विटा : वाळूजमध्ये उरूसातला बैलगाडा अंगावरून गेल्याने तरुणाचा मृत्यू

विटा; Bharat Live News Media वृत्तसेवा : उरुसातल्या बैलगाडा पळवण्याच्या कार्यक्रमात चाकाखाली आल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. रोहन राजेंद्र घोरपडे (वय २३, रा. लेंगरे ता. खानापूर जि. सांगली) ही घटना आज (दि. १३) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वाळूज (ता. खानापूर) येथे घडली. याप्रकरणी विट्यातील डॉ. भरत देवकर यांनी या घटनेची विटा पोलिसांत वर्दी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या यात्रा, जत्रा आणि उरुसाचे दिवस आहेत. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील वाळूज येथे पिराचा उरूस सुरू आहे. आज पिराच्या खडी येथे बैलगाडे पळवण्याची अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. पारंपारिक प्रथेनुसार सायंकाळी बैलगाडी पळवण्याचा कार्यक्रम सुरू झाला. मात्र यातीलच एक बैलगाडा पळत असताना थेट कार्यक्रम पहायाला जमलेल्या गर्दीत घुसला. या धावपळीत रोहन घोरपडे या लेंगरेच्या तरुणाच्या अंगावरून बैलगाड्याचे चाक गेले. उरुसासाठी बनवण्यात आलेल्या या बैलगाड्याचे चाक मोठे आणि वजनदार असते. हे चाक अंगावरून गेल्याने रोहन गंभीर जखमी झाला. त्याच्या सोबत असणाऱ्या जगदीश अर्जुन मोरे याने त्याला तातडीने विट्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र रस्त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. या प्रकरणाची पोलिसात नोंद करण्यात आली आहे. रोहन हा अतिशय हरहुन्नरी आणि मनमिळाऊ स्वभावाचा होता. लहानपणी वडीलांच्या मृत्यू नंतर तो आजोळी लेंगरे येथे रहात होता. आई, आजोबा, मामांनी अतिशय कष्टाने आणि प्रेमाने त्याला वाढवले. नुकताच तो पुणे येथे नोकरी च्या निमित्ताने स्थायिक झाला होता. लेंगरे गावच्या यात्रेसाठी नुकताच तो गावी आला होता. मात्र लेंगरे गावा जवळील वाळूज गावच्या उरुसातील बैलगाडे पाहण्यासाठी तो मित्रांसोबत गेला होता. मात्र तेथेच त्याचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेने परिसरावर शोककळा पसरली आहे.
Latest Marathi News विटा : वाळूजमध्ये उरूसातला बैलगाडा अंगावरून गेल्याने तरुणाचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.
