भिवंडीत तिरंगी चुरस; महायुती, महाविकास आघाडी आणि वंचितही रिंगणात
शशिकांत सावंत
मुस्लिमबहुल मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या भिवंडी लोकसभा मतदार संघात गेल्या दोन निवडणुकांत भाजपचे कपिल पाटील दीड लाखाच्या मताधिक्याने विजयी होत आले आहेत. मात्र, या निवडणुकीत त्यांना दोन मातब्बर उमेदवारांचा सामना करावा लागणार आहे. त्यामध्ये पहिले आहेत महाविकास आघाडीचे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रे, तर दुसरे उमेदवार आहेत ते म्हणजे ज्यांनी प्रथम काँग्रेसकडे उमेदवारी मागितली; पण राष्ट्रवादी काँग्रेसला हा मतदार संघ गेल्याने उमेदवारी मिळू न शकलेले नीलेश सांबरे आता वंचित आघाडीच्या पाठिंब्यावर उभे आहेत.
या मतदार संघात जवळपास वीस लाख मते आहेत. मागच्या निवडणुकीत कपिल पाटील यांना पाच लाखापेक्षा जास्त मते मिळाली होती. मात्र, मतदारांचा वाढलेला टक्का आणि आता बदललेली राजकीय समीकरणे यामुळे येथील चित्र पूर्णपणे बदलले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये झालेली फूट, ठाकरे गटाचा महाविकास आघाडीला मिळालेला पाठिंबा आणि चुरशीची तिरंगी लढत यामुळे विजयाचे चित्र काहीसे धूसर मानले जात आहे. महायुतीचे उमेदवार कपिल पाटील हे केंद्रीय मंत्री म्हणून कार्यरत होते. त्या पार्श्वभूमीवर त्यांचा मतदार संघातील दबदबा आणि दुसर्या बाजूला शिंदे शिवसेनेचे एक महत्त्वाचे पदाधिकारी सुरेश म्हात्रे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात जाऊन उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा घेतलेला निर्णय, यामुळे महायुतीच्या मतांमध्ये मोठी फाटाफूट पाहायला मिळणार आहे.
2009 मध्ये भिवंडीमध्ये काँग्रेसचे सुरेश तावरे विजयी झाले होते. त्यावेळी त्यांना 1 लाख 82 हजार, तर भाजपच्या जगन्नाथ पाटील यांना 1 लाख 41 हजार तर मनसेचे डी. के. म्हात्रे यांना 1 लाख 7 हजार, अशी चुरशीची लढत झाली होती. तर 2014 मध्ये कपिल पाटील भाजप 4 लाख 10 हजार, काँग्रेस विश्वनाथ पाटील 3 लाख 1 हजार, तर मनसेतर्फे लढणारे सुरेश म्हात्रे यांना 93 हजार मते मिळाली होती. या निवडणुकीत कपिल पाटील पहिल्यांदा भाजपच्या तिकिटावर विजयी झाले होते. मोदी लाटेचा फायदा त्यांना मिळाला होता. त्यानंतर 2019 मध्ये कपिल पाटील यांना 5 लाख 23 हजार, काँगे्रसचे सुरेश तावरे यांना 3 लाख 67 हजार, तर वंचितचे डॉ. अरुण सावंत यांना 51 हजार मते मिळाली होती. आताही 2019 प्रमाणेच तिरंगी सामना होत आहे. मात्र, वंचितचे उमेदवार नीलेश सांबरे हे मागच्या पेक्षा अधिक मजबूत उमेदवार आहेत. तर सुरेश म्हात्रे यांचाही या मतदार संघात चांगला दबदबा आहे. त्यामुळे चुरस अधिक अपेक्षित आहे.
विधानसभानिहाय आढावा घेतला, तर या मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे शांताराम मोरे आणि विश्वनाथ भोईर असे दोन आमदार आहेत. तर भाजपचे महेश चौगुले आणि किसन कथोरे असे दोन आमदार आहेत. समाजवादी पार्टीचे रईस शेख आणि अजित पवार गटाचे दौलत दरोडा असे दोन आमदार असा मिळून हा लोकसभा मतदार संघ आहे. एकूण 10 लाख 79 हजार पुरुष मतदार, तर 9 लाख 18 हजार स्त्री मतदार असे एकूण 20 लाख मतदार या मतदार संघात आहेत. विधानसभानिहाय मतदार संख्येमध्ये मुरबाडमध्ये सर्वाधिक 4 लाख 31 हजार एवढी मतदार संख्या आहे. भिवंडी ग्रामीणमध्ये 3 लाख 15 हजार, शहापूर 2 लाख 74 हजार, भिवंडी पश्चिम 2 लाख 92 हजार, भिवंडी पूर्व 3 लाख 17 हजार, कल्याण पश्चिम 3 लाख 77 हजार असे मतदार आहेत.
भिवंडी मतदार संघात भाजपचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एक आणि शिवसेनेचे दोन आणि समाजवादी पार्टीचा एक असे संख्याबळ आहे. त्यामुळे आमदारांच्या संख्येत तरी महायुती मजबूत असली, तरी मुस्लिम आणि आदिवासींची संख्या अधिक असलेला ठाण्यातील हा लोकसभा मतदार संघ आहे. त्यामुळे काँग्रेसलाही या मतदार संघात आशा वाटू लागली आहे. राहुल गांधींची यात्रा ही म्हणूनच भिवंडीला नेण्यात आली होती. कपिल पाटील हे या मतदार संघात 2014 आणि 2019 या सलग दोन लोकसभेच्या निवडणुका जिंकलेले उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांना आता हॅट्ट्रिकची संधी आहे. त्यामुळे दुसर्या बाजूला नीलेश सांबरेंसारखा उमेदवार वंचितच्या पाठिंब्यावर रिंगणात उतरल्यामुळे मतदार संघात चुरस पाहायला मिळणार आहे. त्यामुळे भाजपनेही ही निवडणूक गांभीर्याने घेतली आहे.
एकूण 20 लाख मतदार असलेल्या या मतदार संघात मुस्लिम मतांची संख्या 20 टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे काँग्रेसने मुस्लिम मतदारांवरही लक्ष केंद्रित केले आहे. शहापूर, मुरबाड, कल्याण ग्रामीण असा ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग या मतदार संघात येतो. त्यामुळे इतर जिल्ह्यांच्या विकसित भागांपेक्षा काहीसा अविकसित असलेला असा हा मतदारसंघ असल्याने ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या फळीवर विजयाचे चित्र अधिक अवलंबून असणार आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे सुरेश म्हात्रे यांच्याबरोबरच शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा हेही शरद पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर आहेत. तर शहापूरचे विद्यमान आमदार दौलत दरोडा हे महायुतीबरोबर आहेत.
भाजपचे मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांचे आणि कपिल पाटील यांचे विळा-भोपळ्याचे सख्य आहे. त्यामुळे कथोरे या निवडणुकीत काय करणार, हेही या निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहे. कल्याण लोकसभा मतदार संघात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्यामुळे भाजप-शिवसेना यांच्यात जे वितुष्ट आले आहे, त्याचे कमी-अधिक फरकाने भिवंडीतही परिणाम दिसू शकतात. गणपत गायकवाड यांनी ज्यांच्यावर गोळीबार केला होता, त्या महेश गायकवाड यांच्यावर पोलिसांनी खंडणीचा गुन्हाही दाखल केला आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या पार्श्वभूमीवर या लढतीकडे विशेष लक्ष आहे.
Latest Marathi News भिवंडीत तिरंगी चुरस; महायुती, महाविकास आघाडी आणि वंचितही रिंगणात Brought to You By : Bharat Live News Media.