कोल्हापूर : दूधगंगा नदीचे पात्र चौथ्यांदा कोरडे! दत्तवाड परिसरात पाणीप्रश्न गंभीर

दत्तवाड; Bharat Live News Media वृत्तसेवा : दत्तवाड (ता. शिरोळ) येथील दूधगंगा नदीचे पात्र चौथ्यांदा कोरडे पडले असून पाण्याअभावी दत्तवाड परिसरातील शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. तर दत्तवाडसह घोसरवाड नवे व जुने दानवाड टाकळीवाडी आदी भागात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
गेल्या मार्च महिन्यात दूधगंगा नदीचे पात्र तब्बल तीन वेळा कोरडे पडले होते. आता एप्रिलच्या सुरुवातीलाच पुन्हा दूधगंगेचे पात्र कोरडे पडले आहे. पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे. तर वारंवार नदीपात्र कोरडे पडू लागल्याने शेतीतील पिकावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. वेळेवर पाणी उपलब्ध होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांची ऊस पिके वाळू लागले आहेत.
सतत नदीपात्र कोरडे पडू लागल्याने विहिरी व बोरवेल्स चे पाण्याची पातळी खालावत चालली आहे. अनेक घरगुती बोर पाण्याअभावी बंद पडू लागले आहेत. आता पुढची दोन-तीन महिने पाण्याचा प्रश्न कसा सोडवायचा याची चिंता नागरिकांना लागली आहे. तर मोठ्या काबाडकष्टाने वाढवलेली पिके पाण्याअभावी वाया जाणार की काय, याची भीती शेतकऱ्यांना भेडसावत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक व शेतकरी वर्ग चांगलाच संतापलेला आहे. दूधगंगा नदीवर कोणत्याही परिस्थितीत आता इचलकरंजीसाठी मंजूर झालेली सुळकूड योजना व इतर योजनाही भविष्यात होऊ द्यायच्या नाहीत असा चंग या भागातील नागरिकांनी बांधला आहे. सध्या सर्व राजकीय नेते व प्रशासन लोकसभेच्या निवडणुकीत मग्न झाले आहेत त्यामुळे त्यांना सर्वसामान्यांना निर्माण झालेल्या पाणी प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही याचाही राग नागरिकांच्यातून व्यक्त होत आहे.
दत्तवाड येथील दूधगंगा नदीवरील दत्तवाड एकसंबा बंधाऱ्यामधील बर्गे चोरीला गेल्याने येथे पाणी अडवणे अडचणीचे बनले आहे. प्रशासनाने व पाटबंधारे खात्याने लवकरात लवकर या बंधाऱ्यासाठी नवीन बर्ग्यांची व्यवस्था करावी, जेणेकरून नदीपात्रात आलेले पाणी अधिक काळ शेतकरी व नागरिकांना वापरता येईल. तसेच दत्तवाड मलिकवाड बंधाऱ्यावर बर्गे असूनही कर्नाटक प्रशासन येथे बर्गे बसवत नाही. त्यामुळे नदीपात्रात आलेले पाणी येथे न अडता ते थेट कर्नाटकातील कल्लोळ येथे कृष्णा नदी पात्रात जाऊन मिळत आहे. त्यामुळे पाटबंधारे खात्याने याची दखल घेऊन दत्तवाड मलिकवाड बंधाऱ्यावर ही मजबूत बर्गे टाकण्याची गरज आहे. तसेच प्रशासनाने दतवाड येथील दूधगंगा नदीवरील दत्तवाड सदलगा पुलाजवळ पाणी अडवण्यासाठी तटबंदी अथवा बंधारा बांधणेही गरजेचे आहे.
हेही वाचा :
छ.संभाजीनगर: टाकळी अंबड येथे वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू, बैल दगावले
दुर्दैवी ! कुलर सुरु करताना विजेचा धक्का बसल्याने १२ वर्षीय बालिकेचा मृत्यू, जळगावात हळहळ
इंदापुरात चारापीक लागवडीवर भर; चाराटंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतकरी सतर्क!
Latest Marathi News कोल्हापूर : दूधगंगा नदीचे पात्र चौथ्यांदा कोरडे! दत्तवाड परिसरात पाणीप्रश्न गंभीर Brought to You By : Bharat Live News Media.
