महायुतीचे शक्तिप्रदर्शन; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंडलिक, माने यांचे अर्ज दाखल
कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : रखरखत्या उन्हात महायुतीचे उमेदवार खा. संजय मंडलिक व खा. धैर्यशील माने यांच्या समर्थनार्थ सोमवारी दुपारी भव्य रॅली काढण्यात आली. उन्हाचे चटके सहन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह नेते रॅलीत सहभागी झाले. भगव्या टोप्या, स्कार्फ, हातात भगवे झेंडे आणि धनुष्यबाणाच्या प्रतिकृती घेतलेल्या कार्यकर्त्यांमुळे कोल्हापूर शहरात भगवे वादळ निर्माण झाले. रॅलीनिमित्त कोल्हापुरात प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात होता. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत खा. मंडलिक व खा. माने यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले.
खानविलकर पंपाजवळ रॅली आल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह दोन्ही उमेदवार व नेतेमंडळी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार खा. मंडलिक यांनी तर निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याकडे हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार खा. माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री शंभूराज देसाई, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खा. धनंजय महाडिक, आ. विनय कोरे, आ. प्रकाश आवाडे, आ. प्रकाश आबिटकर, माजी मंत्री रामदास कदम यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
महायुतीचे दोन्ही उमेदवार उमेदवारी अर्ज भरणार असल्याने कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून वाहनांतून त्यांचे समर्थक गांधी मैदानात जमत होते. सोमवारी सकाळी नऊपासूनच कार्यकर्ते येत होते. गांधी मैदानात पालकमंत्री मुश्रीफ, मंत्री पाटील, मंत्री देसाई, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर, खा. मंडलिक, खा. माने, खा. महाडिक, माजी आ. चंद्रदीप नरके, उत्तम कांबळे यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होते. उन्हाचा तडाखा असूनही दुपारपर्यंत कायकर्ते येतच होते. गांधी मैदानात कार्यकर्त्यांना भगव्या टोप्या, स्कार्फ आणि पाण्याच्या बाटल्यांची सोय करण्यात आली होती. रॅली सुरू झाल्यानंतर गटागटाने कार्यकर्ते सहभागी होत होते.
पालकमंत्री मुश्रीफ यांच्या उपस्थितीत दुपारी पावणेबाराच्या सुमारास रॅली सुरू झाली. नेतेमंडळी एका ट्रकवर उभे होते. त्याबरोबच विकास रथही रॅलीत सहभागी होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींचे फलक होते. कार्यकर्ते जयघोष करत होते. हातात फलक घेतलेले कार्यकर्ते ‘मान गादीला… मत मोदींना…’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडत होते. दुपारी एक वाजता छत्रपती चिमासाहेब चौकात मुख्यमंत्री शिंदे रॅलीत सहभागी झाले. त्यामुळे कार्यकर्त्यांत प्रचंड उत्साह होता. कार्यकर्ते व नागरिकांना अभिवादन करत मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह नेतेमंडळी रॅलीद्वारे सभास्थळी आले. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह सर्व नेतेमंडळींनी धनुष्यबाण चिन्ह असलेल्या टोप्या परिधान केल्या होत्या. गळ्यात भगवे स्कार्फ होते.
दरम्यान गांधी मैदान, खरी कॉर्नर, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार, पापाची तिकटी, महापालिका, सीपीआर, छत्रपती चिमासाहेब चौक, शहर वाहतूक शाखेमार्गे रॅली खानविलकर पंपाजवळ आली. याठिकाणी रॅलीचे सभेत रूपांतर झाले.
उमदेवारांनी भरले आठ अर्ज
एका उमेदवारासोबत अर्ज भरताना एकूण पाच व्यक्तींना प्रवेश आहे. त्यामुळे खा. मंडलिक व खा. माने यांनी प्रत्येकी चार असे एकूण आठ उमेदवारी अर्ज भरले. प्रत्येक अर्जावेळी मुख्यमंत्री शिंदे त्यांच्यासोबत होते. परंतु इतर व्यक्ती बदलण्यात आल्या.
चला चला… पुढे चला…
बहुतांश नेतेमंडळींची ऊठ-बस ए.सी.मध्ये असते. वाहनांतील प्रवासही ए.सी.मधूनच असतो. मात्र रॅलीमध्ये सहभागी झालेली नेतेमंडळी उन्हाचे चटके सोसत होती. कार्यकर्त्यांबरोबरच नेतेही घामाने भिजले होते. सर्वांनाच रखरखत्या उन्हाचा सामना करावा लागत होता. त्यामुळे ‘चला चला… पुढे चला…’ असे कार्यकर्त्यांना सांगितले जात असल्याचे दिसत होते.
उमेदवारी अर्ज आधी… नंतर सूचकाची सही…
खा. मंडलिक यांनी सोमवारी मुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून आ. प्रकाश आबिटकर होते. मात्र त्यांची स्वाक्षरी झाली नव्हती. दुपारी 1.15 वा. आ. आबिटकर हे कार्यकर्त्याच्या मोटारसायकलवर बसून जिल्हाधिकारी कार्यालयात आले. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना विचारले असता उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून स्वाक्षरी करण्यास आल्याचे त्यांनी सांगितले.
Latest Marathi News महायुतीचे शक्तिप्रदर्शन; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंडलिक, माने यांचे अर्ज दाखल Brought to You By : Bharat Live News Media.