
नसरापूर : Bharat Live News Media वृत्तसेवा : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी दोन दिवसांपूर्वी विधानसभेचे उमेदवार संग्राम थोपटे असतील, असे वक्तव्य केल्याने भोर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडला. रविवारी (दि. 14) झालेल्या शिवसेनेच्या (उबाठा) नियोजित सभेला ठाकरे गटातील काही कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली. यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची जोरदार चर्चा झडत आहे.
कापूरव्होळ (ता. भोर) येथे शुक्रवारी (दि. 12) झालेल्या प्रचार दोर्यात सुप्रिया सुळे यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार संग्राम थोपटे असतील, असा शब्द देते, असे बोलल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ठाकरे गटातील कुलदीप कोंडे यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली होती. सुळे ओघात बोलल्या, असे शरदचंद्र पवार गटातील स्थानिक नेत्यांमधून सारवासारव केली जात आहे. रविवारी झालेल्या प्रचार मेळाव्यात आमदार सचिन अहिर यांनी ही लढाई भाजपबरोबर आहे. आढेवेढे न घेता सुळे यांना विजयी करण्याच्या सूचना ठाकरे गटातील पदाधिकारी व शिवसैनिकांना दिल्या, तर पक्षश्रेष्ठींचे आदेश पाळून सुप्रिया सुळे यांना विजयी करू; मात्र आमच्यात गैरसमज होणार नाही अशी विधाने करू नयेत, अशी विनंती कुलदीप कोंडे यांनी सुळे यांना केली. मात्र, सुळे यांनी उमेदवारीच्या वाक्यावर अधिक बोलणे टाळले. यामुळे भोरमधील शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना विजयी करू; मात्र विरोधकांसोबत (काँग्रेस) आम्ही प्रचारासाठी फिरणार नाही. सुळेंसाठी स्वतंत्र प्रचार करू, अशी भूमिका घेत गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गट काँग्रेससोबत प्रचार करण्यासाठी जात नाही. त्यातच सुप्रिया सुळे यांनी एका सभेत विधानसभेचे उमेदवार म्हणून आमदार संग्राम थोपटे यांच्या नावाची घोषणा केल्याने गेल्या दोन दिवसांपासून शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
काँग्रेसकडून सावध भूमिका
सुळे यांनी थोपटे यांची विधानसभेची उमेदवारी जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात घमासान सुरू आहे. मात्र, काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्याकडून त्या वाक्याबाबत सावध भूमिका घेत कोणावरही टीका न करता ‘सध्या सुळे यांना विजयी करण्याचे ध्येय असून, सर्वांनी एकदिलाने काम करूया,’ असे सांगितले.
हेही वाचा
Dhule News | ज्ञान हाच जीवनाचा व व्यक्तिमत्व विकासाचा पाया आहे : प्रा.डॉ.सतीश मस्के
Loksabha election : निवडणूक लोकसभेची की सरपंचांची?
बप्पी लाहिरी पाणीपुरी : सोन्या-चांदीने सजली, ड्रायफ्रूट्सने मढली, थंडाईने भरली
Latest Marathi News आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता? सुप्रिया सुळेंचे ‘ते’ विधान चर्चेत Brought to You By : Bharat Live News Media.
