निवडणुकीचा मांडव आपल्या दारात : हसन मुश्रीफ

सिद्धनेर्ली; Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीचा मांडव आपल्या दारात आहे. प्रसंगी दोन पावले मागे घ्या. तिन्ही गटांचा सन्मान आणि समन्वय ठेवा, असे आवाहन करत पालकमंत्री या नात्याने त्यांच्या विजयाची जबाबदारी असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ सिद्धनेर्ली (ता. कागल) येथे सिद्धनेर्ली जिल्हा परिषद मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. मुश्रीफ म्हणाले, राजर्षी शाहू महाराज हे रत्न कागल या भूमीनेच देशाला दिले. त्यांच्यामुळेच ही सामाजिक आणि आर्थिक हरितक्रांती झाली. त्यांच्याच पुरोगामीत्वाच्या वाटेवरून स्वर्गीय खासदार कै. सदाशिवराव मंडलिक यांनी वाटचाल केली. त्यांनी सामाजिक काम आणि श्रम करून गोरगरिबांसाठी आयुष्य झिजवले. त्यांचे प्रचंड उपकार आमच्यावर आहेत. जिल्ह्याच्या विकासात त्यांचे योगदान आहे.
मुश्रीफ म्हणाले, स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांनी विकासाचा पाया घातला. काळम्मावाडी धरणाचे उजवा आणि डावा ही दोन्हीही कालवे सुरू केले. शेंडूरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि म्हाकवे येथे स्वर्गीय दिग्विजय खानविलकर यांच्या हस्ते पाणी पूजन झाले. हे भाग्य माझ्या वाट्याला आले. गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील म्हणाले, कागलचे सुपुत्र असलेल्या राजर्षी शाहू महाराजांनी राधानगरी धरण बांधले. स्वर्गीय खासदार कै. सदाशिवराव मंडलिक यांनी गैबी बोगद्यातून कोल्हापूर शहराला पाणी सोडले. पालकमंत्री मुश्रीफ यांनी कोल्हापूर शहरासाठी थेट काळम्मावाडी धरणातूनच पाईपलाईन आणली.
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप ऊर्फ भय्या माने, शिवसेना तालुकाध्यक्ष सुधीर पाटोळे-एकोंडी, शेखर सावंत-बानगे यांचीही मनोगते झाली. व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विकास पाटील, सौ. पूनम मगदूम-महाडिक, विष्णू बुवा, बाळासाहेब चौगुले, रमेश पाटील, शहाजी पाटील, कृष्णात मेटील, रघुनाथ अस्वले, राहुल मगदूम -महाडिक, सुभाष चौगुले आदींसह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. सरपंच दत्तात्रय पाटील यांनी स्वागत केले. तालुका महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सौ. मनीषा पाटील-बामणीकर यांनी प्रास्ताविक केले. विजय कुरणे यांनी सूत्रसंचालन केले. दत्ता पाटील-केनवडेकर यांनी आभार मानले.
Latest Marathi News निवडणुकीचा मांडव आपल्या दारात : हसन मुश्रीफ Brought to You By : Bharat Live News Media.
