अजब कारभार ! वर्गखोल्यांचे काम निकृष्ट; नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी

पौड रोड : Bharat Live News Media वृत्तसेवा : पौड रोडवरील शाळा क्र. 134 मुलांची व शाळा क्र. 18 मुलींची या शाळांमध्ये सिलिंगचे निकृष्ट दर्जाचे काम करून नागरिकांच्या कररूपी पैशांची उधळपट्टी करण्यात आली आहे. मात्र, याकडे प्रशासनाने डोळेझाक केली असून, या कामामध्ये कोणाला पाठीशी घातले जात आहे, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. कोथरूड क्षेत्रीय विभागाकडून या इमारतीच्या दोन रूममध्ये साधारण 20 फूट बाय 20 फूटचे सिलिंगचे काम करण्यात आले आहे. हे सिलिंग किती दिवस टिकेल असा प्रश्न आहे. यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
शाळेच्या इमारतीवरील पत्र्यावर पडलेले झाडी-झुडपे, कचर्यामुळे पत्रे खराब झाले आहेत. त्यामुळे या पत्र्यात अनेक ठिकाणी छिद्रे पडली आहेत. त्यातून पाणी येत असल्याने पूर्वीचे सिलिंग मोठ्या प्रमाणात खराब झाल्याने हे रूम बंद ठेवण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. या ठिकाणी पर्त्यांमधून पाणी गळत असताना जुने पत्रे बदलून त्यानंतर सिलिंगचे काम अपेक्षित होते. मात्र, छिद्रे असलेल्या पत्र्यांवरच सिलिंगचे काम करण्याची किमया केली आहे.
ना नियोजन ना सुरक्षा नियम
सरळ जखमेवर उपाय न करता डायरेक्ट पट्टी बांधून जखम झाकण्याचा प्रकार येथे करण्यात आला आहे. या कामाला लाखो रुपये खर्च करण्यामागचा हेतू तरी काय? हे काम करण्यामागचे गौडबंगाल काय? व झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण? का फक्त टक्केवारीसाठी काम केले नाही ना, असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.
जनतेच्या कररूपी पैशांची अशी उधळपट्टी होणार असेल, तर या गोष्टीचा जाब संघटना, अधिकारी यांना नक्की विचारला जाईल. संबंधित अधिकारी ठेकेदार यांच्यावर कारवाई व्हावी, अन्यथा क्षेत्रीय कार्याल्यावर उग्र आंदोलन उभारले जाईल.
– सुनील मराठे, अध्यक्ष, पतित पावन संघटना, कोथरूड
निवडणुका आल्यामुळे वरिष्ठांच्या सांगण्यावरून काम करण्यात आले आहे. काही तक्रारी असतील, तर ते दूर करण्यात येतील.
– देवेंद्र राठोड, अभियंता, कोथरूड- बावधन क्षेत्रीय कार्यलय
हेही वाचा
आतकरवाडीतील जलजीवन योजना फसली! कामात गैरव्यवहाराचा आरोप
धारावीत लाखो रुपयांच्या एमडीसह तस्कराला अटक
कुरुंदवाड पोलीस ठाण्यात सेवा बजावत असताना पोलीस नाईकाचा मृत्यू
Latest Marathi News अजब कारभार ! वर्गखोल्यांचे काम निकृष्ट; नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी Brought to You By : Bharat Live News Media.
