IPL 2024 : ट्रॅव्हिस हेडचे वादळी शतक
बंगळूर, वृत्तसंस्था : सनरायझर्स हैदराबादने (IPL 2024) सोमवारी बंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या हायस्कोअरिंग सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघावर 25 धावांनी विजय मिळविला. हा सामना टी-20 मधील सर्वात उच्चांकी धावांचा ठरला. या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून 549 धावांचा पाऊस पाडला. या विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची दमछाक झाली. सनरायझर्स हैदराबादच्या 287 धावांच्या प्रत्युत्तरात आरसीबीची सुरुवात दणक्यात झाली होती; पण पुन्हा एकदा विराट कोहलीची विकेट पडली अन् गाडी गडगडली. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स याने अनुभव कामी आणत 3 महत्त्वाच्या विकेटस् घेऊन सामना फिरवला. आरसीबीचा खेळ दीडशेच्या आत खल्लास होणार, असे वाटत असतानाच दिनेश कार्तिक आरसीबीसाठी उभा राहिला. त्याने मैदान गाजवताना संघर्ष केला; परंतु ऐतिहासिक विजयाला तो मुकला.
विराट कोहली व फाफ ड्यू प्लेसिसने आरसीबीला अपेक्षित सुरुवात करून दिली. या दोघांनी 6.2 षटकांत 80 धावा फलकावर चढवल्या. मयांक मार्कंडेने बेंगळुरूला मोठा धक्का दिला. विराट 20 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकारांसह 42 धावांवर त्रिफळाचित झाला. विल जॅक्स (7) रन आऊट झाला, तर मार्कंडेने त्याची डावातील दुसरी विकेट घेताना रजत पाटीदारला (9) बाद केले. फाफ ड्यू प्लेसिस हाच एक अडथळा उभा होता आणि 10 व्या षटकात पॅट कमिन्सने तोही दूर केला. फाफ ड्यू प्लेसिस 28 चेंडूंत 7 चौकार व 4 षटकारांसह 62 धावांवर झेलबाद झाला. कमिन्सने त्याच षटकात सौरव चौहानला बाद करून आरसीबीची अवस्था बिनबाद 80 वरून 5 बाद 122 अशी केली. (IPL 2024)
महिपाल लोम्रोर व दिनेश कार्तिक यांनी 25 चेंडूंत 59 धावांची भागीदारी करून आरसीबीच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या; पण कमिन्सने ही भागीदारी तोडली. थोडा संथ; पण आखूड चेंडूवर त्याने महिपालचा (19) त्रिफळा उडवला. कार्तिक झुंज देत होता आणि संघाला 18 चेंडूंत 72 धावा करून देण्याचे अशक्यप्राय आव्हान त्याने स्वीकारले होते; पण भुवनेश्वर कुमारने 18 वे षटक सुरेख फेकले अन् 14 धावाच दिल्या. 12 चेंडूंत 58 धावा आरसीबीला हव्या होत्या. 19 व्या षटकात कार्तिकच्या दमदार खेळीला टी. नटराजनने ब्रेक लावला. कार्तिकने 35 चेंडूंत 5 चौकार व 7 षटकारांसह 83 धावांची वादळी खेळी केली. आरसीबीने 7 बाद 262 धावांपर्यंत मजल मारली.
तत्पूर्वी, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या गोलंदाजांची पुन्हा एकदा बेक्कार धुलाई झाली. ट्रॅव्हिस हेड व अभिषेक शर्मा यांनी 7.1 षटकांत फलकावर शतकी धावा चढवल्यानंतर हेडने 39 चेंडूंत स्वत:चे शतक झळकावले. त्यानंतर हेन्रिक क्लासेनने हिसका दाखवला. मुंबई इंडियन्सविरुद्ध याच पर्वात हैदराबादने 277 धावा कुटून आयपीएल इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम मोडला होता. तो विक्रम सोमवारी त्यांनीच मोडला. (IPL 2024)
हेडने 20 चेंडूंत अर्धशतक झळकावले. त्याला अभिषेकची दमदार साथ मिळाली. नवव्या षटकात अभिषेकने स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू टोलवला आणि फर्ग्युसनने तो टिपला. अभिषेक 22 चेंडूंत 2 चौकार व 2 षटकारांसह 34 धावांवर रिसे टॉप्लीच्या गोलंदाजीवर बाद झाला. या दोघांनी 49 चेंडूंत 108 धावा जोडल्या. हैदराबादच्या चौकार-षटकारांचा ओघ आटला नाही. त्यांनी हेन्रिक क्लासेनला बढती देताना तिसर्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले.
ट्रॅव्हिस हेडचा पॉवर प्ले सुरूच राहिला आणि त्याने संघाला 10 षटकांत 128 धावांपर्यंत पोहोचवले. हेडने 39 चेंडूंत शतक पूर्ण केले आणि आयपीएल इतिहासातील हे चौथे वेगवान शतक ठरले. लॉकी फर्ग्युसनने त्याला माघारी पाठवले. हेड 41 चेंडूंत 9 चौकार व 8 षटकारांसह 102 धावांवर बाद झाला. त्याची व क्लासेनची 57 (26 चेंडू) धावांची भागीदारी संपुष्टात आली. हेडच्या विकेटनंतर क्लासेनने हात मोकळे करत धावांचा वेग कायम राखला. त्याने 23 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि हैदराबादला 15 षटकांत 205 धावांपर्यंत नेले.
क्लासेनचा झंझावात 17 व्या षटकात फर्ग्युसनने संथ चेंडूवर रोखला. क्लासेन 31 चेंडूंत 2 चौकार व 7 षटकारांसह 67 धावांवर बाद झाला. यश दयालच्या फुलटॉसवर एडन मार्कराम झेलबाद झाला; परंतु तो चेंडू नो बॉल ठरला. अब्दुल समदने 19 व्या षटकात 4, 4, 6, 6, 4 असे फटके खेचून संघाला 266 धावांपर्यंत पोहोचवले. त्यानंतर मार्करामने फटकेबाजी करून 277 धावांचा पल्ला ओलांडला व आयपीएल इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या पुन्हा आपल्या नावावर केली. बेंगळुरूच्या लॉकी फर्ग्युसन (52), रिसे टॉप्ली (68), यश दयाल (51) यांनी 4 षटकांत पन्नासहून अधिक धावा दिल्या. एकाच पर्वात दोनवेळा अडीचशे पार धावा करणारा हैदराबाद हा पहिलाच संघ ठरला. हैदराबादने 20 षटकांत 3 बाद 287 धावा चोपल्या.
* नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारल्याचा पश्चात्ताप आरसीबीचा कर्णधार फाफ ड्यू प्लेसिस याला नक्की झाला असेल. सनरायझर्स हैदराबादने आयपीएल इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येचा स्वतःचाच विक्रम आज तोडला. यासह त्यांनी 6 मोठे विक्रम मोडले.
* सनरायझर्स हैदराबादने 3 बाद 287 धावा करून आयपीएल इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येचा स्वतःचाच विक्रम मोडला. याच आयपीएलमध्ये त्यांनी मुंबई इंडियन्सविरुद्ध 3 बाद 277 धावा कुटल्या होत्या.
* आयपीएलच्या एका इनिंग्जमध्ये सर्वाधिक 22 षटकारांचा विक्रम आज हैदराबादने नावावर केला. त्यांनी 2013 चा आरसीबीचा (21 षटकार वि. पुणे वॉरियर्स) विक्रम मोडला.
* आयपीएलच्या एका पर्वात दोनवेळा 250 हून अधिक धावा करणारा सनरायझर्स हैदराबाद हा पहिला संघ ठरला; शिवाय एकाच पर्वात 270 हून अधिक धावांचा पराक्रमही त्यांनी नावावर केला.
* टी-20 क्रिकेटमधील 287 धावा या दुसर्या सर्वोच्च धावा ठरल्या. नेपाळने 2023 मध्ये मंगोलियाविरुद्ध 314 धावा केल्या होत्या. हैदराबादने आज अफगाणिस्तानचा (278 धावा वि. आयर्लंड, 2019) विक्रम मोडला.
* आयपीएलच्या एका इनिंग्जमध्ये सर्वाधिक चौकार-षटकारांच्या विक्रमात सनरायझर्सने दुसरे स्थान पटकावताना लखनौ सुपर जायंटस्शी (41 वि. पंजाब किंग्ज, 2023) बरोबरी केली. 2013 मध्ये रॉयल चॅलेंजर्स वि. पुणे वॉरियर्स सामन्यात बेंगळुरूने 42 चौकार-षटकार खेचले होते.
Latest Marathi News IPL 2024 : ट्रॅव्हिस हेडचे वादळी शतक Brought to You By : Bharat Live News Media.