LokSabha Elections | काकडे, तावरेंच्या भेटीने पवारांकडून नवीन समीकरणे?

बारामती : Bharat Live News Media वृत्तसेवा : ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी शुक्रवारी (दि. 12) काकडे कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतल्यानंतर एकेकाळचे जुने व विश्वासू सहकारी चंद्रराव तावरे यांचीही भेट घेतली. या भेटीने बारामती तालुक्यात नवीन राजकीय समीकरणे उदयाला येतील का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. माजी खासदार कै. संभाजीराव काकडे यांच्या पत्नी कंठावतीताई यांचे नुकतेच पुण्यात निधन झाले. त्यानंतर सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील काकडे कुटुंबाच्या निवासस्थानी जात भेट घेतली होती. शुक्रवारी शरद पवार यांनी थेट निंबुत गाठत येथे ज्येष्ठ नेते श्यामकाका काकडे, सतीश काकडे यांची सांत्वनपर भेट घेतली. या भेटीत अन्य कोणतीही चर्चा झाली नाही. परंतु, बारामती तालुक्यात काकडे व पवार यांचा संघर्ष जनतेने अनेक वर्षे पाहिला आहे.
आता राष्ट्रवादीतील फुटीनंतर राजकीय समीकरणे बदलली आहेत. सध्या काकडे परिवारातील सतीश काकडे हे अजित पवार यांच्यासोबत आहेत. ‘सोमेश्वर’चे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे हेही अजित पवार यांच्या साथीला आहेत. राजकारणात कधी काय घडेल, याचा भरवसा आज-काल राहिलेला नाही. सतीश काकडे हे अन्य बाबतीत अजित पवार यांच्या सोबत असले, तरी सोमेश्वर कारखान्याबाबत त्यांनी सभासदहितासाठी लढा कायम ठेवला आहे. परंतु, राजकारणात कधी काय घडेल, याचा भरवसा आज-काल राहिलेला नाही. दुसरीकडे, सांगवी परिसरात पवार आल्यानंतर त्यांनी चंद्रराव तावरे यांचीही भेट घेतली. एकेकाळी हे दोघे मित्र बारामतीच्या राजकारणात एकत्र होते.
अजित पवार यांच्या राजकारणामुळे ते एकमेकांपासून दुरावले. त्यात शरद पवार यांनी मध्यस्थीचाही प्रयत्न केला होता. परंतु, तरीही मनोमिलन झाले नाही. चंद्रराव तावरे-रंजन तावरे या गुरू-शिष्यांच्या जोडगोळीने अजित पवार यांच्याविरोधात माळेगाव कारखान्याबाबत विरोधी भूमिका घेतली. सोमेश्वरची गावे माळेगाव कारखान्याला जोडण्याच्या विषयात प्रतिष्ठा पणाला लावत हा डाव हाणून पाडला होता.
आता राजकीय समीकरणे बदलली असून, खुद्द अजित पवार हेच महायुतीसोबत गेले आहेत. चंद्रराव व रंजन तावरे हे भाजपमध्ये सक्रिय आहेत. अद्याप ते महायुतीच्या प्रचारात बारामतीत दिसलेले नाहीत.
पक्ष म्हणून ते आता काय भूमिका घेतात, हेही अजून स्पष्ट झालेले नाही. आता पवार यांच्या भेटीनंतर नवीन राजकीय समीकरणे भविष्यात उदयाला येऊ शकतील, अशीही शक्यता वर्तविली जात आहे. माळेगाव कारखान्यावर सध्या अजित पवार गटाचे वर्चस्व आहे. भविष्यात कारखाना ताब्यात घ्यायचा झाल्यास या गुरू-शिष्यांना शरद पवार यांची मदत गरजेची आहे. त्यामुळे भविष्यात राजकारणात काय घडेल, याकडे आता जनतेचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, चंद्रराव तावरे यांनी पवारांच्या भेटीवर ’ते सांत्वनपर भेटीसाठी या भागात आले होते. त्यांचा पक्ष वेगळा, आमचा पक्ष वेगळा आहे. आमच्यात अन्य कोणतीही चर्चा झाली नसल्याचे’ सांगितले आहे.
हेही वाचा
वन्यप्राणी, पशू-पक्ष्यांसाठी टँकरने पाणी : वन विभाग
ढगाळ हवामानाने कांदा उत्पादकांची चिंता वाढली; बराकी बांधण्याची कामे सुरू
Crime News : अखेर सराइत गुन्हेगाराला पोलिसांकडून अटक
Latest Marathi News LokSabha Elections | काकडे, तावरेंच्या भेटीने पवारांकडून नवीन समीकरणे? Brought to You By : Bharat Live News Media.
