प्रेमजाल! विवाहबाह्य प्रेमसंबंध अन् मृत्यू, पण शवविच्छेदनातून भलतेच आले समोर

विवाहबाह्य प्रेमसंबंधातून पाच ते सहा जणांनी एका तरुणाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्यांनी दारू आणि गांजाच्या व्यसनामुळे चक्कर येऊन पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची स्टोरी तयार केली. मात्र, शवविच्छेदन अहवालात भलतेच समोर आले. मग काय, पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करताच या प्रकरणाचे बिंग फुटले… बारामतीतील वडकेनगर येथील … The post प्रेमजाल! विवाहबाह्य प्रेमसंबंध अन् मृत्यू, पण शवविच्छेदनातून भलतेच आले समोर appeared first on पुढारी.

प्रेमजाल! विवाहबाह्य प्रेमसंबंध अन् मृत्यू, पण शवविच्छेदनातून भलतेच आले समोर

अशोक मोराळे, पुणे

विवाहबाह्य प्रेमसंबंधातून पाच ते सहा जणांनी एका तरुणाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्यांनी दारू आणि गांजाच्या व्यसनामुळे चक्कर येऊन पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची स्टोरी तयार केली. मात्र, शवविच्छेदन अहवालात भलतेच समोर आले. मग काय, पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करताच या प्रकरणाचे बिंग फुटले…
बारामतीतील वडकेनगर येथील संग्राम साळुंके (वय22) हा पेशाने लोहार काम करणारा एक तरुण. इंस्टाग्रामच्या माध्यमातून त्याची पुण्यातील एका विवाहित महिलेसोबत ओळख झाली. पुढे मैत्री आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांचा एकमेकांवर जीव जडला. अधूनमधून तो प्रेयसी महिलेला भेटायला पुण्यात येत असे. असाच एकदा प्रेयसीला भेटायला पुण्याला जाताना 2023 मध्ये संग्रामचा अपघात झाला. त्याच्या डोक्याला मार लागल्याने मोठी शस्त्रक्रिया करावी लागली. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर त्याची प्रेयसी त्याला रुग्णालयात भेटायला गेली होती. या अपघातानंतरदेखील संग्रामचे अधूनमधून तरुणीच्या घरी चोरीछुपे येणे-जाणे सुरूच होते.
2 डिसेंबर 2023 रोजी संग्राम असाच त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी पुण्यात आला होता. त्याची प्रेयसी बिबवेवाडी येथे माहेरी आली होती. अशातच प्रेयसीच्या भावाला संग्राम आणि त्याच्या बहिणीच्या नात्याची माहिती मिळाली होती. तेव्हापासून त्याच्या डोक्यात संग्रामचा काटा काढण्याचा डाव सुरू होता. त्या दिवशी प्रेयसीच्या भावाने संग्रामला पाहिले. याची माहिती त्याने आपल्या मेहुण्याला म्हणजेच प्रेयसीच्या पतीला दिली. आरोपींनी पाळत ठेवून संग्रामला बिबवेवाडीतील एका सर्व्हिस सेंटरजवळून एका दुचाकीवर बसवून अप्पर इंदिरानगर परिसरात गॅस गोदामाजवळ नेले. तेथे त्याला बेदम मारहाण केली. मारहाणीत तो गंभीर जखमी झाला आणि या मारहाणीतच संग्रामचा मृत्यू झाला.
आता पोलिसांचा ससेमिरा पाठीमागे लागणार याची कल्पना त्यांना आली होती. त्यामुळे हा खून पचविण्यासाठी आरोपींनी दमबाजी करून संग्रामच्या प्रेयसीलाही या कटात सामील करून घेतले. त्यानुसार संग्रामच्या प्रेयसीने संग्रामच्या घरी फोन करून त्याला अपघात झाल्याचे सांगितले. संग्रामला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी विचारले तेव्हा प्रेयसीने सांगितले की, संग्रामला गांजा आणि दारूचे व्यसन असून, तो चक्कर येऊन पडला आहे. उपचारा दरम्यान डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. मात्र, शवविच्छेदन अहवालात त्याचा गंभीर मारहाण झाल्याचे मृत्यू झाल्याचे समोर आले.
प्रेयसी आणि आरोपींनी संग्रामला ससून रुग्णालयात दाखल करताना आंबेगाव परिसरात तो चक्कर येऊन पडल्याची माहिती दिली होती. त्यामुळे डॉक्टरांनी याबाबत भारती विद्यापीठ पोलिसांना या घटनेबाबत कळविले. तपासादरम्यान हा प्रकार बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने त्यांच्याकडे तपास देण्यात आला होता. पोलिसांच्या नजरेतून सुटण्यासाठी आरोपींनी चांगलीच खबरदारी घेतली होती. चौकशीदरम्यान आरोपींनी दिलेली उत्तरे संशयास्पद वाटल्यामुळे पोलिसांनी आपल्या कामाला सुरुवात केली होती. खबरे, तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्हीची यंत्रणा पोलिसांनी पडताळून पाहिली. त्याचवेळी एका सीसीटीव्हीत आरोपी संग्रामला घेऊन जाताना कैद झाले होते.
तोच धागा धरून पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी संग्रामचा मारहाण करून खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यामुळे कानुन के हात लंबे होते है, असे उगीच म्हटले जात नाही. ही कामगिरी पोलिस उपायुक्त आर. राजा, सहायक पोलिस आयुक्त गणेश इंगळे यांच्या पथकाने केली.
Latest Marathi News प्रेमजाल! विवाहबाह्य प्रेमसंबंध अन् मृत्यू, पण शवविच्छेदनातून भलतेच आले समोर Brought to You By : Bharat Live News Media.