राजघराण्यात मूल दत्तक घेणे ही नवी पद्धत नाही, शरद पवारांनी संजय मंडलिकांना फटकारले

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : Lok Sabha Election 2024 : आताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत, अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे खासदार आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संजय मंडलिक यांनी केली होती. मंडलिक यांच्या या विधानावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यांचे विधान म्हणजे कोल्हापूरच्या गादीचा अपमान असल्याची टीका होत आहे. याबाबत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनीही पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली आहे.
शाहू महाराज यांबाबत सामान्य लोकांमध्ये कृतज्ञता आहे. असे असताना शाहू महाराजांविषयी असे वक्तव्य करणे याचा अर्थ राजकारण किती खालच्या पातळीवर गेले आहे हे दिसत आहे, असे म्हणत शरद पवार यांनी संजय मंडलिक यांना फटकारले आहे.
राजघराण्यात मूल दत्तक घेणे ही नवी पद्धत नाही. दत्तक मूल घेतल्यावर तो त्या घराण्याचा प्रतिनिधी होतो. आज ज्यांच्याबद्दल बोलले जात आहे, याचा अर्थ किती खालच्या पातळीवर प्रचार सुरू आहे हे दिसते. शाहू महाराज यांची जनमाणसात चांगली प्रतिमा आहे. त्यांचे सामान्य माणसात चांगले काम आहे. असे असताना त्यांच्याबद्दल बोलले जात आहे, याचा अर्थ प्रतिस्पर्धी उमेदवाराची मानसिकता काय आहे हे लक्षात घ्या, असे शरद पवार म्हणाले.
संजय मंडलिक काय म्हणाले?
आताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत, असे विधान खासदार संजय मंडलिक यांनी केले आहे. ते सुद्धा दत्तक आले आहेत, त्यामुळे तुम्ही आम्ही आणि ही कोल्हापूरची जनताच खरी वारसदार असल्याचे संजय मंडलिक म्हणाले. माझे वडील सदाशिवराव मंडलिक साहेबांनी खऱ्या अर्थाने पुरोगामी विचार जपल्याचे संजय मंडलिक म्हणाले. मल्लाला हात लावायचा नाही, मल्लाला टांगच मारायचा नाही, मग ती कुस्ती कशी होणार? असाही सवाल संजय मंडलिक यांनी केला आहे. चंदगड तालुक्यातील नेसरी येथे झालेल्या सभेत खासदार संजय मंडलिकांनी अशा वक्तव्यांची मालिका केली.
Latest Marathi News राजघराण्यात मूल दत्तक घेणे ही नवी पद्धत नाही, शरद पवारांनी संजय मंडलिकांना फटकारले Brought to You By : Bharat Live News Media.
