लोककलावंतांच्या दौऱ्यांना उधाण; यात्रा-जत्रांमुळे कार्यक्रमांचे बुकिंग हाऊसफुल्ल

सुवर्णा चव्हाण
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : गुढीपाडव्यानंतर यात्रा-जत्रांना सुरुवात झाली आहे अन् लोककलावंतांच्या लोककलांच्या कार्यक्रमांनाही. एप्रिल आणि मे असा लोककलावंतांसाठी कार्यक्रमांचा सीझन असून, यंदा लोककलांच्या कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद आहे. त्यामुळे लोककलावंतांना महाराष्ट्रभर यात्रा – जत्रांमधील कार्यक्रमांसाठी बोलवण्यात येत आहे. तमाशा कार्यक्रमांचे सर्वाधिक बुकिंग झाले आहे. तसेच भजन-कीर्तन, महाराष्ट्राची लोकधारा, भारूड, शाहिरी जागरण गोंधळ… अशा लोककलांच्या कार्यक्रमांचेही चांगले बुकिंग झाले आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक, मुंबई, नागपूर आणि सातारा आदी ठिकाणी जाऊन कलावंत कला सादर करत आहेत. काही कलावंत ठिकठिकाणी लोककला प्रशिक्षणवर्गही घेत आहेत.
महाराष्ट्राची लोकधारापासून ते कीर्तनाच्या कार्यक्रमापर्यंतचे वैविध्यपूर्ण कार्यक्रम अगदी ग्रामीण भागातही होत आहेत. ग्रामीण भागातील धार्मिक महोत्सवांमध्ये भजन – कीर्तन, भारूड असे कार्यक्रम होत आहेत. एक कलावंत महिनाभर दहा ते बारा कार्यक्रम सादर करणार आहे. शाहिरी असो वा भारूड… अशा लोककलांनी महाराष्ट्राच्या मातीला समृद्ध केले आहे. गुढीपाडवा ते अक्षयतृतीया हा लोककलावंतांच्या कार्यक्रमांचा काळ असतो. या काळात गावात भरविल्या जाणार्या यात्रा – जत्रांसाठी कार्यक्रमांचे बुकिंग होते.
मंगळवारपासून (दि.9) म्हणजेच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लोककलावंतांच्या लोककलांच्या कार्यक्रमांचा काळ सुरू झाला असून, अक्षयतृतीया म्हणजेच 10 मेपर्यंत यात्रा – जत्रांमधील हा कार्यक्रमांचा काळ सुरू राहणार आहे.
लोककलांच्या कार्यक्रमांना कोकण विभाग असो वा सातारा… विविध जिल्ह्यांमध्ये प्रतिसाद मिळत आहे. लोककलावंतही ठिकठिकाणी दौरे करत आहेत. शाहिरी, गोंधळ, जागरण, वासुदेव, पोतराज यासह महाराष्ट्राची लोकधारा आदी कार्यक्रमांचे प्रशिक्षण दिले जात आहे.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, लोककलावंत आता वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कलांचे सादरीकरण करत आहेत. आता त्यांचे महाराष्ट्रभर दौरेही होत आहेत. विशेष करून ग्रामीण भागातील यात्रा – जत्रांमध्ये त्यांचे कार्यक्रम सादर होत आहेत. लावणी, शाहिरी, भारूड…अशा कार्यक्रमांना प्रतिसाद आहे. एका कार्यक्रमासाठी त्यांना 10 ते 20 हजार रुपयांचा आर्थिक मोबदलाही मिळत आहे.
लोककलांच्या कार्यक्रमांना प्रतिसाद असतो. यंदा आमचे मेपर्यंतचे कार्यक्रम बुक झाले आहेत. आता लोककलावंतांना कार्यक्रम मिळत असल्याने तेही उत्साहाने कार्यक्रम सादर करीत आहेत.
– राहुल पवार, लोककलावंत.
तमाशाच्या कार्यक्रमांसाठी यंदा चांगले बुकिंग मिळाल्याने फडमालक आनंदित आहेत. आमच्या फडाचे यात्रा – जत्रांसाठी दीड महिन्यासाठी 32 तमाशांचे कार्यक्रम बुक झाले आहेत. आमच्या फडात 47 कलावंत आहेत. सांगली, सातारा, नगरसह पुण्यात ठिकठिकाणी हे कलावंत सादरीकरण करत आहेत.
– रेखा चव्हाण – कोरेगावकर, संचालिका, लोकनाट्य तमाशा मंडळ.
हेही वाचा
जळगाव लोकसभा 2024 | वंचित कडून जळगाव लोकसभेसाठी प्रफुल्ल लोढा
अम्बरमध्ये अडकलेली 10 कोटी वर्षांपूर्वीची पट्टकृमी
मोदी यांच्या करिष्म्यामुळे आघाड्यांचे युग संपुष्टात
Latest Marathi News लोककलावंतांच्या दौऱ्यांना उधाण; यात्रा-जत्रांमुळे कार्यक्रमांचे बुकिंग हाऊसफुल्ल Brought to You By : Bharat Live News Media.
