मुंबई : ‘वंचित’ भाजपची बी टीम : तुषार गांधी
मुंबई; Bharat Live News Media वृत्तसेवा : वंचित ही भाजपची बी टीम आहे, असा आरोप करत मतदारांनी वंचितला मतदान करू नये, असे आवाहन महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केले, तर तुषार गांधीचे वक्तव्य चुकीचे, आधार नसलेले आणि वंचितच्या राजकारणात अडथळा निर्माण करणारे आहे, असा पलटवार करत प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
तुषार गांधी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना वंचितच्या भूमिकेवर हल्ला चढवला. महाविकास आघाडीची युती हीच भाजपाला टक्कर देऊ शकते आणि त्यांच्यात हरविण्याचे सामर्थ्यदेखील आहे. त्यामुळे या निवडणुकीत लोकशाही आणि संविधान वाचवायचे असेल भाजप आणि त्यांच्यासोबत युती करणारे गद्दार पक्ष आहेत त्यांचा पराभव करावाच लागणार आहे. परंतु, त्याच्यात ज्यांनी ज्यांनी अडथळा उभा केला आहे, त्यांनाही दोष द्यावाच लागेल, असे गांधी म्हणाले. वंचितने जेव्हा जेव्हा तिसरी आघाडी उभी केली, तेव्हा भाजप आणि त्यांच्या युतीला फायदाच झाला आहे. गेल्यावेळचा संदर्भ पाहिला, तर या सर्व गोष्टी स्पष्ट होतात, असे सांगतानाच इतकी जबाबदारी प्रकाश आंबेडकर घेत नसतील तर त्यांनी मला धडे शिकवू नये, असे खडे बोलही गांधी यांनी सुनावले.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी तुषार गांधी यांचे आरोप खोडून काढले. तुम्ही केलेले विधान अत्यंत चुकीचे, कोणताही आधार नसलेले असून संसदीय लोकशाही आणि स्वतंत्र राजकीय नेतृत्वासाठीच्या प्रयत्नांना, तसेच वर्ग, जात आणि धर्माच्या पलीकडे जावून सुरू असलेल्या सर्वसमावेशक राजकारणाला नाकारणारे आहे. तुमच्या आजोबांची ब्रिटिशांविरुद्धची चळवळ सर्वसमावेशक होती. पण, तुमचे विचार आणि राजकारणामध्ये तशी स्पष्टता दिसत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.
Latest Marathi News मुंबई : ‘वंचित’ भाजपची बी टीम : तुषार गांधी Brought to You By : Bharat Live News Media.