उधारीच्या पैशांसाठी लोकांनी तगादा लावू नये म्हणून महिलेने रचला स्वत:च्याच घरात चोरी झाल्याचा बनाव

जळगाव Bharat Live News Media वृत्तसेवा – उधार घेतलेल्या पैशांसाठी लोकांनी तगादा लावू नये म्हणून चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव येथील महिलेने वेगळीच शक्कल लढवली पण ही शक्कल या महिलेच्या आता अंगाशी आली आहे. या महिलेने घरामध्ये चोरी झाल्याचे दाखवून पोलिसांत खोटा गुन्हा दाखल केला. जेणेकरुन आता आपल्याला पैशांसाठी कोणी तगादा लावणार नाही असा यामागे महिलेचा उद्देश होता. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये, हा चोरी झाल्याचा खोटा बनाव असल्याचे सिद्द झाल्याने व पोलीस यंत्रणेला वेठीस धरल्यामुळे मिनाबाई संतोष पडवळकर यांच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकार द्वारे चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव येथे मीनाबाई संतोष पडवळकर या शेती करतात. दि. 5 रोजी त्यांनी पोलिसांना माहिती दिली की, व्यापाऱ्याला कापूस विकून मिळालेले रुपये दि. 4 ते 5 दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने घराचे कुलूप तोडुन, घरात शिरुन, घरातील लोखंडी कोठीतुन सोन्याचे दागिणे व रोख रक्कम असे मिळुन २ लाख ४९ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला. या तक्रारीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाच्या घटनास्थळास अपर पोलीस अधिक्षक, कविता नेरकर, व सहायक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, अभयसिंह देशमुख, यांनी भेटी देवून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्या करीता मार्गदर्शन करून तपास सुचना दिल्या होत्या. प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रविण दातरे, पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण, पोहेकों युवराज नाईक व पोकों किरण देवरे हे तपास करीत असताना त्यांना तपासात सदर गुन्हयाचे फिर्यादी मीनाबाई पडवळकर यांच्या सांगण्यात व प्रत्यक्ष परिस्थीतीत तफावत दिसत होती. गुन्हयातील साक्षीदार फिर्यादी मीनाबाई पडवळकर यांच्या विसंगत येत होती. त्यामुळे मीनाबाई पडवळकर याच्या सांगण्याबाबत संशय बळावला.
पो.उप नि. कुणाल चव्हाण, पो.हवा. युवराज नाईक यांनी सदर गुन्हयाशी संबंधीत साक्षिदारांकडे सखोल विचारपुस केली. त्यावेळी साक्षिदारांचे सांगणेनुसार त्यांनी फिर्यादी मिनाबाई संतोष पडवळकर यांना शेतीकामासाठी वेळोवेळी उसने पैसे दिलेले होते. सदर पैसे त्यांना मिनाबाई संतोष पडवळकर यांनी त्यांचे शेतातील कापुस जानेवारी 2024 मध्ये विकला होता त्यावेळी परत केले होते. तरीही त्यांनी काही साक्षिदारांकडुन हात उसने घेतलेले अथवा उधारीचे पैसे परत केले नाही. त्यामुळे त्यांनी मिनाबाई संतोष पडवळकर यांचेकडे वारंवार त्यांचेकडुन घेतलेले उसने पैशाची मागणी केली. परंतू मिनाबाई संतोष पडवळकर यांनी प्रत्येक वेळी त्यांना तुमचे पैसे देते असे सांगुन वेळ मारुन नेत राहिल्या.
पहाटे उठल्या, स्वत:च्याच घराचे तोडले कुलुप
गावातील आणखी काही लोकांकडुन उसने घेतलेले पैसे व खते, बी बीयाण्यांचे उधारीचे पैसे परत देण्यासाठी त्यांचेकडे पैसे शिल्लक नव्हते. परंतु लोक त्यांचेकडे पैशासाठी तगादा लावत होते. त्यामुळे मिनाबाई संतोष पडवळकर यांना पैसे घेणाऱ्यांना त्यांचे पैसे परत करण्यासाठी काही दिवसांचा अवधी पाहिजे असल्यामुळे त्यांनी दि. 05 रोजी फिर्यादी मिनाबाई यांनी स्वतः पहाटे लवकर उठून घराच्या दरवाजास लावलेले कुलूप तोडून घरात जावून तेथील सामान अस्ताव्यस्त करून त्यांच्या घरात चोरी झाल्याचा बनाव केला. जेणेकरुन त्यांचेकडे पैशासाठी तगादा लावणारे लोक त्यांचेकडे काही दिवस पैसे मागणार नाही असे गुन्हयाच्या तपासात निष्पन्न झाले, त्यामुळे सदर गुन्हयातील फिर्यादी यांनी चोरी झाल्याचा खोटा बनाव करुन पोलीस यंत्रणेला वेठीस धरल्यामुळे मिनाबाई संतोष पडवळकर यांच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसाकडून कारवाई होणार आहे.
खबरदार खोटी तक्रार द्याल तर
स.पो.नि. प्रविण दातरे, प्रभारी अधिकारी, चाळीसगाव ग्रामीण पो.स्टे. यांचेकडून चाळीसगांव व परिसरातील नागरिकांना अावाहन करण्यात येते की, पोलीस जनेतेचे सेवेसाठी व त्यांना निर्माण होणाऱ्या अडी अडचणींचे कायदेशीर मार्गाने निराकरण करण्याकरीता २४ तास तत्पर आहेत. परंतू जर कुणी अशा प्रकारे स्वतःचे स्वार्थापोटी, वैमनस्यातुन अथवा इतर काही कारणांस्तव पोलीस स्टेशनला खोटी तक्रार देवुन खोटा गुन्हा दाखल करणे असा प्रकार केल्यास संबंधित तक्रारदार याचे विरोधात प्रचलित कायदयान्वये कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल.
हेही वाचा –
येवल्यात कांदा लिलाव सुरू करण्यावरून राडा, दगडफेकीत शेतकरी जखमी; पत्रकारांनाही धक्काबुक्की
Jayant Patil |…त्यामुळेच ते शरद पवारांना भाजपमध्ये जाण्यास आग्रह करत होते: जयंत पाटील
Latest Marathi News उधारीच्या पैशांसाठी लोकांनी तगादा लावू नये म्हणून महिलेने रचला स्वत:च्याच घरात चोरी झाल्याचा बनाव Brought to You By : Bharat Live News Media.
