छत्रपती घराण्याच्या उपकारामुळेच बिनशर्त पाठिंबा : ए. वाय. पाटील
कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : राधानगरी तालुक्यावर छत्रपती घराण्याचे मोठे उपकार आहेत. त्यांच्यामुळे आज कोल्हापूर जिल्हा सुजलाम, सुफलाम आहे, याची जाणीव ठेवून त्यातून उतराई होण्यासाठी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांना बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी जाहीर केले.
शाहू महाराज यांना पाठिंबा देण्याबाबत ए. वाय. पाटील गटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. रविवारी त्यांनी शाहू महाराज यांना पाठिंबा जाहीर करत महायुतीला धक्का दिला. ए. वाय. पाटील जोरदार शक्तिप्रदर्शन करत शेकडो कार्यकर्ते व समर्थकांसह रविवारी न्यू पॅलेसवर पाठिंबा जाहीर करण्यासाठी आले होते. या ठिकाणी झालेल्या मेळाव्यात पाटील यांनी आपली भूमिका जाहीर केली.
ते म्हणाले, महापुरुषांचा समतेचा विचार घेऊन शाहू महाराज संपूर्ण आयुष्य जगत आले आहेत. सध्या देशाचे संविधान धोक्यात आहे. संविधान वाचविण्यासाठी इंडिया आघाडी प्रयत्न करत असल्याने आघाडीची ताकद वाढविली पाहिजे. कोल्हापुरातून शाहू महाराज यांच्यावर संविधान वाचविण्याची जबाबदारी काही प्रमुख मंडळींनी दिली आहे. त्यांना दिल्लीत पाठविण्याची जबाबदारी आता जिल्ह्यातील जनतेची देखील आहे. यात राधानगरी कुठेही कमी पडणार नाही.
ए. वाय. पाटील यांनी दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यामुळे उमेदवारीस अधिक ताकद मिळाली आहे. पाटील जेथे होते तेथे त्यांना न्याय मिळाला नसल्याची त्यांच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. आता त्यांनी घेतलेली दिशा त्यांच्या भविष्यातील राजकीय जीवनात त्यांचे नक्की चीज करेल, असा विश्वास शाहू महाराज यांनी व्यक्त केला.
शाहू महाराज यांच्यावर टीका करणार नाही, असे म्हणणार्यांनी आता अपप्रचार करण्यास सुरुवात केली आहे. आम्ही मात्र कै. सदाशिवराव मंडलिक यांच्याबद्दलचा आदर राखून 2009 च्या निवडणुकीत टीका केली नसल्याचे आ. सतेज पाटील यांनी सांगितले.
शिवसेनेचे संजय पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, बाजार समितीचे संचालक शिवाजीराव पाटील, भोगावती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष राजाराम कवडे यांचीही भाषणे झाली. बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक नेताजी पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. भोगावती कारखान्याचे संचालक मानसिंग पाटील यांनी आभार मानले.
मेळाव्यास माजी आमदार मालोजीराजे, शिवसेना सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, पी. डी. धुंदरे, मधुकर रामाने, कृष्णात पाटील, ए. डी. पाटील, सुशील पाटील-कौलवकर आदी उपस्थित होते.
आपण व सतेज पाटील तुमच्यासोबत 34 वर्षांनंतर भोगावती कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी व ए. वाय. एकत्र आलो. आता लोकसभा निवडणुकीतही त्यांनी आमच्याबरोबर राहण्याचा योग्य वेळी निर्णय घेतला आहे. भविष्यात आपण व सतेज पाटील तुमच्यासोबत असेन, अशी ग्वाही आमदार पी. एन. पाटील यांनी दिली.
14 अंक आणि योगायोग
ए. वाय. पाटील यांनी पाठिंबा जाहीर केला तो 14 तारखेला आणि ए. वाय. पाटील यांच्यासह त्यांच्या अनेक समर्थक कार्यकर्त्यांच्या चारचाकी व अगदी दुचाकींचा क्रमांकसुद्धा 14 आहे. याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू होती.
Latest Marathi News छत्रपती घराण्याच्या उपकारामुळेच बिनशर्त पाठिंबा : ए. वाय. पाटील Brought to You By : Bharat Live News Media.