत निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका ठाकूर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने धैर्यशील मोहिते-पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पूरक म्हणून अर्ज दाखल केला. यावेळी धैर्यशील यांच्यासोबत पत्नी शीतलदेवी मोहिते-पाटील, जयसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार नारायण पाटील, उपस्थित होते.
दरम्यान, काँग्रेसच्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी सोलापूर लोकसभेसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.
सोलापूर लोकसभेसाठी नऊ व्यक्तींनी 10, तर माढा लोकसभा मतदारसंघासाठी 10 व्यक्तींनी 15 उमेदवारी अर्ज नेले. सोलापूर व माढा मतदारसंघात मिळून मंगळवारपर्यंत 144 व्यक्तींनी 236 उमेदवारी अर्ज नेले.
आ. रणजितसिंह मोहिते-पाटलांची अनुपस्थिती
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपच्या उमेदवारांची रॅली काढण्यात आली. त्यानंतर सोलापूरसाठी राम सातपुते, तर माढ्यासाठी खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी अर्ज दाखल केले; मात्र या सर्व घडामोडीत भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली.
हजारो समर्थकांच्या उपस्थितीत विनायक राऊत यांचा अर्ज
रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी मंगळवारी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी रत्नागिरीत शक्तिप्रदर्शन केले. ढोल-ताशांच्या गजरात खा. राऊत यांना खांद्यावर घेत शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आणले. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात खा. राऊत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
कैलास पाटील यांना स्टेजवरच भोवळ
धाराशिव : उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आ. कैलास पाटील यांना मंगळवारी ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या मिरवणुकीदरम्यान भोवळ आली. त्यामुळेच स्टेजवरच ते चक्कर येऊन पडले. त्यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. चार तासांच्या उपचारांनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्याचे तापमान मंगळवारी 40.1 अंश सेल्सिअस इतके होते. राजे निंबाळकर यांचा उमेदवारी दाखल करण्यासाठी मिरवणूक काढली होती.
Latest Marathi News शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी; भाजपचे सातपुते, निंबाळकर; धैर्यशील मोहिते-पाटील यांचे अर्ज दाखल Brought to You By : Bharat Live News Media.
