शाहू महाराज आज उमेदवारी अर्ज करणार दाखल
कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज सोमवारी (दि. 16) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महायुतीच्या शक्तिप्रदर्शनानंतर आता उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्ताने महाविकास आघाडीकडून जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी करण्यात आली असून, जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून आघाडीतील घटक पक्षांचे नेते व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. त्यामुळे या रॅलीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
ऐतिहासिक दसरा चौकातून सकाळी दहा वाजता शक्तिप्रदर्शन मिरवणुकीस सुरुवात करण्यात येणार आहे. त्यासाठी मुस्लिम बोर्डिंगजवळ भव्य मंडप उभारण्यात आला आहे. जिल्ह्याततील कानाकोपर्यातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना ठाकरे गट, डावे पक्ष, आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडीचे नेते, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या शक्तिप्रदर्शनात सहभागी होणार आहेत. कोल्हापूर शहरासह कोल्हापूर दक्षिण, करवीर, गगनबावडा, कागल, गडहिंग्लज, राधानगरी, भुदरगड, चंदगड, आजरा तालुक्यांतील कार्यकर्ते या रॅलीसाठी येणार आहेत.
दसरा चौकातून सुरू होणारी रॅली व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सांगता करण्यात येणार आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार यापूर्वीच जाहीर केला आहे. त्याद़ृष्टीने त्यांनी तयारी केली आहे. युवासेनेच्या वतीने मोटारसायकल रॅलीही काढण्यात येणार आहे. रॅलीसाठी खास गीतही तयार करून घेण्यात आले आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते लाल स्कार्फ व लाल टोप्या घालून सहभागी होणार आहेत.
रॅलीमध्ये माजी खासदार संभाजीराजे, माजी आमदार मालोजीराजे, संयोगिता राजे, मधुरिमाराजे, शहाजीराजे, यशराजे यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार जयश्री जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शिवसेना सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शिवसेना उपनेते व जिल्हा प्रमुख संजय पवार, जिल्हा प्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, माजी आमदार संजयबाबा घाटगे, जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील, अप्पी पाटील, डॉ. नंदिनी बाभुळकर, गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी, भाकपचे जिल्हा सेक्रेटरी सतिशचंद्र कांबळे, पिपल्स रिपब्लिकनचे दगडू भास्कर, वंचितचे जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे, दौलत कारखान्याचे माजी अध्यक्ष गोपाळ पाटील, बिद्री कारखान्याचे संचालक सत्यजीत जाधव, काँग्रेसचे कोल्हापूर शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कोल्हापूर शहराध्यक्ष आर. के. पोवार, शिवसेना ठाकरे गट कोल्हापूर शहराध्यक्ष रविकिरण इंगवले व सुनील मोदी, आम आदमी पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य संदीप देसाई, आदी सहभागी होणार आहेत.
सत्यजित पाटील सरुडकरही आज अर्ज भरणार
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील-सरुडकर मंगळवारी (दि.16) निवडक कार्यकर्त्यांसोबत उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
पिण्याच्या पाण्याची सोय
जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते येणार असल्याने वाहतुकीची होणारी संभाव्य कोंडी लक्षात घेऊन पार्किंगची ठिकाणे निश्चित करण्यात येणार आहेत. तसेच दिशादर्शक फलकही लावण्यात आले आहेत. तापमानात प्रचंड वाढ झाल्याने उन्हाचा तडाखा जाणवत असल्याने रॅलीत सहभागी होणार्या कार्यकर्त्यांसाठी मिरवणूक मार्गावर तीस ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे.
Latest Marathi News शाहू महाराज आज उमेदवारी अर्ज करणार दाखल Brought to You By : Bharat Live News Media.