अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात

कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांसाठी शुक्रवार, दि. 12 पासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. या दोन्ही मतदारसंघांसाठी लोकसभा निवडणुकीची अधिसूचना शुक्रवारी प्रसिद्ध होणार आहे. शुक्रवारपासून सुरू होणार्या निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येणार्या सर्व मार्गांवरील वाहतुकीत बदल केला आहे.
कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. त्याची शुक्रवारी अधिसूचना प्रसिद्ध होईल. त्यानंतर सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज उपलब्ध होणार आहेत. हे अर्ज शुक्रवार, दि. 12 ते शुक्रवार, दि. 19 एप्रिलपर्यंत सार्वजनिक सुट्टीचा दिवस वगळून सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेतच स्वीकारले जाणार आहेत. दाखल अर्जांची शनिवार, दि. 20 एप्रिल रोजी छाननी होणार असून, सोमवार, दि. 22 रोजी दुपारी तीनपर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत. यानंतर चिन्हवाटप केले जाणार आहे.
कोल्हापूर मतदारसंघासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे, तर हातकणंगले मतदारसंघासाठी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. कोल्हापूरसाठी विशेष सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून करवीरचे प्रांताधिकारी हरिष धार्मिक तर हातकणंगलेसाठी पन्हाळ्याचे प्रांताधिकारी समीर शिंगटे यांची नियुक्ती केली आहे.
पाच व्यक्ती, तीन वाहनांनाच प्रवेश उमेदवारी अर्ज भरताना निवडणूक निर्णय अधिकारी
यांच्या कार्यालयाच्या शंभर मीटर परिसरात उमेदवारांसह पाच जणांना प्रवेश दिला जाणार आहे. यासह त्यांच्या तीन वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे.
वाहतूक मार्गात बदल
जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येणार्या मार्गावर वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. 12 एप्रिल ते 22 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरणे, छाननी आणि माघार या कालावधी पर्यंत हा बदल आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शंभर मीटर आवारात सर्व वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. नागाळा पार्ककडून येणारी वाहने कनाननगर मार्गे, स्टेशन रोडकडून येणारी वाहने महावीर उद्यान, पेंढारकर कलादालन, जयंती नाला मार्गे, महावीर महाविद्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने येणारी वाहने महावीर महाविद्यालय, खानविलकर पेट्रोल पंप यामार्गे पुढे जाणार आहेत. दुपारी तीननंतर हे मार्ग वाहतुकीसाठी पूर्ववत सुरू राहणार आहेत.
एक हजारांवर रकमेची नाणी स्वीकारणार नाही
निवडणुकीसाठी उमेदवाराला 25 हजार रुपये तर अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील उमेदवाराला 12 हजार 500 रुपये डिपॉझिट (अनामत रक्कम) भरावी लागणार आहे. मात्र, या रकमेपैकी जास्तीत जास्त एक हजार रुपयांपर्यंतच नाणी स्वीकारली जातील. त्यापुढील रकमेच्या चलनी नोटाच रोख स्वरूपात द्याव्या लागणार आहेत.
असा असेल कार्यक्रम अधिसूचना प्रसिद्ध :
शुक्रवार, दि. 12
उमेदवारी अर्ज सादर करणे : शुक्रवार, दि.12 ते शुक्रवार दि. 19
उमेदवारी अर्जाची छाननी : शनिवार, दि. 20
उमेदवारी अर्ज माघारी : सोमवार, दि.22
Latest Marathi News अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात Brought to You By : Bharat Live News Media.
