समस्या अर्धांगवायूची
डॉ. महेश बरामदे
अर्धांगवायू म्हणजे इंग्रजीत ज्याला पॅरालिसीस म्हणतात तो आजार. याला लकवा, पक्षाघात, ब्रेन अॅटॅक किंवा ब्रेन स्ट्रोक या नावानेही ओळखले जाते. आपल्या देशात दरवर्षी पंधरा-सोळा लाख लोकांना पक्षाघात होतो, असे दिसून आले आहे. अचूक माहिती नसल्याने किंवा वेळेवर उपचार न मिळाल्याने यातील एक तृतीयांश लोक मृत्युमुखी पडतात आणि आणखी एक तृतीयांश लोक आयुष्यभर विकलांग होतात.
रक्तवाहिनीतील रक्त गोठल्यामुळे 100 टक्के रुग्णांपैकी 80 टक्के रुग्णांना (थ्राँबॉसिस) पॅरालिसीस होतो, तर उर्वरित 20 टक्क्यांतील 15 ते 18 टक्के रुग्णांना मेंदूतील रक्तवाहिनी फुटल्यामुळे रक्ताची गाठ निर्माण होऊन पॅरालिसीस होतो. डायबेटीस, ब्लडप्रेशरच्या रुग्णांमध्ये अचानक रक्तस्राव वाढतो आणि रक्तवाहिनी फुटून पॅरालिसीस होऊ शकतो. आपल्या कुटुंबीयांवर त्यांना अवलंबून राहावे लागते. केवळ एक तृतीयांश लोकांना योग्य उपचार, तेही वेळेवर मिळतात आणि ते बरे होतात.
अर्धांगवायूची कारणे
मेंदू आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि अर्धांगवायूचा थेट संबंध मेंदूशी आहे. शरीरातील सर्व अवयवांचे आणि त्यांच्या हालचालींचे, तसेच कामांचे नियंत्रण मेंदू करत असतो. बोलणे, चालणे, फिरणे, पाहणे अशा सर्व क्रिया या मेंदूकडूनच नियंत्रित होतात. जेव्हा मेंदूच्या रक्तवाहिन्यांत काही गडबड निर्माण होते, तेव्हा ब्रेन स्ट्रोक येतो आणि तो पॅरालिसीस म्हणजे अर्धांगवायूचे कारण बनतो.
शरीराच्या अन्य भागांप्रमाणे मेंदूतही दोन प्रकारच्या रक्तवाहिन्या असतात. एक म्हणजे हृदयापासून मेंदूपर्यंत रक्त वाहून नेतात त्या आणि दुसर्या मेंदूकडून पुन्हा हृदयाकडे रक्त नेणार्या वाहिन्या. ज्या वाहिन्या मेंदूला रक्तपुरवठा करतात त्यांना धमनी (आर्टरी) म्हणतात आणि ज्या वाहिन्या मेंदूकडून हृदयाकडे रक्त नेतात त्यांना शिरा (व्हेन) म्हणतात. या धमन्या आणि शिरांत बिघाड झाल्यावर अर्धांगवायू होतो; पण बहुतांश अर्धांगवायू आर्टरी किंवा धमन्यांत बिघाड झाल्यामुळे होतो.
हृदयापासून मेंदूपर्यंत चार मुख्य रक्तवाहिन्यांतून रक्त जाते. दोन मानेतील पुढच्या आणि दोन मानेतील मागच्या रक्तवाहिन्यांतून. आत गेल्यावर या वाहिन्या अगदी पातळ अशा वाहिन्यांमध्ये विभागल्या जातात, जेणेकरून मेंदूच्या प्रत्येक भागात रक्त पोहोचेल. एखाद्या पाईपलाईनप्रमाणे या रक्तवाहिन्यांचे काम चालते. म्हणजे वेगवेगळ्या घरांमध्ये पाईपलाईनने पाणी पोहोचवले जाते. त्यातील काही पाईपलाईन मोठ्या असतात, तर काही लहान. पाण्याच्या या पाईपलाईनमध्ये काही बिघाड झाला तर साधारणपणे दोन परिणाम घडतात- पाण्याच्या दबावामुळे एक तर पाईपलाईन फुटते किंवा गळू लागते. अशा प्रकारे मेंदूपर्यंत रक्त घेऊन जाणार्या धमन्यांमध्ये काही बिघाड झाला तर ती एक तर फुटते किंवा गळू लागते.
जर मेंदूच्या आत रक्तवाहिनी फुटली तर रक्त बाहेर येऊन एके ठिकाणी जमा होते. त्याला ब्लड क्लॉट किंवा रक्ताची गाठ म्हणतात. रक्ताचे प्रमाण जसे वाढत जाते, तसा क्लॉटचा आकार वाढत जातो आणि मग तो क्लॉट रक्तवाहिनी किंवा तिच्या जखमेला बंद करतो. त्यामुळे रक्त बाहेर पडणे बंद होते; पण अनेक रुग्णांच्या बाबतीत इतके रक्त वाहते की, डोक्याच्या आत दबाव वाढत जातो आणि त्यामुळे मेंदू काम करायचेच बंद होतो. अशा वाढत्या दबावामुळे डोकेदुखी किंवा उलटी होऊ लागते. दबाव जास्तच वाढला तर बेशुद्धी, पॅरालिसीस, श्वास घेणे जिकिरीचे होणे असा त्रास होऊ लागतो.
रक्तवाहिनी बंद झाल्यावर मेंदूचा संबंधित भाग ऑक्सिजनच्या अभावामुळे उपासमारीने तडफडू लागतो आणि काम करणे बंद करतो. मेंदूच्या या भागाला आसपासच्या भागातूनही रक्त नाही मिळाले किंवा रक्तवाहिनीतील क्लॉट जसाच्या तसा राहतो, तेव्हा मेंदूच्या या भागाला मोठे नुकसान होते. स्ट्रोक हे एक सर्वात मोठे आणि मुख्य कारण असते. स्ट्रोकमध्ये रक्ताची गाठ किंवा गुठळी रक्तवाहिनीच्या आत असते आणि त्यामुळे रक्तप्रवाह बंद किंवा कमी होतो. अशा वेळी दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे जिथे रक्तवाहिनी फुटून रक्त बाहेर येते तेथून रक्ताची गुठळी ताबडतोब काढणे आणि दुसरे म्हणजे जी धमनी जिथे रक्त घेऊन जात होती, तेथे लवकरात लवकर रक्त पोहोचविणे. योग्य वेळेत हे केले नाही तर त्याचा परिणाम मेंदूवर होतो आणि समस्या आणखी वाढली तर जीवावरही बेतू शकते. म्हणूनच अर्धांगवायूत वेळेत उपचार होणे महत्त्वाचे असते. लवकर इलाज झाले तर अधिक नुकसान होणे टळते.
Latest Marathi News समस्या अर्धांगवायूची Brought to You By : Bharat Live News Media.