महागाईचा दर 4.85 टक्क्यांवर
नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : मार्च महिन्यात उन्हाळ्याचे चटके जाणवू लागले असतानाच महागाईचे चटके मात्र कमी झाले आहेत. मार्च महिन्यात अन्नधान्याच्या किमती घसरल्याने महागाईचा दर गेल्या पाच महिन्यातील सर्वात कमी म्हणजे 4.85 टक्के एवढा नोंदवला गेला.
शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीत ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात 5.09 टक्के होता. त्यानंतर गतवर्षी ऑक्टोबर महिन्यातही महागाईचा दर कमी होऊन 4.87 टक्क्यांवर आला होता. यंदा मार्चमध्ये तो पुन्हा त्या पातळीच्या किंचित खाली गेला आहे.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार अन्नधान्याची महागाई मार्च महिन्यात 8.52 टक्के नोंदवली गेली. ती फेब्रुवारी महिन्यात 8.66 टक्के होती. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार मार्च महिन्यात अन्न धान्याशिवाय भाजीपाला व डाळींच्या दरात घट झाली तसेच चपला बुटांच्या किमतीतही घट बघायला मिळाली.
रिझर्व्ह बँकेच्या टार्गेटजवळ
ताज्या आकडेवारीनुसार ग्राहक किंमत निर्देशांकाधारित महागाईचा दर आता रिझर्व्ह बँकेच्या टार्गेटच्या जवळ आला आहे. रिझर्व्ह बँकेला किरकोळ महागाईचा दर 4 टक्क्यांवर आणण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे. त्यात दोन टक्क्यांची तफावत चालू शकते.
Latest Marathi News महागाईचा दर 4.85 टक्क्यांवर Brought to You By : Bharat Live News Media.