गुलकंद म्हणजे उन्हाळ्यातील गारवा; जाणून घ्या त्याचे अनेक फायदे

डॉ. मनोज कुंभार
गुलकंद अंगातील उष्णता कमी करण्यास मदत करतो. पान खातानाही गुलकंदाचा सढळ हस्ते वापर केला जातो, तर काही मिठायांमध्येही गुलकंदाचा वापर केला जातो. गुलकंद केवळ चवीला उत्कृष्ट असतो असे नाही, तर महिलांच्या काही आरोग्य समस्यांमध्येही तो प्रभावी असतो. गुलकंद हा उष्णता कमी करणारा असल्याने आयुर्वेदात त्याचे अनेक फायदे आणि उपयोग सांगितले आहेत.
भरपेट जेवल्यानंतर ते पचण्यासाठी म्हणून पान खाण्याचा रिवाज पूर्वी फार नेमाने पाळला जात असे. तो आता सणावाराशी निगडित असला तरीही पानातील एक घटक मात्र बहुतेकांच्या घरी आवर्जून आणला जातो. हा घटक म्हणजे गुलकंद. उत्तम चवीचा गुलकंद ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष आणि मुले या सर्वांसाठी अत्यंत गुणकारी आहे. विशेषतः उन्हाळ्यामध्ये शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी गुलकंदाचे सेवन अत्यंत लाभदायक ठरते.
आयुर्वेदात पित्तदोषामुळे उत्पन्न होणार्या सर्व विकारांच्या उपचारासाठी गुलकंद सेवन करण्यास सांगितले जाते. गुलकंद सेवन केल्याने थकवा, सुस्तपणा, खाज तसेच अंगदुखी आणि थकवा यासह ज्वलनामुळे होणार्या आजारांमध्ये आराम पडतो. एवढेच नाही, तर गुलकंदाचे सेवन केल्याने स्त्रियांना 5 मोठ्या समस्यांपासून आराम मिळतो. गुलकंद सेवनाचे अनेक फायदे होतात.
अल्सर आणि सूज ः गुलकंदाचे सेवन केल्याने पित्त प्रकोप होत नाही. पोटातील उष्णता कमी करण्याचे काम गुलकंद करतो. याशिवाय आतड्याचा अल्सर, तसेच सूज यावर उपचार करून त्यामध्ये आराम मिळतो. गुलकंदामुळे यकृताची ताकद वाढते. तसेच भूक आणि पचन सुधारण्यासही मदत होते.
त्वचेसाठी उपयुक्त : त्वचेशी निगडित समस्यांमध्ये गुलकंदाचे सेवन केल्याचा फायदा होतो. त्वचेशी निगडित समस्या, जसे डाग दूर होण्यास मदत होते. चेहर्याची सूज आणि डोळे लाल होणे कमी करून तोंड येण्यावरही त्याचा फायदा होतो.
मासिक पाळीमध्ये प्रभावी ः ज्या स्त्रियांना पाळीच्या काळात अतिरक्तस्राव होतो, तसेच ल्युकोरियासारख्या समस्या उद्भवतात, त्यावर गुलकंद उपयुक्त आहे.
गुलकंदाचे सेवन कसे करावे : गुलकंदाचे फायदे आपण पाहिले तर दिवसातून 2 वेळा एक चमचा गुलकंद सेवन करायचा. मग ते लस्सी, फळांचा रस, मिल्कशेक, आईस्क्रीम किंवा गुलाब चहा या कोणत्याही प्रकारे करू शकतो. चविष्ट गुलकंदाचे फायदे लक्षात घेऊन त्याचे नियमित सेवन आरोग्यदायी ठरू शकते. स्त्रियांनी याचे फायदे लक्षात घेऊन गुलकंदाचे सेवन जरूर करावे.
Latest Marathi News गुलकंद म्हणजे उन्हाळ्यातील गारवा; जाणून घ्या त्याचे अनेक फायदे Brought to You By : Bharat Live News Media.
