Monsoon Report : यंदा मोसमी पाऊस वेळेआधी; हवामानशास्त्रज्ञांचा मान्सूनबाबत आशादायी अंदाज
आशिष देशमुख
पुणे : यंदाचा उन्हाळा गेल्या पंचवीस ते तीस वर्षांत सर्वांत वेगळा ठरत असून, मान्सूनच्या हालचाली एप्रिलच्या दुसर्या आठवड्यातच
दिसू लागल्या आहेत. त्यामुळे मान्सून नियोजित वेळेआधीच दाखल होईल, अशी सध्याची स्थिती आहे. मान्सून वेळेआधी तर येईलच अन् तो मनसोक्त, भरपूर बरसेल, असा अंदाज हवामानशास्त्रज्ञांनी वर्तविला आहे. यंदा संपूर्ण मार्च महिनाभर कडक ऊन होते. मार्चमध्ये सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला. मार्चची सरासरी 24.5 मिलिमीटर इतकी आहे. मात्र, देशातील 13 राज्यांत सरासरीपेक्षा 85 ते 95 टक्के कमी पाऊस झाला. त्यामुळेही मार्च गेल्या पंचवीस ते तीस वर्षांतला सर्वांत उष्ण ठरला.
महाराष्ट्रात विदर्भ वगळता कोकण, मध्य महाराष्ट्र अन् मराठवाड्यात 95 टक्के कमी पाऊस झाला. त्यामुळे उष्णतेच्या लहरी खूप तीव्र होत्या. एप्रिलमध्येही तीच परिस्थिती आहे. सलग 40 दिवस उष्णतेच्या लाटा राज्यात अन् देशात सुरू आहेत. त्यामुळे एप्रिलच्या दुसर्या आठवड्यात देशातील अनेक राज्यांसह महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाड्यात गारपीट अन् पावसाने दाणादाण उडवून दिली. मात्र, कोकण व मध्य महाराष्ट्र कोरडाच आहे. त्यामुळे या भागात उष्णतेची लाट तीव्र आहे. यामुळे शास्त्रज्ञांच्या मते यंदा मान्सून नियोजित तारखेच्या चार ते पाच दिवस आधी दाखल होईल व भरपूर बरसेल.
या हालचाली मान्सूनला अनुकूल
अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे वेगाने राज्याकडे दक्षिण राजस्थानसह लगतच्या भागांत धुळीचे वादळ
आले. जम्मू-काश्मीर-लडाख-गिलगिट-बाल्टिस्तान-मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेशात हिमवर्षाव, वार्यांचा वेग ताशी 30 ते 40 किमी, अंदमान-निकोबार बेटांवर वादळी वारे सुरू. राजस्थानच्या सौराष्ट्र-कच्छ, रायलसीमा, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत उष्णतेची लाट अतितीव्र
प्रशांत महासागरात ला-निना स्थिती
हवामानशास्त्रज्ञांच्या मते, प्रशांत महासागरातील अल-निनो स्थिती संपली असून, ला-निना स्थिती एप्रिलमध्येच सक्रिय झाली आहे. त्यामुळे प्रशांत महासागराचे तापमान 30 वरून 18 अंश सेल्सिअस इतके झाले. यामुळे आता तिकडून इकडे वारे वाहू लागले आहे. त्याचा फायदा भारतीय मान्सूनला होणार आहे.
बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने पाऊस
हवामानशास्त्रज्ञांच्या मते, भारतात यंदा खूपच कडक उन्हाळा आहे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग दरवर्षीपेक्षा यंदा वाढला आहे. त्यामुळे ढगांची निर्मिती खूप वेगाने होत आहे. त्याचा फायदा मान्सूनवर सकारात्मक पध्दतीने होणार आहे. सध्या जो पाऊस पडतोय त्यालाही हेच कारण आहे.
मान्सून विदर्भातून की केरळमधून, यावर मंथन सुरू
दरवर्षी मान्सून केरळमध्ये 1 ते 5 जूनला दाखल होतो. तेथून तो मुंबई, पुण्यात 8 ते 12 जूनपर्यंत येतो. 15 ते 18 जूनपर्यंत तो पूर्ण राज्य काबीज करतो. मात्र, मागच्या वर्षात मान्सून तळकोकणात अडकला, तो पुढे सरकलाच नाही. त्यामुळे मान्सूनने त्याची दुसरी शाखा जी बंगालच्या उपसागरातून बिहारमार्गे उत्तर भारतात जाते तेथून तो विदर्भातून महाराष्ट्रात आला. 22 जूनला तो महाराष्ट्रात आला होता. पुणे, मुंबईत तो 25 जूनला दाखल झाला होता. यंदाही विदर्भातच वार्यांचे दाब आत्तापासून अनुकूल आहेत. त्यामुळे शास्त्रज्ञांचे यंदाचा मान्सून
कोकणातून येणार की विदर्भातून, यावर मंथन सुरू आहे.
प्रशांत महासागरात ला-निनोची स्थिती सक्रिय झाल्याने आत्तापासूनच मान्सूनच्या हालचाली दिसत आहेत. प्रशांत महासागराचे तापमान 18 अंश, तर हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्राचे तापमान 30 अंशांवर आहे. हे भारतीय मान्सूनसाठी खूपच सकारात्मक संकेत आहेत. मान्सूनच्या हालचाली आत्ताच सुरू झाल्याचे हे लक्षण आहे. यंदा मान्सून बरसण्यासाठी लाइट फॉल जेव्हा प्रखर पाहिजे तेव्हा आहे. अशी स्थिती 2012 व 2013 मध्ये बघायला मिळाली होती. यंदा मान्सून नियोजित वेळेआधी येऊन भरपूर बरसेल, असा अंदाज आहे.
– डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ
हेही वाचा
शशिकांत शिंदेंचे विराट शक्तिप्रदर्शन
Ram Navami 2024 : शिर्डीतील रामनवमी उत्सवाची ११३ वर्षांची परंपरा
कोल्हापूर : सहा हजारांवर गावांत टँकरने पाणीपुरवठा!
Latest Marathi News Monsoon Report : यंदा मोसमी पाऊस वेळेआधी; हवामानशास्त्रज्ञांचा मान्सूनबाबत आशादायी अंदाज Brought to You By : Bharat Live News Media.