छोट्याशा खडकावर बांधले चिमुकले घर!

लंडन : जगात अनेक लहान-मोठी बेटं पाहायला मिळतात. अनेकांनी त्यावर आपली घरेही उभी केली आहेत. काही बेटं तर श्रीमंत लोकांच्या खासगी मालकीचीही आहेत. त्यावरील घरेही लोकांचे लक्ष वेधून घेत असतात. मात्र, युरोपमधील सर्बिया या देशातील एका नदीमध्ये असलेले चिमुकले बेट व त्यावरील तसेच चिमुकले घर पर्यटकांचे आकर्षण आहे.
सर्बियातील ड्रीना नदीमधील एका खडकावर हे घर आहे. हे अनोखे घर 50 वर्षांपूर्वी बनवण्यात आले. नॅशनल जिऑग्राफिकवर या घराचा फोटो दाखवल्यापासून ते चर्चेत आले आणि तिथे पर्यटकांचा ओघ सुरू झाला. हे घर बॅजिन बास्ता नावाच्या एका वस्तीजवळ वाहणार्या नदीत आहे. हे ठिकाण टारा नॅशनल पार्कच्या जवळ आहे. नदीपात्रातील एका खडकावर बांधलेले हे घर गेली पाच दशके वेगवेगळ्या हवामानाचा सामना करीत अजूनही टिकून आहे. अर्थात, अनेक वेळा त्याची डागडुजीही केलेली आहे.
सन 1968 मध्ये हे घर बांधण्यात आले. नदीत पोहायला येणार्या एका समूहाला अशा ठिकाणाचा शोध होता, जे त्यांना स्विमिंगवेळी विश्रांती घेण्यासाठी उपयुक्त ठरेल. त्यांना या खडकावर घर बांधण्याची कल्पना सुचली. हंगेरीचे फोटोग्राफर इरीन बेकर यांनी या घराचा फोटो काढला व तो जगप्रसिद्ध झाला.
Latest Marathi News छोट्याशा खडकावर बांधले चिमुकले घर! Brought to You By : Bharat Live News Media.
