विशाल पाटील यांच्याकडे भाजपमधील नाराजांचे लक्ष

सांगली; Bharat Live News Media वृत्तसेवा : महायुती आणि महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर झाली असली तरी जिल्ह्याचे लक्ष मात्र काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांच्या भूमिकेकडे लागले आहे. भाजपमधील नाराज नेतेही विशाल पाटील यांच्या हालचालींकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. संधी मिळताच हेतू साध्य करण्याचा नाराजांचा इरादा आहे.
खासदार संजय पाटील यांच्या उमेदवारीला भाजपमधील जिल्ह्यातील काही नेत्यांचा विरोध आहे. माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी तर खासदार पाटील यांना समर्थ पर्याय म्हणून शड्डू ठोकला होता; पण भाजपने अखेर खासदार पाटील यांना तिसर्यांदा उमेदवारी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील नाराजांच्या गटात असंतोष उफाळला.
भाजपचे जत तालुक्याचे नेते माजी आमदार विलासराव जगताप यांनी तर पत्रकार परिषद घेऊन खासदार पाटील यांच्या उमेवारीला कडाडून विरोध केला. जिल्ह्यातून भाजपमधील अनेक नेत्यांचा खासदार पाटील यांना उमेदवारी देण्यास विरोध असतानाही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारी लादल्याचा आरोप केला.
दरम्यान, महाविकास आघाडीकडून काँग्रेस नेते विशाल पाटील यांना उमेदवारी मिळेल, अशी आशा भाजपमधील काही नाराजांमध्ये होती. विशाल यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांना रसद पुरवायची, हेही महायुतीमधील काही नाराज नेत्यांनी ठरवले होते. पण महाविकास आघाडीची उमेदवारी ठाकरे शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांना मिळाली. त्यामुळे अनेकांचा अपेक्षाभंग झाला. लढत निकराची व्हायची असेल तर विशाल हेच विरोधी उमेदवार असले पाहिजेत, अशी धारणा बळावली आहे. काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते विशाल यांनी निवडणूक लढवावी, यासाठी आग्रही आहेत. उमेदवारी डावलल्यावरून मतदारांमध्ये विशाल पाटील यांच्याविषयी मोठी सहानुभूती आहे.
सहानुभूतीची ही लाट विशाल यांना निवडणुकीच्या पैलतिरापर्यंत सुखरूप पोहोचवेल, असा विश्वासही काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये आहे. भाजपमधील काही नाराजांनीही अशीच भावना खासगीत बोलून दाखवतात.
खासदार पाटील यांच्या भाजपमधील विरोधकांचे लक्ष विशाल यांच्या भूमिकेकडे आहे. त्यांनी बंड करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी, असे ते खासगीत सांगतात. अपक्ष उमेदवारीबाबत त्यांनी निर्णय घेतलेला नाही. त्यांच्याकडून चाचपणी सुरू आहे. त्यांनी उमेदवारीचा निर्णय तातडीने घ्यावा व प्रचाराला सुरूवात करावी, असेही काहीजण खासगीत बोलत आहेत.
Latest Marathi News विशाल पाटील यांच्याकडे भाजपमधील नाराजांचे लक्ष Brought to You By : Bharat Live News Media.
