न्यूमोनिया : वेळीच उपचार गरजेचे

न्यूमोनिया हा एक सामान्य आजार आहे; परंतु त्याची काळजी न घेतल्यास व्यक्तीचा मृत्यूदेखील होऊ शकतो. बॅक्टेरिया, विषाणू आणि रासायनिक प्रदूषणामुळे फुफ्फुसांमध्ये सूज निर्माण होते आणि याच स्थितीला न्यूमोनिया असे म्हणतात. न्यूमोनिया दोन प्रकारचा असतो. एक असतो लोबर न्यूमोनिया आणि दुसरा असतो ब्रोंकाईल न्यूमोनिया. लोबर न्यूमोनियामध्ये फुफ्फुसाचा एक किंवा जास्त भाग प्रभावित होतो, तर ब्रोंकाईल न्यूमोनियामध्ये … The post न्यूमोनिया : वेळीच उपचार गरजेचे appeared first on पुढारी.

न्यूमोनिया : वेळीच उपचार गरजेचे

डॉ. संजय गायकवाड

न्यूमोनिया हा एक सामान्य आजार आहे; परंतु त्याची काळजी न घेतल्यास व्यक्तीचा मृत्यूदेखील होऊ शकतो. बॅक्टेरिया, विषाणू आणि रासायनिक प्रदूषणामुळे फुफ्फुसांमध्ये सूज निर्माण होते आणि याच स्थितीला न्यूमोनिया असे म्हणतात.
न्यूमोनिया दोन प्रकारचा असतो. एक असतो लोबर न्यूमोनिया आणि दुसरा असतो ब्रोंकाईल न्यूमोनिया. लोबर न्यूमोनियामध्ये फुफ्फुसाचा एक किंवा जास्त भाग प्रभावित होतो, तर ब्रोंकाईल न्यूमोनियामध्ये पूर्ण फुफ्फुसावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
जिवाणूजन्य न्यूमोनिया : या आजाराची लक्षणे अचानक दिसून येतात. 103 अंश फॅरनहाईटपर्यंत ताप येतो, श्वास जोराजोरात चालतो, खोकला, नखे किंवा ओठ निळे पडणे किंवा उलटी आल्यासारखे होते, भूक लागत नाही आणि जुलाब होतात. शरीरातील पाणी कमी होते, ही प्रमुख लक्षणे आहेत.
विषाणुजन्य न्यूमोनिया ः जिवाणूजन्य न्यूमोनियापेक्षा हा गंभीर आजार आहे. लहान मुलांना एकदा विषाणुजन्य न्यूमोनिया झाल्यास तो भविष्यातही उलटण्याची शक्यता असते. सर्वसाधारणपणे सर्दी-खोकल्यापासून त्याची सुरुवात होते. त्यानंतर रुग्णाची स्थिती बिघडते. लहान मुलांमध्ये याची विशेष लक्षणे दिसतात. मुलांना 101.5 अंश फॅरनहाईटपर्यंत ताप येतो. खोकला, श्वासोच्छ्वासाची गती वाढते. घशातून घरघर आवाज येणे, डायरिया इत्यादी लक्षणे दिसतात.
प्रमुख तपासण्या आणि उपचार
तपासण्या ः न्यूमोनियाचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी रक्ताची चाचणी केली जाते किंवा कल्चर टेस्ट केली जाते. शिवाय कफाची चाचणी केली जाते. फुफ्फुसाच्या कार्यक्षमतेच्या चाचणीवरून त्यांच्या स्थितीचा अंदाज लावता येतो. विशेषतः स्टेथोस्कोपच्या मदतीने श्वास आणि हृदयाची गती जाणून घ्यायचा प्रयत्न करतात. या दरम्यान मुलाला श्वास घेण्यास आणि स्तनपान करण्यास त्रास होत असेल तर त्यावर ताबडतोब उपचार केले पाहिजेत.
न्यूमोनियाला कारणीभूत असणारा विषाणू सामान्यत: 4 ते 5 वर्षांच्या लहान मुलांना लक्ष्य करतो. या वयोगटातील मुलांमध्ये मध्यम परिणामाचा न्यूमोनिया मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. या न्यूमोनियामध्ये मध्यम गंभीर स्वरूपाची लक्षणे दिसतात. जसे की घसा खवखवणे, खोकला, हलका ताप, नाकात कफ जमा होणे, अतिसार, कमी भूक लागणे आणि थकवा, तसेच शरीरात कमी ऊर्जा जाणवणे इत्यादी. यांसारखी लक्षणे बाळाला मध्यम स्वरूपातला न्यूमोनिया झाल्याची सूचना देतात. अशावेळी शक्य तितक्या लवकर डॉक्टरांचे उपचार घ्यावेत; अन्यथा हा न्यूमोनिया गंभीरसुद्धा होऊ शकतो.
बचाव कसा करायचा?
लहान मुलांचा आजारापासून बचाव करायचा असेल तर लसीकरण अत्यंत गरजेचे आहे. न्यूमोकोकल आणि मेनिंगोकोकल या लसी, खोकल्यासाठीची इंजेक्शन्स यामुळे न्यूमोनियापासून बचाव करणे शक्य होते. खासकरून स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. रोगप्रतिबंधक क्षमता वाढवण्यासाठी बाळाला पौष्टिक आहार द्यावा. सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. तसेच कोणताही त्रास होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.
Latest Marathi News न्यूमोनिया : वेळीच उपचार गरजेचे Brought to You By : Bharat Live News Media.