तडका : अवकाळी इथेही आणि तिथेही
सध्या महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. अवकाळी म्हणजे बिगर मोसमी. थोडक्यात म्हणजे, पाऊस हा पावसाळ्यात पडला तर ते योग्य असते; पण तो इतर वेळी पडला तर मात्र त्याला अवकाळी असे म्हटले जाते. अवकाळी जसा पाऊस असतो तशी माणसेही असतात. अचानक काहीतरी अनपेक्षित कृती करणार्या माणसांना अवकाळी असे म्हटले जाते.
लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून असंख्य अवकाळी माणसे महाराष्ट्राच्या राजकीय रंगभूमीवर अवतीर्ण झाली आहेत आणि त्यांनी जवळपास प्रत्येक मतदारसंघात धुमाकूळ घातला आहे. लोकसभा निवडणूक होणार हे तर प्रत्येकाला सहा महिने आधीच माहीत होते. तुम्हा-आम्हा सामान्य लोकांना असे वाटले की, किमान तीन महिने आधी जसे चित्रपटाचे तिकीट वाटप होते आणि त्या त्या जागेवर त्या व्यक्तीला बसवावे लागते तसे होईल. परंतु, तसे काही न होता तिकीट वाटपाचे गुर्हाळ सुरूच आहे. याला मुख्यत: कारणीभूत आहेत ती अवकाळी माणसे. पक्षाचे नेते एका विशिष्ट व्यक्तीला लोकसभेचे तिकीट देण्याचे ठरवतात आणि अचानक त्याच पक्षामधला एखादा नेता धूमकेतूसारखा उभा राहतो आणि मला तिकीट का देत नाहीत, असा जाहीर खडा सवाल उभा करतो. नेत्यांना त्याला बाबापुता करून, कसेबसे समजावून सांगून खाली बसवावे लागते. याचा अर्थ प्रत्येक उमेदवाराचा उमेदवारी मिळवण्याचा मार्ग हा काट्याकुट्यांनी भरलेला आहे, असे म्हटले तर चूक होणार नाही.
बरेचदा राजकारणामध्ये टिकून राहावे किंवा आपल्याकडे जनतेचे लक्ष वेधून घ्यावे म्हणून एखादा बंडखोर उभा राहतो आणि अवकाळी पावसासारखा सर्वत्र धिंगाणा करायला सुरुवात करतो. त्याची फारशी अपेक्षा नसते. कुणीतरी मोठ्या नेत्याने त्याला समजवावे आणि उमेदवारी मागे घेऊन निमूटपणे पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचाराला लागावे येवढीच अपेक्षा असते. त्यासाठी वर्तमानपत्रे, मीडिया, टीव्ही या सर्वांचा वापर केला जातो आणि या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आपणही कुणीतरी आहोत, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो. पक्षश्रेष्ठींनाही अशा लोकांची पूर्ण जाणीव असते. मग, ते त्याला मुंबईला बोलावतात. एखादा लाख रुपये खर्च करून काही कार्यकर्ते बरोबर घेऊन हा मुंबईला जातो. तिथे नेते त्याला समजावून सांगतात आणि मग नेत्याच्या बंगल्यातून बाहेर पडताना तो ‘व्ही फोर व्हिक्टरी’ असे साईन दाखवत म्हणजे बोटाचे चिन्ह दाखवत सुहास्य वदनाने बाहेर पडतो. याचा अर्थ ‘अवकाळी पाऊस’ आता पडून गेला आहे. किमान महिनाभर तरी तो शांत राहील, याची खात्री नेत्यांना आणि त्या स्वतः कार्यकर्त्यालाही असते.
प्रत्येक पक्षामध्ये असे अवकाळी लोक उभे राहत आहेत किंबहुना उभे राहण्याची धमकी देत आहेत आणि कुणीतरी समजावून सांगितले की, समजून घेत आहेत आणि समजूतदारपणे माघार पण घेत आहेत. अशा प्रकारचे उपद्व्याप करणार्या व्यक्तींना अवकाळी असे म्हटले, तर ते चुकीचे ठरणार नाही. काही अवकाळी मात्र निर्णयावर ठाम असतात आणि बंडाचा झेंडा उभारतात. बरेच लोक त्याला समजावून सांगतात. वरिष्ठ नेते समजावून सांगतात; पण ते ऐकत नाहीत. बंडखोरी कराल, तर राजकारणातून संपवू अशी धमकी पण दिली जाते. असे लोक नेतृत्वाचीच परीक्षा घेत असतात.
Latest Marathi News तडका : अवकाळी इथेही आणि तिथेही Brought to You By : Bharat Live News Media.