कवलापुरात अमावास्येला अघोरी प्रकार; बोकडास झाडाला उलटे टांगले, तडफडून मृत्यू
सांगली; Bharat Live News Media वृत्तसेवा : कवलापूर (ता. मिरज) येथे ओढ्यापासून काही अंतरावर शेतात लिंबाच्या झाडाला दर्श सोमवती अमावास्येच्या दिवशी कोणीतरी अंधश्रद्धेतून एक जिवंत बोकड आणून त्याचे मागील दोन पाय दोरीने बांधून त्याला झाडाच्या फांदीला उलटे लटकवून ठेवले. यामध्ये बोकडाचा तडफडून मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारी हा अघोरी प्रकार उघडकीस आला.
कवलापुरातील शिवाजीराव पाटील यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीला याची माहिती दिली. अंनिसचे कार्यकर्ते डॉ. संजय निटवे, राहुल थोरात, फारुख गवंडी यांनी भेट देऊन पाहणी केली. लिंबाच्या झाडाला एक वर्ष वयाचे, अंदाजे दहा किलो वजनाचे बोकड मागील दोन पाय दोरीने बांधून उलटे टांगून ठेवल्याचे निदर्शनास आले. आठवडाभर ते बोकड तसेच राहिल्यामुळे त्याचा तडफडून मृत्यू झाला आहे.
हा सर्व प्रकार अमावास्येच्या रात्री ज्याप्रकारे केला आहे, यामागे अघोरी प्रथा आणि अंधश्रद्धेचा प्रकार दिसून येतो.
आजुबाजूच्या शेतकर्यांकडे चौकशी करण्यात आली असता, त्यांनी सांगितले की, पाडव्याच्या आदल्यादिवशी असणार्या सोमवती अमावास्येच्या रात्री एक गाडी रस्त्याकडेला येऊन थांबली होती. त्यातील लोकांनी हा प्रकार केला असावा, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. यापूर्वीही कवलापूर-रसूलवाडी रोडवर असेच झाडाला बोकड उलटे टांगून अघोरी प्रकार केला गेला होता. झाडाला असे उलटे जिवंत बोकड टांगून त्याचा बळी देण्याचा अघोरी प्रकार पहिल्यांदाच आम्ही पाहत आहे, असे अंनिसचे कार्यकर्ते राहुल थोरात, फारूक गवंडी यांनी सांगितले.
मांत्रिकाचा हात!
कोणीतरी मांत्रिकाच्या किंवा देवऋषाच्या सल्ल्यानुसार हा अमावास्येच्या दिवशी प्रकार केला असण्याची शक्यता आहे. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात माहिती दिली आहे.
माहिती द्यावी : अंनिसचे आवाहन
या प्रकाराबद्दल अधिक माहिती कोणाला असल्यास त्यांनी पोलिसांशी किंवा अंनिस कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. तसेच अशा प्रकारामुळे घाबरून न जाता नागरिकांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाने विचार करून अंधश्रद्धेला आपल्या आयुष्यात थारा देऊ नये असेही आवाहन अंनिसने केले आहे.
Latest Marathi News कवलापुरात अमावास्येला अघोरी प्रकार; बोकडास झाडाला उलटे टांगले, तडफडून मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.