चाकण एमआयडीसी वाहतूक कोंडीचे केंद्र : वाहनचालकांसह प्रवासी त्रस्त

चाकण : Bharat Live News Media वृत्तसेवा : चाकण औद्योगिक भागात राष्ट्रीय महामार्गांवर पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचे चित्र पाहावयास मिळत आहे. पुणे-नाशिक महामार्गावर तसेच तळेगाव-चाकण-शिक्रापूर यादरम्यान चाकण परिसरात सायंकाळच्या वेळी नियमितपणे वाहतूक कोंडी होत आहे. पुणे-नाशिक महामार्गावर आंबेठाण चौक, तळेगाव चौक, आळंदी फाटा या भागांतील वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांसह नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मागील आठवडाभरात या भागात सायंकाळच्या वेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. या महामार्गावरील कोंडीने प्रवासी आणि वाहनचालक चांगलेच हैराण होत आहेत.
चाकण वाहतूक शाखा स्वतंत्रपणे अस्तित्वात आल्यानंतर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वेगवेगळ्या बदलांचे प्रयोग करण्यात आले. पुणे-नाशिक महामार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर चाकण येथील तळेगाव चौकात सेवा रस्त्यांची रुंदी वाढविण्यात आली. मात्र, या उपाययोजना फारशा परिणामकारक ठरत नसल्याचे साततच्या वाहतूक कोंडीने स्पष्ट होत आहे. द्रुतगती महामार्ग, एलिव्हेटेड महामार्गाच्या घोषणा होत असल्या, तरी प्रत्यक्षात काम सुरू होत नसल्याने येथील कोंडीची समस्या ’जैसे थे’ आहे.
रिंगरोड व महामार्गांची कामे रखडली
या भागासाठी रिंगरोड सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला होता. या रिंगरोडमुळे वाहतूक कोंडी दूर होऊन राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाची थेट कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. खेड तालुक्यातील खालुंब—े, निघोजे, मोई, कुरळी, चिंबळी, केळगाव, आळंदी देवाची, चर्होली खुर्द, धानोरे, सोळू, मरकळ, गोलेगाव आणि मावळ तालुक्यातील परंदवाडी, उर्से, तळेगाव दाभाडे, वडगाव, कातवी, आंबी, वराळे, आकुर्डी, नाणोलीतर्फे चाकण, इंदुरी, सुदवडी, सुदुंबरे या गावांतून हा रिंगरोड जाणार आहे.
बाह्यवळण मार्गाची गरज
चाकण औद्योगिक भागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रासे फाटा, कडाचीवाडी, मेदनकरवाडी या भागांतून प्रस्तावित बाह्यवळण मार्गाची हद्दनिश्चिती करण्याबाबत पीएमआरडीए आश्वासन देत असले, तरी प्रत्यक्षात संयुक्त स्थळपाहणीच्या पलीकडे या जागेवर काडीही हललेली नाही. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चाकण येथील तळेगाव चौकातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रासे फाटा ते कडाचीवाडी, मेदनकरवाडी, नाणेकरवाडी, महाळुंगे या भागांतून बाह्यवळण रस्ता त्वरित मार्गी लावण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.
हेही वाचा
सातकरांच्या गाड्याने पटकाविला ‘घाटाचा राजा’ किताब..!
’उजनी’तील पळसनाथ मंदिर विनामूल्य पाहता येणार..!
कल्याण-नगर महामार्गावर तिहेरी अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही
Latest Marathi News चाकण एमआयडीसी वाहतूक कोंडीचे केंद्र : वाहनचालकांसह प्रवासी त्रस्त Brought to You By : Bharat Live News Media.
