सांगलीबाबत फेरविचार नाहीच; खा. संजय राऊतांचे संकेत

मुंबई : Bharat Live News Media वृत्तसेवा : सांगली व मिरजेत विधानसभेला संघाचा माणूस निवडून येतो आणि तेथे दंगली घडवल्या जातात. दहा वर्षांपासून सांगलीत भाजपचा खासदार निवडून येत आहे. त्यामुळे तेथे जातीय शक्ती वाढू लागल्या आहेत. त्यांचा सामना करण्यासाठी तेथे शिवसेनेची (ठाकरे गट) गरज आहे, अशी स्पष्ट भूमिका मांडत खा. संजय राऊत यांनी एकप्रकारे सांगलीच्या जागेबाबत फेरविचार करणार नसल्याचे दाखवून दिले आहे.
महाविकास आघाडीच्या जागावाटपात सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेला (ठाकरे गट) मिळाली. मात्र, सांगलीच्या जागेबाबत शिवसेनेसह महाविकास आघाडीने फेरविचार करावा, अशी मागणी काँग्रेस नेते आ. विश्वजीत कदम यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली होती. त्यासंदर्भात खा. राऊत यांनी गुरुवारी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले, आ. कदम व विशाल पाटील यांच्या भावना आम्ही समजू शकतो. आम्हाला त्यांच्याविषयी आदर आहे. पण आज तेथे परिस्थिती वेगळी आहे. तेथे जातीयवादी शक्तींशी टक्कर घ्यायची असेल तर तेथे शिवसेनेचा (ठाकरे गट) उमेदवार लढणे गरजेचा आहे ही जनभावना आहे. त्यामुळेच तेथे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यामागे शिवसेना उभी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने व काँग्रेनेही आमच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे.
आ. विश्वजीत कदम व विशाल पाटील यांचा मान राखून त्यांच्यासाठी भविष्यात काय करता येईल हे पाहू, असेही खा. राऊत म्हणाले. महाराष्ट्रातील सगळ्या 48 जागा महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढविणार आहे. प्रत्येक उमेदवार हा महाविकास आघाडीचा आहे, असेही त्यांनी सांगितले.
मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा राखावी
विरोधक हे संविधान धोक्यात असल्याचा खोटा प्रचार करतात, या पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्यावर राऊत म्हणाले, मोदी यांनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा खाली आणली आहे. राजकारणात खोटं बोलले जाते. परंतु, पंतप्रधानपदी असेलल्या व्यक्तीने इतके खोटे बोलू नये. पंतप्रधान पदावरील व्यक्तीने मर्यादा सांभाळली पाहिजे.
Latest Marathi News सांगलीबाबत फेरविचार नाहीच; खा. संजय राऊतांचे संकेत Brought to You By : Bharat Live News Media.
