शिक्षिकेची विद्यार्थ्याला जबर मारहाण : व्हिडीओ व्हायरल

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : विद्यार्थ्याला किरकोळ कारणावरून शिक्षिकेने लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील नामांकित नू.म.वि. शाळेत घडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संबंधित घटना समोर आली.
विद्यार्थ्याला मारहाण केल्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुलाच्या आईने तक्रार दिली आहे. हा प्रकार मागच्या महिन्यात 7 मार्च रोजी घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा मुलगा बाजीराव रस्त्यावरील नूतन मराठी विद्यालयात नववी इयत्तेत शिकतो. घटनेच्या दिवशी दुपारी काही मुले वर्गात एका बेंचजवळ येऊन घोळका करून बोलत होते. यादरम्यान गणित या विषयाच्या शिक्षिका रजेवर असल्याने त्यांच्याऐवजी बदली शिक्षिका वर्गात आल्या.
त्या आल्यानंतर मुले आपापल्या बेंचवर जाऊन बसली. या वेळी या शिक्षिका फिर्यादी यांच्या मुलाजवळ आल्या. त्यांनी कसलाही विचार न करता मुलाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. या वेळी शिक्षिकेने मुलाचे दोन्ही हात पिरगाळून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, मारहाण करताना कोणाला सांगायचे ते सांग, अशी धमकी दिली. मात्र, परीक्षा जवळ आली असून, शिक्षिका नापास करतील, या भीतीने मुलाने कुणालाही या घटनेसंदर्भात सांगितले नाही. मारहाण होत असताना वर्गातीलच एका मुलाने त्याचा व्हिडीओ शूट केला. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर हा प्रकार त्याच्या पालकांना समजला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पुढील तपास विश्रामबाग पोलिस करत आहेत. विद्यार्थ्याच्या पालकांनी शिक्षण प्रसारक मंडळी संस्थेचे अध्यक्ष अॅड. एस. के. जैन यांना पत्र लिहून संबंधित शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
‘आहो टीचर, सोडा ना आता’
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, खाकी पँट व पांढर्या शर्टमध्ये विद्यार्थी जमिनीवर बसलेला पाहायला मिळत आहे. या विद्यार्थ्याला जाब विचारत शिक्षिका लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत आहे. ‘आहो टीचर, सोडा ना आता’, अशी विनवणी विद्यार्थी शिक्षिकेकडे करत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, याचा परिणाम संबंधित शिक्षिकेवर झाला नाही. विद्यार्थ्याचा हात पिरगाळून त्याच्या तोंडावर फटके मारताना शिक्षिका दिसत आहे.
हेही वाचा
सायरनसारखा आवाज काढणार्या पक्ष्यामुळे ब्रिटिश पोलिस त्रस्त!
तिरुचिरापल्लीत ‘पद्मश्री’ उमेदवाराचा भाजी विकून सुरू आहे प्रचार
पृथ्वीच्या जवळून गेला मोटारीच्या आकाराचा लघुग्रह
Latest Marathi News शिक्षिकेची विद्यार्थ्याला जबर मारहाण : व्हिडीओ व्हायरल Brought to You By : Bharat Live News Media.
