कोल्हापूर : अंबाबाई मूर्ती संवर्धन प्रक्रिया सुरू
कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मूर्तीच्या संवर्धनाची प्रक्रिया रविवारी सकाळी सुरू करण्यात आली. सोमवारी सायंकाळपर्यंत हे काम पूर्ण केले जाणार आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या तज्ज्ञांकडून हे काम करण्यात येत आहे. दरम्यान, पितळी उंबर्याबाहेर ठेवलेल्या कलश आणि उत्सवमूर्तीचे भाविकांनी दर्शन घेतले.
अंबाबाई देवीच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रिया करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रशासक अमोल येडगे यांनी भारतीय पुरातत्त्व विभागाला कळविले होते. त्यानुसार भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या वतीने मूर्तीचे संवर्धन करण्यात येत आहे.
मूर्तीच्या गळ्याखालच्या भागाची झीज झाली आहे. काही भागाला तडे गेले असून ते 2015 साली झालेल्या रासायनिक संवर्धनासाठी वापरल्या गेलेल्या साहित्याला तडे गेले आहेत. त्यामुळे चेहरा व किरीट या भागाचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने भारतीय पुरातत्त्व विभागाच्या विज्ञान शाखेच्या अधिकार्यांनी 12 व 13 एप्रिल रोजी मूर्तीची पाहणी केली. शनिवारी मध्यरात्रीनंतरही ही पाहणी सुरू होती.
पाहणीनंतर संवर्धन प्रक्रियेचा क्रम निश्चित करण्यात आला. त्यानुसार रविवारी सकाळी साडेनऊ वाजता मूर्तीच्या संवर्धन प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे प्रशासक अमोल येडगे, समितीचे सचिव तथा राधानगरी, कागलचे प्रांताधिकारी सुशांत बनसोडे, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचे तीन तज्ज्ञ अधिकारी, राज्य पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. विलास वाहणे यांच्या उपस्थितीत संवर्धनाचे काम सुरू झाले. सायंकाळी साडेसहापर्यंत हे काम सुरू होते. सोमवारी सकाळी आठ वाजता हे काम पुन्हा सुरू केले जाणार असून सायंकाळी पाचपर्यंत ते पूर्ण होईल, अशी शक्यता आहे.
दरम्यान, आजपासून मूळ मूर्तीचे गाभार्यातील दर्शन बंद ठेवण्यात आले. भाविकांसाठी कलश आणि उत्सवमूर्ती पितळी उंबर्याबाहेर दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. उत्सवमूर्तीची सालंकृत पूजा बांधण्यात आली. रविवार असल्याने आज दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची रांग होती. सायंकाळपर्यंत गर्दी कायम होती.
Latest Marathi News कोल्हापूर : अंबाबाई मूर्ती संवर्धन प्रक्रिया सुरू Brought to You By : Bharat Live News Media.